नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची नियुक्ती झाली. भाजप नेहमी व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असल्याचा आव आणत राहिला आहे. परंतु लोकसभेतील विजयानंतर मात्र, भाजपातील अंतर्गत चित्र बदलत असून शहा यांची निवड त्याचे एक उदाहरण म्हणता येईल.त्यामुळे भाजपचे मोदीकरण होत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
भाजपच्या जवळपास सर्व प्रमुख निर्णय संघ परिवार घेत असतो.मात्र ,संघ परिवाराने हे उघडपणे कधीही स्वीकारलेले नाही. लोकसभेतील विजया नंतर तर संघ परिवाराने मोदीसारखी लाखो राष्ट्रसमर्पित स्वयंसेवक तयार केले असल्याचे म्हटले. राष्ट्रनिर्मिती करणे आमचे उद्दिष्ट असून संघात व त्यामुळे भाजपत व्यक्तिमाहात्म्य कधीच राहत नाही असे आतापर्यंत त्यांच्याकडून अनेकदा ठासून सांगण्यात आले. परंतु हे खरे मानायचे म्हटले तर, केवळ मोदीच्या इच्छेपोटी शहा यांना पक्षाध्यक्षपद कसे काय दिले जावू शकते ? कोणाला अध्यक्ष करावे हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. त्यावर पसंती किवा नापसंती दाखविण्याचे कारण नाही. किवा त्याची गरज देखील नाही. परंतु ज्या पक्षाचा व्यक्ती देशाचा पंतप्रधान आहे. त्यांच्या पक्षात काय सुरु आहे. याची माहिती असणे गरजेचे होवून जाते. त्यामुळे संघ प्रमाणे नैतिकतेचा आव आणणारे भाजपने अमित शहा यांच्या निवडीचा निर्णय कसा आणि का घेतला ? याचा उहापोह करणे देखील गरजेचे होते. शहा यांच्यावर खून, खंडणीखोरी, अपहरण सारख्या अन्य पाच जबरी गुन्हे आहेत. देशातील इतिहासात एखाद्या राज्याचा गृहमंत्रिपद भूषवणाऱ्या व्यक्तीवर त्याच्याच राज्यात प्रवेशबंदी केली जावी हे आता पर्यंत घडले नसावे. जर कॉंग्रेस ,समाजवादी किवा कम्युनिस्ट यासारख्या पक्षाने असे आरोप असलेला व्यक्ती आपल्या पक्षाच्या अध्यक्षस्थानी बसविला असता. तर भाजपने काय नैतिकतेचे धडे दिले असते हे सांगायला नको. भारतीय राजकारणात त्या पक्षाला राहण्याचा अधिकारच नाही इतपत देखील सांगून टाकले असते.अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवर भाजपला सल्ले देणारे किवा त्यांच्यावर डोळे वाटारुण पाहणारे म्हटले तर वावगे ठरणार नाही असा संघ परिवार यांनी देखील शहा यांच्या निवडीला मूक संमती द्यावी हे आकलनीय असेच म्हणावे लागेल.निवडणुका जिंकून येणे किवा देणे हेच प्रमाण महत्वाचे असेल तर मग राजा भैय्या,पप्पू कलानी,ए.राजा,लालू प्रसाद किवा दबंग नेत्यांना भाजपाने केलेला विरोध कितपत योग्य होता ? देशाच्या राजकारणात भाजपने शिस्त,संघटन या दोन गोष्टीच्या जोरावर पुन्हा एकदा सत्ता काबीज केली.किंबहुना संघाचे स्वयंसेवक यांची समाजातील प्रतिमा देखील त्यांना पूरक ठरत गेली. परंतु विशिष्ट व्यक्तींच्या अवतीभवती पक्ष फिरू लागला तर मात्र भाजपचे देखील कॉंग्रेस होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. फक्त त्यानंतर गांधी ऐवजी मोदी आडनावाच्या आजूबाजूला भाजपचे राजकारण फिरतांना दिसेल.