2 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या विशेष टाडा कोर्टाने आज पाच आरोपींना शिक्षा सुनावली आणि सत्य घटनेवर आधारित आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोकृष्ट चित्रपट अर्थात ‘ब्लॅक फ्राइडे’ची आठवण झाली.मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचे हुबेहूब चित्रण या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.घटनाक्रम,घटनास्थळ,व्यक्तिरेखांची नावे देखील अगदी खरीखुरीच आहेत.दाऊद आणि मेमन परिवाराचा दबदबा असणाऱ्या काळातील संपूर्ण चित्र या चित्रपटाद्वारे आपल्या समोर उभे राहते.१९९३ मधील साखळी बॉंबस्फोटांपूर्वी आणि स्फोटांनंतर काय घडले होते.पोलिसांचा तपास गुन्हेगारी विश्वातील अंतर्गत घडामोडी हुबेहूब चित्रण करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
भारत,बांगलादेश,इराक,इराण,पाकीस्तान,चीन,जपान थोडक्यात सांगायचे झाले तर जागतिक पातळीवर दखल घेतले गेलेले तसेच दुर्लक्षित राहिलेले अनेक सिनेमे बघितले.पण ‘ब्लॅक फ्राइडे’ कायम लक्षात राहील असाच आहे.दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा हा सिनेमा हुसैन जैदी लिखित पुस्तक ‘ब्लॅक फ्राइडे’ : द ट्रू स्टोरी ऑफ बॉम्बे ब्लास्ट्स’ वर आधारित आहे.दहशतवादी आणि देशद्रोही कारवायांवर आधारित या चित्रपटावर अनेक दिवस न्यायालयाच्या आदेशान्वये बंदी लादण्यात आली होती.वास्तविक बघता पुस्तकावर कुठलीही बंदी नसतांना चित्रपटावरील लादलेली बंदी तशी चुकीचीच होती.’ब्लॅक फ्राइडे’ हा चित्रपट एका न्यूज चॅनेलवर दाखविण्यासाठी सहा भागांमध्ये बनविला जात होता परंतु नंतर या सहा भागांना जोडून चित्रपट बनविण्यात आला.
हा चित्रपट सुरुवातीपासून आपल्याला जखडून ठेवतो.एक मिनिट देखील आपले अवधान विचलित होत नाही.कथानकाची मांडणी एक वेगळ्याच धाटणीची आहे.माझ्या मते या चित्रपटाने भारतीय सिनेमाला एक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला.परंतु न्यायालयाच्या बंदीमुळे हा चित्रपट अपेक्षित असे यश आणि कौतुकापासून दूर राहिला.आजतागायत भारतात अनेक सत्य घटनांवर आधारित चित्रपट बनले असतील.परंतु ओरीजनल पात्रांची नावे चित्रपटात घेण्याचे धाडस कुणीही दाखविले नाही.या सिनेमात दाऊद,टायगर मेमन,याकुब मेमन,अबू सालेम यासह अनेक कुख्यात दहशदवाद्यांच्या नावाच्या व्यक्तीरेखा आहेत.हा चित्रपट प्रेक्षकाला १९९३च्या दशकात नेण्यात पूर्णपणे यशस्वी होतो.चित्रपटाच्या मांडणीसोबत कलरशेड आणि सिनेमाटोग्राफी अफलातून आहे.अनेक सिनेमे तुम्हाला नकळत ‘टाईम मशीन’प्रमाणे वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाण्यात यशस्वी ठरतात. ‘ब्लॅक फ्राइडे’ हा चित्रपट अशाच पद्धतीची ‘टाईम मशीन’ आहे,असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
बॉलीवूड आणि गुन्हेगारी जगत यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असे जुनेच नाते आहे. गुन्हेगारी जगताचे जरा जास्तीचे अवास्तव चित्रण बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमधून घडले आहे. गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुंडांच्या व्यक्तिरेखाही त्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर येऊन गेल्यात.त्यात अनेक भाकड कथा देखील घुसविण्यात आल्या.परंतु अशा चित्रपटांपासून ‘ब्लॅक फ्राइडे’ पूर्णतः वेगळा आहे.या चित्रपटात बाबरी मशीद,मुंबईतील जातीय दंगली, धर्म,राजकारण,गुन्हेगारी विश्व यासह अनेक गोष्टींवर उघड आणि परखड भाष्य करण्यात आले आहे.चित्रपटाची निर्मिती बिनधास्त आणि कुठलीही भीती मनात न ठेवता झाल्याची जाणीव प्रत्येक दृश्यात प्रेक्षकाला होत असते.त्यामुळेच की काय,हा चित्रपट आजही वादग्रस्त ठरतो आणि चर्चेत राहतो.या चित्रपट के.के मेमन,पवन मल्होत्रा,नवाज सिद्दिकी,आदित्य श्रीवास्तव अशा अनेकांच्या भूमिका कायम लक्षात राहतील अशाच आहेत.
प्रदर्शनाच्या स्थगितीवर कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होण्याआधीच सर्व कट पोलिसांना एका मुस्लीम तरुणांने सांगितला होता.परंतु फक्त टायगर मेमनच्या नावामुळे पोलिसांनी दुर्लक्ष केले.बॉंबस्फोटात टायगर मेमनच्या परिवाराने नेमकी काय भूमिका निभावली?मुंबई दंगलीत सर्वाधिक व्यावसायिक नुकसान झाल्यामुळे टायगर आणि याकुब मेमनने कशापद्धतीने मुस्लीम तरुणांचा वापर केला?काम झाल्यानंतर मुस्लीम तरुणांना कशा पद्धतीने वाऱ्यावर सोडण्यात आले? त्याच प्रकारे दाऊदला मुस्लीम महिलांनी बांगड्यां पाठविल्यामुळेच त्याने आयएसआयच्या इशाऱ्यावर साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले,अशा अनेक पडद्याआड घडलेल्या आणि कधीही समोर न आलेल्या गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला माहित होतील.
चित्रपटाची युट्युब लिंक
https://www.youtube.com/watch?v=–j9Lq5omw0