(फोटो : सौजन्य आंतरमायाजाल)
लोकं जातात,लोकं जातात, वासना शमवितात. रात्र न् दिवस त्याठिकाणी फक्त देहाचा रंगीन बाजार सजलेला असतो. म्हणूनच येथील प्रत्येक गल्लीबोळ बदनाम असते. अशा ठिकाणी राहणारे आणि जाणारे देखील बदनाम होतात. त्यामुळे ‘जन्नत’ म्हटल्या जाणाऱ्या या भागात भले-भले जायला घाबरतात. सोलापूर येथील माझे मित्र समीर गायकवाड यांची ‘रेड लाईट’ डायरीज वाचून मी खूप प्रभावित झालो होतो. त्यांनी आपल्या लेखणीतून मांडलेले दु:ख डोळ्यांनी बघायचे होते. म्हणून एकेदिवशी समीरबापूंना फोन लाऊन अशा भागात काम करणाऱ्या एखादं संस्थेच्या माध्यामतून भेट द्यायचे ठरविले. सुदैवाने लवकरच दवाखाना आणि अन्य एका संशोधनाच्या कामा निमित्ताने कुटुंबासह पुण्याला जाण्याचा योग जुळून आला. समीर बापूंनी दिलेल्या पत्त्यानुसार बुधवार पेठेतील श्रीनाथ टाॅकीज समोर पोहचल्यावर एका पोलीस दादाला वेश्या व्यवसायातील महिलांसाठी काम करणाऱ्या सहेली संघाचा पत्ता विचारला. परंतु फक्त खालीवर पाहत, नाही म्हणून दादा तोंडातल्या काही तरी पूटपुटत पुढे निघून गेला. अखेर बराच वेळ फिरल्यानंतर एका हात गाडीवाल्याने पत्ता सांगितला.
बुधवार पेठ येथील मुलींसाठी एनजीओ किंवा संस्था चालविण्याच्या नावाखाली अनेकांनी आतापर्यंत फक्त स्वतःची फुशारकी करून घेतलीय किंवा आर्थिक शोषण केलेले आहे. परंतु काही संस्था खरचं चांगलं काम करतात, सहेली संघ अशीच एक संस्था आहे. या संस्थेचे वेगळेपण म्हणजे सेक्स वर्कर महिलांनी स्वतःसाठी सुरु केलेली कदाचित ही पहिलीच संस्था असावी. या संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन खरचं खूप भारावलो. या संस्थेतील सेक्स वर्कर्स महिलांचा आपल्या पोरांच्या भवितव्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी सुरु असलेला लढा नुसता प्रेरणादाईच नव्हे, तर प्रभावित करणारा आहे. सहेली संघाच्या प्रकल्प व्यवस्थापक मंदाकिनी देसले यांची भेट झाली. मंदाकिनीताई या मूळ खानदेशी असल्यामुळे गप्पा पटकन रंगल्या. याच गप्पामधून अनेक गोष्टीं समजायला मदत झाली.
पुण्यातील बुधवार पेठ मधील दगडूसेठ गणपती हे महाराष्ट्रातील अवघ्या जनतेचे श्रद्धास्थान आहे. परंतु याच भागाला लागून भारतातील सर्वात मोठा तर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा रेडलाइट एरिया देखील आहे. या ठिकाणी साधारण 440 कोठे आहेत. ज्यामध्ये 5 हजारांपेक्षा अधिक सेक्स वर्कर्स राहतात. याठिकाणी नेपाल, बांगलादेशसह भारतातील जवळपास प्रत्येक राज्यातील मुली देहव्यापारच्या धंद्यात अडकलेल्या आहेत. बहुतांश मुलींची फसवणूक करून या धंद्यात ढकलेले असते. तर काही मजबुरी खातीर या धंद्यात पडतात. बुधवार पेठेत अनेक वर्षापासून नरकयातना सहन करणाऱ्या महिलांनी सहेली संघ ही संघटना साधारण १९९१ मध्ये स्थापन केली. पुण्यातील वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलांनी स्वतःसाठी स्थापन केलेली कदाचित ही पहिलीच संघटना असावी. तेजस्विनी सेवेकरी यांचे या संघटनेसाठी मोठे योगदान आहे.
विविध मार्गांनी वेश्या व्यवसायात आलेल्या अनेक महिला या संघटनेत आज काम करताय. जे आमचे झाले ते दुसऱ्या महिलांचे होऊ नये, या एका इच्छाशक्तीच्या जोरावर या संस्थेतील महिलांचे काम सुरु आहे. ही संस्था वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या संपूर्ण हितासाठी कटिबद्ध आहे. वेश्या वस्तीतील महिलांचे पुनर्वसन वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पोलिसांकडून सोडवलेल्या महिलांना एखाद संस्थेच्या आधारगृहात ठेऊन पापड, मेणबत्या, लोणचे बनवणे किंवा शिवणकाम,ब्युटी पार्लर आदी काम शिकवणे हे पूर्णपणे पुनर्वसन होऊ शकत नाही. कारण या धंद्यात असलेल्या प्रत्येक महिलेची मजबुरी ही आर्थिक निकषावर येऊन प्राण सोडते. सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणे तिच्यावर देखील कुटुंबाची जबाबदारी असते. त्यामुळे पापड, लोणची बनवून ती कुटुंबाचे उदरनिर्वाह होणे शक्य नसल्यामुळे पुन्हा तिच्या हाती बुधवार पेठेच्या नरकात परतण्याशिवाय कोणताच अन्य पर्याय नसतो.
वेश्या व्यवसायातील महिलांनी पुनर्वसन आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सहेली संघ अनेक उपक्रम राबवीत असतो. त्यात प्रामुख्याने गुप्तरोग, एच.आय.व्ही., एड्स यांचे वेश्या वस्तीतील महिलांना निरंतर शिक्षण व उपचार पुरविणे. पुरुषांच्या तसेच स्त्रियांच्या कंडोमविषयी प्रशिक्षण देणे तसेच त्याचा पुरवठा करणे. येथील महिलांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, पुनर्वसनाचे छोटे-छोटे प्रयत्न करणे. वेश्या व्यवसायातील महिलांनी पुनर्वसनाचा एक यशस्वी प्रयोग म्हणून गेल्या अनेक वर्षपासून याठिकाणी खानावळ सुरु आहे. त्याच प्रकारे वेश्या व्यवसायातील महिलांच्या लहान मुलांसाठी पाळणाघर आणि त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे. नागरिकत्वासाठी आवश्यक असलेली रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड उपलब्ध करून देणे, बँकेत खाती उघडून देणे, असे अनेक चांगले उपक्रम सहेली संघ राबवीत आहे. एवढेच नव्हे तर गर्भावस्था, मातृ देखभाल, स्तनपान, प्रसूती, सुरक्षित गर्भपात, कुटुंब नियोजन यासाठी काय करावे याची देखील माहिती दिली जाते.
आईवडिलांनी, नवऱ्याने, भावांनी, नातेवाईकांनी विकलेल्या मुली बुधवार पेठेतील गल्लो-गल्ली आहेत. सकाळी बायकोला वेश्या वस्तीत धंदा करायला सोडून संध्याकाळी घरी घेऊन जाणारी किती तरी नीच माणसं देखील याठिकाणी असल्याची माहिती मला जेव्हा मिळाली, त्यावेळी तर मन आणि मेंदू सुन्नचं झाले. अंग थंड पडले मन आणि मेंदूचा संपर्क जणू तुटल्यात जमा झाला. पवित्र नात्यातील अन् आपल्याच रक्ताची माणसं ज्यावेळी अशी वागतात,त्यावेळी त्या पिडीतेचे काळीजच चिरले जात असेल. अश्रूंच्या समुद्रातील लाटा तिच्या पापण्यांना कितीही धडशा मारत असल्या तरी परिस्थीची आग त्याची वाफ करून टाकत असेल. बुधवार पेठेला नात्या गोत्यांची स्मशानभूमी म्हटली तर चुकते कुठे?
दारुडा बाप किंवा नवऱ्यामुळे स्वतःच्या खांद्यावर मुलांचे शिक्षण आणि परिवाराचे दोन वेळेचे पोटाची खळगी भरण्याची असलेली जबाबदारी कोणत्याही माणसाला तोडून-मोडून ठेवत असतात. दुसरीकडे गरीब आणि मजबूर बाई म्हणजे जणू आपल्या बापाची ठेव समजणाऱ्या हलकट लोकांची कमी आपल्या समाजात काही कमी नाहीय. या ठिकाणी कर्नाटकमधील देवदासी महिला देखील आहेत. वर्षभर आपले शरीर तुकड्या-तुकड्यांनी विकायचे आणि वर्षातून एकदा घरी गेल्यानंतरही तिच्या नशिबी फक्त अहवलेनाच येत असेल तर नियतीला आणि देवाला शिव्या घातल्या तर तिचे चूकले कुठे? परिवारासाठी शरीरासोबत आत्म्यावर घाव झेलून देखील घरी परतल्यावर तिला प्रेम मिळत नसेल, त्यावेळी तिच्या मनावर काय बितत असेल हे फक्त ती माऊलीच सांगू शकते.
भारतीय संस्कृतीत कधीकाळी महिलांना आदिशक्ती,लक्ष्मी, आई, सरस्वती म्हणून बघितले जायचे. त्यानंतर वैश्या, रांड आणि आजच्या आधुनिक काळात कॉल गर्ल असे शब्द अधिकचे प्रचलित होतांना दिसतात. कधीकाळी भारतीय संकृतीत सर्वोच्च स्थानावर असलेली महिलेची आज फक्त काम भोगवस्तू हीच ओळख बनू पहात आहे. विनयभंग, बलात्कारची बातमी वाचल्याशिवाय एक दिवस उजाडत नाही. वेश्या व्यवसायात निश्चितच कोणतीही महिला स्वखुशीने येत नाही. एकतर फसवणूक किंवा कौटुंबिक जबाबदारीतून अनेक जणी या धंद्यात गुरफटत जातात. त्यानंतर एकवेळ अशी येते की, गाव,समाज एवढेच काय तर परिवारातील लोकं देखील तिला स्वीकारायला तयार होत नाहीत. अशा वेळी उतार वयात आपला सांभाळ कोण करणार? अशी चिंता तिच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. अर्थात स्त्री जन्म मातृत्वाशिवाय कसा पूर्ण होईल,अशी धारणा देखील मनात असतेच. त्यामुळे अनेक जणी आई बनतात.परंतु अवघं आयुष्य अपमाणितरित्या जागल्यानंतर आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या घरात सन्मानजनक स्थितीत परमेश्वर घरी जाण्याची इच्छा ठेवणे,श्वास घेण्याएवढेच स्वाभाविक आहे.
म्हणे…याठिकाणी विना पंखाच्या पऱ्या राहतात. म्हणून या भागाला ‘जन्नत’ म्हणतात. याठिकाणी देहाचा बाजार मांडला जातो. पैशांनी शरीराची आणि मेंदूची विकृती आग शांत केली जाते. बुधवार पेठ सारख्या सर्व भागात उद्ध्वस्त झालेल्या बागांच्या कळ्या दररोज कुस्करल्या जातात. येथील बहुतांश घरमालकीण किंवा दलालांच्या तोंडात आपुलकी आणि प्रेमाचे बोल नसतात. येथील गल्लो-गल्लीत नाती-गोती पावलो-पावली जीव सोडतांना दिसतात. तिची कहाणी, पिडा,व्यथा ऐकून घ्यायला येथे कुणालाही वेळ नसतो. एखाद मशिनी प्रमाणे तिने फक्त शरीराची चाळणी करायची असते. म्हणूनच या जगात असं दु:ख कुठेच आणि कुणाच्याच वाटेला येऊ नये,अशीच प्रार्थना माझे मन कायम स्वरूपी करेल.
संपर्कासाठी –
सहेली, एच.आय.व्ही एड्स कार्यकर्ता संघ,
१०८९ बुधवार पेठ, शिवाजी रोड, पुणे ०२
दूरध्वनी ०२०-६५२८७२९७
मोबाईल : ९६७३८४३८०२
ई मेल sahelisangha@gmail.com
वेब साईट : http://www.sahelisangh.org/
fact