जळगाव जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महसूलमंत्री ना.एकनाथराव खडसे यांनी पुढाकार घेतल्यामुळे अनेकांना राजकीयदृष्ट्या पुनर्जीवीत होण्याची आयती संधी चालून आली तर अनेक जण यामुळे अस्वस्थ झाले. परंतु थेट नाथाभाऊंना विरोध करण्याची हिंमत सध्यातरी कुणी करेल असे चित्र आतापर्यंत नव्हते. परंतु तरी देखील अनेक जण खा.ईश्वरबाबूजी जैन यांच्याकडे आस लावून होते. परंतु विरोधी पक्षनेते असलेले नाथाभाऊ आपल्या विरोधकाला कसे जेरीस आणतात हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे आता सत्तेत असलेल्या नाथाभाऊंसोबत कोणी ‘दोन हात’ करेल ही शक्यता आजच्या घडीला जरा दुरापास्तच होती.तशात सागवान घोटाळा आणि महावीर पतसंस्थेतील गैरव्यवहार या दोन्ही गोष्टीमधील भविष्यातील अडचणी ओळखून नाथाभाऊंच्या सुरात सुर मिळविण्यापलिकडे बाबुजींच्याकडे सध्यातरी पर्याय नव्हता. विधानपरिषदेच्या वेळी देखील बाबुजींनी ‘मनिष माझे ऐकत नाही’ म्हणून अलगद बाजुला राहत यातून अंग झटकण्याचा प्रयत्न केला होता. आतादेखील ते याच प्रकारे आपण बिनविरोधसाठी तयार असलो तरी पक्षाचा/पदाधिकार्यांचा निर्णय असल्याने नाईलाज झाल्याचे ते सांगून स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करतील.
प्रस्थापितांनी बाजूला सरकत दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दिली जात असेल तर बिनविरोध करायला हरकत नाही, असे सांगून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी जिल्हा बँकेच्या बिनविरोध होणार्या निवडणुकीत बॉम्बगोळा टाकत राष्ट्रवादी स्वतंत्र पॅनल उभे करू शकते याचे संकेत दिले आहेत. अर्थात निवडणुकीला लागणारा भरमसाठ आर्थिक तरतूद लक्षात घेता अण्णांना पक्षातील अन्य नेत्यांनी पाठबळ दिल्याशिवाय ते असे बोलू शकतील असे शक्य दिसत नाही.त्यामुळे बाबुजींनी बंदुक सतिश अण्णांच्या खांद्यावर दिली की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातच आ. गुलाबराव पाटील हे देखील त्यांच्या साथीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही,शेवटी त्यांना देखील आव्हानीतील आव्हान परतून लावायचे आहे.यासोबत नाथाभाऊंशी थेट विरोध घेण्यापेक्षा चिमणराव पाटील व सतिश पाटील यांच्यातील वैर लक्षात घेता जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीत माशी शिंकणारच हे बाबुजी ओळखुन असावे. त्यामुळे त्यांनी सुरवातीच्या चर्चेदरम्यान नमतेच घेतले. परंतु आता बिनविरोध होत असतांना चिमणराव पाटील यांना पुन्हा बँकेत संधी नको, असा पावित्रा सतिश पाटलांकडून घेणे आज ना उद्या अपेक्षितच होता. कारण त्यांच्या तालुक्यात यावेळी सर्वाधिक ठराव त्यांच्या गटाचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बिनविरोधच्या चर्चेसाठी नेमलेल्या समितीच्या बैठकीपासून आण्णा लांबच राहीले.
आ.सतीश पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादी कार्यालयात चिमणराव पाटील यांच्यावर प्रत्यक्ष तर स्वकीय असणारे माजी ख़ासदार मोरे काका यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.त्यांच्या बोलण्यातून राष्ट्रवादीच्या गोटात या निवडणुकी संदर्भात बरेच काही ठरून गेले असल्याचे जाणवत होते.अर्थात बाबूजींना देखील ही बिनविरोध निवडणूक नाथाभाऊंच्या नेतृत्वात होत असल्यामुळे आतून नकोशीच वाटत होती.कारण महावीर पतसंस्थेचे जिल्हाबँके मार्फत घेतलेले कर्जाच्या मुद्द्यावरून नाथाभाऊ त्यांना भविष्यात कधीही अडचणीत आणू शकतील हे बाबूजी चांगलेच ओळखून आहेत. उगाचच आपली गुंडी दुसऱ्याच्या हातात ते कशाला येवू देतील.परंतु सध्याची राजकीय मजबुरी लक्षात घेता त्यांनी पध्दतशीरपणे आण्णांच्या खांद्यावर बंदुक ठेवली असल्याचे स्पष्ट आहे. कारण जिल्हा बँकेची निवडणुकीसाठी लागणारी मोठी आर्थिक तरतुदीचा शब्द त्यांनी दिल्याशिवाय सतिशअण्णा स्वतंत्र पॅनल तयार करण्याची योजना आखु शकत नाही. जिल्हा बँकेत मराठा नेत्यांचे असलेले प्राबल्य लक्षात घेता सतिश आण्णांना समोर आणून बाबूजी नाथाभाऊना जातीय गणितात अडचणीत आणू पाहत आहेत. यासर्वांसाठी भाजपमधील एक गट बाबूजींना अंतर्गत ताकद पुरवण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.कारण जिल्हाबँक बिनविरोध झाली तर नाथाभाऊ यांची जिल्ह्यावर पर्यायी राज्यावरची पकड यामुळे घट्ट होण्यास आणखी मदत मिळेल.दुसरीकडे आव्हाणीच्या वाळु ठेक्यावरून शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील व ना.खडसे यांच्यात सुरू असलेला वादाचा फायदा घेत बाबुजी त्यांना जवळ घेवू शकतात.कारण मंत्रीपद न मिळण्यामागे नाथाभाऊ यांनीच प्रमुख आडकाठी घातली असा गुलाबराव यांचा देखील समज आहे.शिवाय शासकीय मदतीत पद्धतशीरपने त्यांचा मतदारसंघ नाथाभाऊ यांनी लांब ठेवला होता.त्यावरून आ. गुलाबराव पाटील यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे. तसेच अमळनेरचे आ.शिरीष चौधरी हे देखील शड्डू ठोकुन तयार आहेत.त्यांची राजकीय प्रबळ इच्छाशक्ती बघता ते निवडणुकीतून माघार घेतील असे दिसत नाही.त्यांना भाजपच्या अनिल पाटलांचा विरोध असल्यामुळे ते देखील राष्ट्रवादीच्या गोटाकडून निवडणूक लढवू शकतात.अर्थात बाबुजींच्या गटाकडून खेळला गेलेला हा ‘मास्टर स्ट्रोक’ नाथाभाऊ कशा पध्दतीने परतवून लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.