खेळण्या-बागडण्याच्या अजाण वयातील अनेक चिमुकल्या व्हाईटनरच्या नशेत आत्मघाताच्या मार्गाला लागल्या असून या भयंकर प्रकाराला समाज उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे विदारक चित्र जळगावात दिसून येत आहे.
ज्या वयात लहान मुली भातुकलीचा खेळ खेळतात त्या वयात जळगावात काही चिमुकल्या व्हाईटनरच्या नशेत झिंगत आहेत. गोलाणी मार्केेट, फुले मार्केट, रेल्वे स्थानक परिसरात तीन ते चार वर्षांच्या चिमुकल्या उघडपणे व्हाईटनरचा नशा करतात. बॉलपेनने लिहिलेले पुसण्यासाठी आपण ज्या व्हाईटनरचा उपयोग करतो ते मोठ्या प्रमाणात नशा येण्यासाठी वापरण्यात येत आहे. व्हाईटनरची बाटली आज चाळीस रुपयाला येते. या चिमुरड्यांची नशा करण्याची पध्दतही अनोखी आहे. त्या व्हाईटनर सोबत एक लिक्वीड असते, अगोदर एका छोट्या कापडी रुमालावर ते लिक्वीड टाकत ते तोंडाने ओढले जाते. त्यानंतर व्हाईटनरची शाई देखील त्याच पध्दतीने ओढली जाते. दिवसभरात एका जणाला दोन ते तीन व्हाईटनरच्या बाटल्या लागतात. यामुळे यांचा दररोजचा सरासरी खर्च ८० रुपये आहे. हा खर्च भागवण्यासाठी ते भिक मागतात. चारचौघात उभ्या असलेल्यांसमोर किळसवाणा प्रकार करुन पैसे घेत असतात. या नशा करणार्या प्रत्येकाची एक वेगळी टोळी आहे. साधारण सात ते आठ जणांची ही टोळी एकत्र फिरत असते. सर्व जण एकत्रच पैसे मागत असतात, चाळीस रुपये जमले की, व्हाईटनर आणले जाते आणि मग थोड्या-थोड्या प्रकारे सर्वच जण नशा करतात. बर्याचदा तर यांच्याजवळ पैसे जमत नाही, त्यावेळेस काही दुकानदार यांना चक्क उधारही देतात. दिवसभर टप्प्या-टप्प्याने पैसे जमल्यानंतर यांची टोळी झिंगते. दिवसभर असा फुल-टू नशा केल्यानंतर एक वेळ तर अशी येते ते अक्षरश: जमिनीवर लोळतात. यांच्यासारखीच नशा करणारी मोठी मुले मारहाण करीत त्यांच्याकडून पैसे हिसकावीत असतात. यामध्ये काही बारा ते चौदा वयोगटातील मुलीदेखील आहेत. रात्रीच्या वेळेस बरेच गर्दुले त्यांच्या अब्रूवर हात टाकण्याचा प्रयत्न देखिल करतात किंवा काही जण १००-२०० रुपयाची लालच दाखवित आपल्या वासनेचा शिकार बनवू पाहतात. रेल्वे स्टेशनवर रात्री झोपायला गेले तर पोलीस मारहाण करतात तर बर्याचदा मुलगा असो की मुलगी यांचे लैगिंक शोषण केले जाते. यातुनच आपण बर्याच ठिकाणी नेहमीच नवजात अर्भक आढळल्याचे नेहमी ऐकत असतो.
या चिमुकल्यांना व्यसनाधिनतेकडे वळविणारी एखाद टोळी तर कार्यरत नाही ना अशी शंका आता येत आहे. कारण एकदा ह्या नशेची सवय झाल्यास ते कुठेही आणि कसेही काम करण्यास तयार होतात. भिक मागणे हा मोठा प्रकारचा धंदा होत चालला आहे. मोठ्या झाल्यानंतर या चिमुकल्यांना वाम मार्गाकडे वळविले जात असल्याचेही नाकारता येत नाही. मोठ-मोठ्या सामाजिक संस्था, राजकीय पुढारी फक्त मोठ्या गोष्टी करतात, पण या चिमुकल्यांना या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी कोणतीच संघटना आज जळगावात कार्यरत असल्याचे जाणवत नाही. जर हे असेच सुरु राहीले तर याची व्याप्ती वाढण्यापासून कुणीच रोखु शकत नाही आणि स्त्रीभ्रुण हत्येपेक्षाही मोठा आणि गंभीर नशेचा हा विषय समाजासमोर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
<प्रसिद्ध दिनांक १६ ऑक्टोंबर >