संपुर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी आंतकवादी कारवायांमध्ये सिमीचा सहभाग उघड झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे त्यावेळी समोर आले होते.नागपूर येथे बॉंम्ब स्फोट करण्याआधी त्याचे कच्चे मटेरीअल रेल्वेने जळगावला पोहचविण्यात आले. त्यानंतर मुश्ताकला सोबत घेत चौघांनी बॉम्ब तयार केला आणि २० मे २००१ रोजी त्यंानी बॉम्ब पेरले या घटनेमुळे नागपूरकर हादरले होते.खर तर काही दिवसापासून सिमीप्रकरणामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.मुळात सिमीप्रकरणाच्या खोलात गेले तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात.जळगावमधील एका धार्मिक स्थळामध्ये सिमीच्या नियमित कार्यक्रमासाठी परवानगी कोणी दिली ? इतक्या दिवसापासून धार्मिक प्रवचनच्या नावाखाली तरुणांची माथी भडकावली जात होती तरी परवानगी देणाऱ्याना याची खबर कशी नव्हती ? इस्तेमाच्या नावाखाली तरुणांना परराज्यात पाठविण्यात येत होते याची दखल त्यांना का घ्याविशी वाटली नाही ?
सध्या फरार असलेला सिमीचा ‘अन्सार’ या रॅकवर कार्यरत असलेला शेख मुश्ताक शफी याच्यासह ऑगस्ट २००० मध्ये दिल्ली येथे सिमीच्या देशपातळीवरील इस्तेमासाठी जळगावातील आठ तरूणांची निवड शकील नामक व्यक्तीच्या शिफारशीवरून झाली. दिल्लीमध्ये महिन्याभराच्या या कॅम्पमध्ये पटणाच्या सैय्यद शहा हिसब रजा याने तरूणांचे ‘ब्रेन वॉश’ करायला सुरूवात केली.यामध्ये निवड केलेल्या तरूणांमध्ये मुश्ताकचा सहभाग नव्हता.पाटण्याला गेलेले सहा तरूण नंतर काश्मिरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या अशरफ मुनीर बेगच्या माध्यमातून,बॉम्ब बनविण्यापासून विविध शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण घेतले.त्याच्याआधी काश्मिरला पोहोचल्यानंतर रिजवान नामक तरूण आजारी पडल्यामुळे त्याला परत जळगावला पाठविण्यात आले.काही दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये यातील दोन तरूणांना कठीण ट्रेनींग आणि वातावरण मानवले नाही. त्यामुळे त्यांनादेखील परत पाठविण्यात आले. २००१ मध्ये काश्मिर खोर्यात झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत तीन तरूण ठार झाले.
जळगावला परत आल्यानंतर या तरुणाच्या संपर्काच्या माध्यमातून दिल्लीहून काही दिवसांनी बॉम्ब बनविण्याचे कच्चे साहित्य रेल्वेने जळगावमध्ये पाठविण्यात आले. प्रशिक्षण घेवून आलेल्या जैनोद्दीनच्या मामाच्या घरात हे सगळे साहित्य काही दिवस लपविण्यात आले. त्यानंतर खालीद, रिजवान व इरफान यांनी मुश्ताकला सोबत घेत बॉंब बनविला. या माध्यमातून मुश्ताकलादेखील बॉंब बनविण्याचे प्रशिक्षण मिळाले. बॉंब बनविल्यानंतर उरलेले साहित्य मुश्ताकच्या घरी लपविण्यात आले.तर पुर्ण बनून तयार झालेला बॉम्ब इरफानच्या काकाच्या मालकीच्या असणार्या शालीमार ट्रेडर्स या दुकानात ठेवण्यात आला.त्यानंतर २० मे २००१ ला खालीद आणि रिजवानने बडकस चौक व झेंडा चौकातील विश्व हिंदू परिषदेचे कार्यालयाजवळ बॉंब पेरले.नागपूरला पाईप बॉम्बसापडल्यानंतर संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणा चौकस होत विविध ठिकाणी छापेमारी सुरू झाली. याचा सुगावा लागल्यानंतर मुश्ताकने बॉम्ब बनविण्याचे उरलेले साहित्य एका अज्ञात स्थळी लपविले. दरम्यान, २६ जुलै २००१ ला तत्कालीन एलसीबी पी.आय. एस.टी. पटेल यांनी मुश्ताकला अटक केली होती.त्यावेळी त्याच्या घरातून फक्त स्वीच वायर सापडली होती. त्यानंतर मुश्ताकला नागपूर घेवून जात असतांना तो पोलीसांच्या तावडीतून पसार झाला होता.मुश्ताक आई-वडील, ४ भाऊ ४ बहिणी असा परिवार आहे.त्याचा परिवार आजही जळगावमध्ये राहतो.
‘हिजबुल’कडून प्रशिक्षण
दिल्लीहून जळगावला आलेल्या कच्च्या मटेरिअलमध्ये स्फोटकाचे पावडर, तीन डिटोनेटर, रिमोट कंट्रोल स्वीच, बॅटरी आणि विशिष्ट प्रकारचे ऑईलचा समावेश होता.काश्मिर खोर्यात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेने सिमीच्या दहशतवाद्यांना दिले होते.त्या प्रशिक्षण शिबिरात जळगावच्या तिघांचाही समावेश होता.त्यांनतर त्यांनी जळगावला परत आल्यानंतर पाईप बॉम्ब बनविला.
असे झाले ‘ब्रेन वॉश’
नव्वदच्या दशकात सिमी प्रतिबंधीत संघटना झालेली नव्हती.कारण तोपर्यंत तिचा खरा चेहरा जगासमोर आलेला नव्हता.शहरातील एका ठिकाणी सिमीच्या बैठका व्हायच्या.सुरूवातीला धार्मिक बाबींवर चर्चा केली जायची त्यानंतर हळूहळू काश्मिर व बाबरी मशिदचे संदर्भ देत तरूणांचे ब्रेन वॉश केले गेले.मुश्ताक यालादेखील याच पध्दतीने जाळ्यात ओढण्यात आले.शेख महेबुब उर्फ गुड्डू हा खंडवा जेलमधून पसार झाल्यानंतर लगेचच आंतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले. पंरतु २००३ पासून फरार झालेला मुश्ताकने आपला कुठलाही ठावठिकाणा यंत्रणांना समजू दिलेला नाही विशेष म्हणजे !
सिमीला रसद कोणाकडून ?
साधारण २००० मध्ये शहरातील एका प्रसिध्द शाळेत सिमीचा झोनल कॅम्प २२ ते २४ ऑक्टोबरदरम्यान झाला होता.यात एकूण ८०० लोकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात ५०० पुरूष तर ३०० महिलांचा सहभाग होता. या कॅम्पनंतर सिमी संघटनेचे जाळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पसरले होते.या कॅम्पसाठी एका प्रतिष्ठित नेत्याने ७० हजार रूपयाची मदत केली होती.त्याच प्रकारे एका बड्या उद्योग समूहात नौकरी करणारयाने देखील मदत भरीव केली होती.सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सर्व प्रथम शहरात सिमीचे नियमित कार्यक्रम घेण्यासाठी यानेच धार्मिक स्थळाची परवानगी मिळवून दिली होती हे विशेष ! शहरातील हे दोघे विख्यात नेते काही काळ यंत्रणेच्या रडावरदेखील आले होते. परंतु सबळ पुरावे नसल्यामुळे त्यावेळी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता.त्यावेळी मोठा राजकीय हस्तक्षेप झाल्याचे देखील कळते.