सध्या सोशल मिडीयावर जेष्ठ पत्रकार निखील वागळे आणि अनिरुद्ध जोशी,देशपांडे यांच्या संभाषणाची क्लीप प्रचंड गाजत आहे.या क्लीपने समाजात ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर अशी दुफळी निर्माण केली आहे.विशेष म्हणजे ही दुफळी निर्माण करण्यासाठी पद्धतशीरपणे फुले,शाहू आणि खास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उपयोग केला जात आहे.या वादातून जणू संपूर्ण ब्राम्हण जमातच वाईट असते असे ठसविण्याचा प्रयत्न सुरु आहे.जो पूर्णपणे निरर्थक आणि स्वार्थातून असल्याचे मला वाटते.कारण बाबासाहेबांचा विरोध हा ब्राम्हणवादाला होता,ब्राम्हणांना नव्हे ! ज्या काळी दलितांना गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधून चालावे लागत होते.ज्यांचा स्पर्शच काय सावलीने सुद्धा विटाळ व्हायचा त्याकाळात समाज,जातपंचायत यांची पर्वा न करता त्यावेळी बाबासाहेबांच्या कार्याला अनेक ब्राम्हणांनी मदत केली आहे.त्यांच्या या समाजवादी चळवळीत त्यांना मोलाची साथ दिली आहे.सध्या ब्राम्हणांना शिव्या घालणे म्हणजे कट्टर पुरोगामी विचारसरणीचा असल्याचे अनेकांना वाटते किवा तसे दाखवून देण्यासाठी शिव्या-शाप देण्याचे प्रकार होताना दिसतात.पुरोगामित्व म्हणजे ब्राम्हणांना शिव्या घालणे असे आहे का ? असे असेल तर,मुद्दाम ब्राह्मणलक्ष्यी पुरोगामित्व नालायकपणाचेच ! असेच म्हणावे लागेल.
मी ज्या समाजात जन्मलो आहे,त्या समाजात ब्राम्हण विरोधाचे बाळकडू तर लहानपणापासूनच प्रत्येकाला मिळते.परंतु यात कुटुंबियाचा किवा समाजातील व्यक्तींचा दोष नाही. कारण,त्यांच्या पूर्वजांनी भोगलेल्या अन्यायातून त्यांच्यात ती भावना निर्माण झालेली असते.नाण्याला जशा दोन बाजू असतात,त्याच प्रकारे इतिहासाच्या अज्ञाना अभावी किवा बालवयात मनावर बिंबवले गेलेले ब्राम्हणद्वेष हे त्यासाठी कारणीभूत असते ,हे आपण समजून घेतले पाहिजे.माझे अनेक मित्र ब्राम्हण आहेत.विनय भावे,वैभव कुलकर्णी,उदय भट्ट,प्रवीण कुलकर्णी,प्रणव वाजपेयी अशी अनेक नावे सांगता येतील.यातील अनेकांसोबत माझे कौटुंबिक संबध आहेत.मला त्यांच्या स्वभावात कधीही ब्राम्हणवाद जाणवला नाही.
डॉ. आंबेडकर यांच्या कार्यात अनेक सवर्ण सहकार्यांनी आपल्या समाजाचा रोष पत्करून त्यांना साथ दिली हे विसरून चालणार नाही.बाबासाहेबांसोबत अनंतराव चित्रे, बापूसाहेब सहस्रबुध्दे, द.वि. प्रधान, भा.वि. प्रधान, नवल अथेना, बॅ. एम.बी. समर्थ, देवराव नाईक, भास्करराव कद्रेकर, श्रीधरपंत टिळक, रा.दा. कवळी, रावबहादूर सी.के. बोले, सुरबा टिपणीस, कृ.अ. केळुस्कर, मनोहर चिटणीस,मो.वा. दोंदे, व्ही.जी. राव, भास्करराव जाधव,स्वा. सावरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, रावबहादूर सी.के. बोले आदींनी खांद्याला खांदा लावून केलेले कार्य काळाच्या पडद्याआड लपविता येणार नाही.त्यामुळे सर्वच ब्राम्हण वाईट असतात;अशा प्रवृत्तीच्या विरोधात मी आहे.डॉ.बाबासाहेबांच्या नावाच्या उपयोग करून ब्राम्हण समाजाला टार्गेट केले जाते.यामुळेच ब्राम्हण-दलित हा वाद अनेक ठिकाणी विनाकारण उफाळून येत असतो.कधी-कधी तर हे सर्व नियोजित असल्याचादेखील भास मला होतो.
शेठ भागोजी कीर यांनी स्वा.सावरकरांच्या इच्छेनुसार रत्नागिरीत पतितपावन मंदिर बांधत या मंदिरात अस्पृश्य समाजाला मुक्तद्वार दिले. या मंदिरात अनेक सहभोजने घडवून आणली. या मंदिराच्या उद्घाटनासाठी १९३३ साली डॉ. आंबेडकरांना निमंत्रित केले होते. डॉ. आंबेडकर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकले नव्हते हा भाग वेगळा.स्वा. सावरकरांच्या अस्पृश्यता निवारण कार्याला तत्कालिन अनेक मनुवादी ब्राम्हणांनी विरोध केला.हिंदू समाजातील चुकीच्या वृत्तीमुळे हिंदू समाजाला गळती लागली आहे, असे ते नेहमी सांगत.सावरकर हे रत्नागिरीला स्थानबध्द असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १९२७च्या महाडच्या चवदार तळयाच्या सत्याग्रहाला त्यांनी पाठिंबा दिला होता.१९३१ला मुंबई इलाखा अस्पृश्यता निवारक परिषदेच्या अध्यक्षपदावरून रत्नागिरी येथे भाषण करताना त्यांनी ’’काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी मी स्थानबध्द नसतो, तर ‘त्या’ सत्याग्रहात मी स्वत: सहभागी झालो असतो असे ठणकावून सांगितले होते.काळाराम मंदिर सत्याग्रहाच्यावेळी ’’अस्पृश्यांची मंदिर प्रवेशाची मागणी अत्यंत योग्य आहे.अनेक पिढ्या ज्यांनी अपमान भोगला त्यांच्यासाठी आपणच स्वतःहून आता मंदिराचे द्वार खुले करून दिले पाहिजे असे मतदेखील त्यांनी त्यावेळी व्यक्त केले होते.
१९२७ साली महाडचा सत्याग्रह करण्यासाठी पैसा कसा उभा राहील या विवंचनेत डॉ.बाबासाहेब असतांना त्यांना अनेक ब्राम्हणांनी मदत केली किवा देण्याचा प्रयत्न केला.रामचंद्र काशीनाथ तटणीस यांनी कित्येकांकडून मदत मागितली पण यश आले आहे नाही.त्यावेळी ललित कलादर्शनचे बापूराव पेंढारकर (व्यंकटेश बळवंत) यांनी आम्ही जे पैसे देणार ते सत्याग्रहासाठी देतोय हे बाहेर सांगु नका.समाज आमच्यावर पेटून उठेल अशी भीती व्यक्त केली त्यावेळेची सामाजिक परिस्थिती बघता बाबासाहेबानी त्यांची भावना समजून घेत आर्थिक मदत स्वीकारली.१९२७ साली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे शिवजयंती उत्सवासाठी बाबासाहेबांना बोलाविण्यात आले होते.त्यावेळी बहुजन समाजातील अनेकांनी बाबासाहेबांना आपल्या घरी रात्रीचा मुक्काम करण्यापासून अंग झटकल्यानंतर पालेय शास्त्री यांनी बाबासाहेबांची राहण्याची व खाण्यापिण्याची सर्व सोय आपल्या घरी केली होती. त्यांनी समाज वाळीत टाकण्याचा धोका ओळखून देखील ही हिंमत दाखविली होती ,हे विशेष !
बाबासाहेबांचे नाव घेऊन ब्राम्हण जमात वाईट असतेे अशा मानसिकतेने समाजासमोर उदाहरण देणार्या लोकांनीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चौकटीत बांधून ठेवले आहे.अरे….साधा आणि सरळ विषय आहे जर बाबासाहेबांचा सर्व ब्राम्हणांना विरोध असता तर,त्यांनी एका ब्राम्हण मुलीसोबत लग्न केले असते का ? ब्राम्हणांना आपल्या कार्यात त्यांनी सोबत ठेवले असते का ? म्हणून म्हणतो आपला वाद ,गोंधळ आपणच घालायचा असतो.फुले,शाहू आंबेडकर यांच्या नावाचा उपयोग करीत आपले वैयक्तीक मत माडु नका.
राहिला निखील वागळे,अनिरुद्ध जोशी यांचा वाद ;यावर माझे स्पष्ट मत आहे की,कुणाला मानसिक त्रास देऊन आपले म्हणणे मांडण्याचा प्रकार गैर आहे.त्यामुळे अपरात्री जोशी यांनी वागळे यांना केलेला मेसेज हा चुकीचाच होता.आपले म्हणणेे पटवून देण्याची किवा निषेधाची ही पद्धत निश्चितच चुकीची आहे.
संदर्भ (साप्ताहिक विवेक मधील अशोक ज.कांबळे यांचा लेख व एम.डी.रामटेके यांचा ब्लॉग )
खरच सामाजिक स्वस्थ टिकवण्यासाठी सामाजिक सलोखा निर्माण करणाऱ्या आश्या अभ्यासपूर्ण लेखांची जास्त आवश्यकता नक्कीच आहे.
धन्यवाद वाघमारे भाऊ,
फक्त जातीचा विचार न करता सदसद्विवेक जागा ठेवून विचार करणार्या लोकांची समाजाला खुप गरज आहे. शेवटी ब्राम्हणवाद वाईट होता , संपूर्ण ब्राम्हण समाज वाईट नाही हे लोकांना पटवायलाच हवं . फुले , शाहू आंबेडकर यांच्या नावाने राजकारण थांबवायला हवे.
६ जुलै १९३६ च्या दैनिक केसरी च्या अंकामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी (य.न. केळकर यांच्या पत्रास ) पत्रोत्तर लिहून मडके व झाडूचा उल्लेख यास लिखित पुरावा नाही, वृद्धांकडून ऐकलेली हि दंतकथा आहे हे नमूद केले आहे.