पत्रकाराला किती प्रमाणात लेखणी स्वातंत्र्य आहे,यावर कधीकाळी लोकशाही मजबूततेचे मूल्यमापन व्हायचे. खरं तर पत्रकारितेची स्वतंत्रता कधीच संपलीय. त्यामुळे ढीग भर पेपर आणि चॅनेल आल्यांनतर देखील २१ व्या शतकात आपल्याला समाजात फारसे वैचारिक बदल दिसत नाही.म्हणूनच आजही उच्च शिक्षित माणूस देखील जात-पात,धर्मच्या मुद्द्यावर चवीने चर्चा आणि आंदोलन करतांना दिसतो. कधी काळी आवडीचे दैनिक वाचणे किंवा चॅनेल बघणे हे प्रेक्षक/वाचकाच्या हातात होते. परंतु आता हे दोघं नाममात्र झालेत. वाचक किंवा प्रेक्षकाला ठरवून दिल्याप्रमाणेच बातम्या दाखविल्या किंवा वाचायला दिल्या जातात. त्यामुळे आजच्या घडीला ‘मिडिया कंट्रोल आणि रिमोट कंट्रोल’ या नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. जे दाखवायचे किंवा वाचायला द्यायचे आहे,तेच दिले जाते.विशेष म्हणजे यामुळे मग जागतिक असत्य देखील खरं जाणवायला लागते.मिडिया कंट्रोल केला की रिमोट कंट्रोलला काही महत्व उरत नाही.त्यामुळे कितीही चॅनेल बदलवा किंवा पेपर बदलवा तेच बघायला आणि वाचायला मिळणार हे निश्चित असते.
लोकशाहीत कधी काळी वाचक किंवा प्रेक्षक हा शक्तिशाली मानला जात होता.कारण कोणते चॅनेल बघायचे किंवा पेपर वाचायचा हे त्याच्या हातात होते.त्यामुळे काही वर्षांपूर्वी ताज्या आणि दर्जेदार बातम्या देण्याची जणू स्पर्धात बघावयास मिळत होती.परंतु कालांतराने सर्वच दैनिकात व चॅनेलमध्ये एकसारख्या बातम्या यायला लागल्या. त्यामुळे सर्वच सारखं दिसायला लागले. वाचक-प्रेक्षकाच्या आवडी-निवडीचा प्रश्नच उरला नाही. दररोज माध्यमांच्या माध्यमातून विशिष्ट मत प्रवाह पद्धतशीरपणे जनमतमध्ये परावर्तीत करण्यात येऊ लागले. आज विशिष्ट मुद्द्यांवरच पान भरून लेख किंवा प्राईम टाइम शो होतो. वाचक-प्रेक्षकाच्या अवतीभवती पद्धतशीरपणे काळोखाने भरेलेली एक बंद खोलीचे बांधकाम सुरु आहे. या कृतीम खोलीतील काळोखाला तो आपली विचारसरणी मानू लागलाय आणि याच संभ्रमित अवस्थेत आपण जे बघतोय…जे वाचतोय तेच नि:पक्ष किंवा खरे असल्याचा भास त्याला होतोय. म्हणून आजचा वाचक किंवा प्रेक्षक मेल्याची अनुभूती बऱ्याचदा होते.वाचक-प्रेक्षकाच्या या मृतावस्थेमुळे घटनेला अभिप्रेत लोकशाही देखील कधी शेवटच्या घटका मोजेल हे सांगता येत नाही.
नौकरीची भीती किंवा नैतिकमुल्यांचा अभावामुळे सध्याच्या काळात दोन प्रकारचे पत्रकार बघावयास मिळतात.एक जो घाबरलेला आहे आणि दुसरा ज्यांना घाबरवले गेले आहे.घाबरलेल्या संवर्गातील पत्रकार आर्थिकदृष्ट्या संपन्न होत गेलेत तर दुसरे घाबरल्याचे सोंग घेऊन बसलेत. धंदा किंवा सुरक्षा कवच म्हणून टाइमपास पत्रकारिता करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. गाव किंवा तालुका पातळीवरील वार्तांकन करणारी मंडळी एक तर जाहिरातीच्या ओझ्याखाली काम करते किंवा लाभार्थी असल्यामुळे सबंध जोपासत बसते.जिल्हा,राज्य पातळीवर नौकरीची भीती किंवा पत्रकारितेच्या मुल्यांचा अभावामुळे कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे.
आजच्या पत्रकारांची पिढी सोशल मिडीयाच्या आभासी विश्वात आपले कर्तव्य विसरत जात आहे.लाईक,शेअरच्या पलीकडे पत्रकारितेचे अफाट विश्व असतं हे त्यांना माहीतच नाही.सत्यता न तपासता व्हाट्सअपवर पटकन बातमी टाकणे किंवा फेसबुकवर शेअर करणे म्हणजे आपण मोठे पत्रकार किंवा आपले नेटवर्क किती भक्कम आहे,हे दाखविण्याचा केवीलवाणा प्रकार असतो,याची जाणच त्यांना नसते. याच घाई गर्दीमुळे अल्पकाळात सोशल मीडियाची विश्वासर्हता नाममात्र झाली. व्हाट्सअप- फेसबुकवर येणाऱ्या बातम्यांचे काही खरे नसते अशी सामान्य प्रतिक्रिया यामुळेच नेहमी ऐकावयास मिळते. परंतु याच सोशल मीडिया अर्थात सामाजिक माध्यमात काही निवडक पत्रकारांनी टाकलेल्या बातम्यांना विश्वासर्हतेची जोड असते,हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे. कारण शेवटी आपली विश्वासर्हता आणि प्रतिमा टिकविणे,तयार करणे हे आपल्याच हातात असते.
लोकशाही बळकट राहण्यासाठी पत्रकाराने नेहमी विरोधी पक्षाची भूमिका निभावली पाहिजे असे अपेक्षित असते.परंतु आजच्या घडीला पत्रकारितेत दोन गट बघावयास मिळताय. ही वैचारिक गटबाजी पत्रकारितेच्या मूळ गाभ्यावरच घाव घालतेय. परंतु हे लक्षात येण्या इतपतची सजानता आपण हरवून बसलोय.त्यामुळे काही विशिष्ट लोकांबद्दल छापयाचेच किंवा बोलायचेच नाही,जणू हा अलिखित नियमच करून घेतलाय आपण. यातून लवकर बाहेर पडलो नाही तर जनतेचा असलेला थोडा फार विश्वास गमवायला आपल्याला वेळ लागणार नाही.अर्थात भांडवलदारांच्या प्रवेशामुळे नौकरी करणाऱ्या पत्रकाराच्या हातात फार जास्त नाही. परंतु सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपले लेखणी स्वातंत्र्य आपण निश्चितच जपू शकतो !