‘‘हॅल्लो पुरोहितजी….अरे भाई आपके चोपडा शहर मे आया हू’’….‘‘वाघमारेजी बस पाच मिनिट मे पोहचा…!’’गत रविवारी प्रतापसिंग आणि माझी ही भेट शेवटची ठरेल याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता. नियती क्रूर असते हे ऐकून होतो परंतु ती एवढी निर्दयी असेल असे वाटले नव्हते. पत्रकारीतेसारख्या क्षेत्रात राहून देखील ज्याने आपले चारित्र्य प्रामाणिकपणे जपले, ज्याच्या तोंडून मी कधी कोणाची निंदा ऐकली नाही, असा साधा,भोळा आणि मृदभाषी प्रतापसिंग असा अचानक सोडून गेला यावर माझा विश्वासच बसत नाहीये. रविवारी प्रतापसिंग घरी घेवून गेला होता. त्याच्या खोलीसह संपूर्ण वाडा त्याने मला दाखविला. घरातून निघाल्या नंतर त्याच्या आईने मला ‘‘बेटा आते रहना’’…हे बोललेले वाक्य त्याचा मृतदेह पाहून काल सतत कानात घुमत होते. म्हणून की काय,शववाहिका निघत असतांना त्या मातेचा चेहरा डोळ्यासमोर आला अन अश्रुंनी आपली वाट स्वत:च शोधून काढली. सतत हसतमुखाने प्रत्येकाला भेटणारा आपला ‘प्यार सा प्यारा पुरोहित’ आपल्यातून निघून गेला हे, मन अजूनही मान्य करायलाच तयार होत नाहीये.
माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात मला समजून घेणारा आणि भावासारखी साठ देणाऱ्या एका जिवलग मित्राला मी काल कायमचे गमावले आहे.काल प्रतापसिंगचा मृतदेह पहिल्यानंतर त्याच्या सोबत घालवलेले सर्व क्षण डोळ्यासमोर उभे राहिले. चोपडा गेलो म्हणजे आपण कितीही नाही म्हटले तरी, तिथल्या फेमस हॉटेलची मिसळ प्रताप खाऊ घालायचा म्हणजे घालायाच. माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात या माणसाने मला खूप साथ दिली. या क्षेत्रात येवू पाहणार्या प्रत्येक नवख्या मुलाप्रमाणे मला देखील इलेक्ट्रानिक मिडियाचे प्रचंड आकर्षण होते. त्यावेळी प्रतापसिंगने माझी तळमळ पाहून माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. अनेकांकडे माझ्यासाठी शब्द खर्च केला. एक दिवस ‘युएनआय’ या वृत्तसेवा देणार्या संस्थेसाठी प्रतापसिंगने मला मुंबईला मुलाखतीसाठी पाठविले. माझे काम झाले परंतु इलेक्ट्रानिक मिडियातील ‘क म्हणता ढ’ माहित नव्हते. मुंबईहून परत आल्यानंतर बातमीची स्क्रिप्ट कशी लिहिता, ‘एफटीपी’ कसे करतात, इलेक्ट्रानिक मिडियामध्ये कशा प्रकारे बातमी कव्हर करावी या सर्व गोष्टी प्रतापसिंगने मला लहान भावासारखे शिकविल्या. आणि त्याच जोरावर मी साधारणत: युएनआयमध्ये वर्षभर काम केले. हे सर्व मला शिकवीत असताना त्याच्यात कधीही सिनिअर असल्याचा अविर्भाव जाणवला नाही. आज मी पत्रकारितेत स्थिरावण्याचे श्रेय प्रतापला दिले तर चुकीचे ठरणार नाही.
गावकरी परिवारातून बाहेर पडल्यानंतर आता करावे कोणत्या दैनिकात जावे याचा विचार करीत होतो. अनेक दैनिकांमध्ये जाण्याचा मार्ग होता.याचबाबत सल्ला घेण्यासाठी एकदिवशी प्रतापकडे चोपडा येथे गेलो. मी म्हटले ‘‘पुरोहितजी समझ नही आ रहा कहा जाऊ?’’ त्यावर त्याने मला ‘साईमत’मध्ये जाण्याच्या सल्ला दिला. माझ्या डोक्यात अनेक दैनिकांची नावे होती,परंतु प्रताप म्हणाला, ‘‘वाघमारेजी…आप इस पेपरमे ट्राय करो. आपके लिये बढीया रहेगा.’’ दोन तीन दिवसांनी जळगाव आलो सरळ गोलाणी मार्केट गाठले.एका दैनिकाच्या पायर्या चढत असतानाच प्रतापचे शब्द आठवले.कुणास ठावून पावले थांबली आणि सरळ साईमतकडे वळली. जर साईमतमध्ये आलो नसतो तर,कुठल्यातरी दैनिकात वार्ताहर म्हणूनच काम करीत राहिलो असतो. जीवनात उदरनिर्वाहासाठी वार्ताहरकीसोबत जोड धंदा करीत राहिलो असतो. किंवा या क्षेत्रातून बाद देखील झालो असतो. त्यामुळे माझे पत्रकारितेत स्थिरावण्यामागे प्रतापचा सर्वात मोठा हाथ आहे. आमची मैत्री साधारण १० वर्षा पासून. पण या काळात मी कधीही प्रतापला कुणा विषयी वाईट बोलताना ऐकले नाही.घरची परिस्थिती जेमतेम असतांना देखील त्याने कधी वेगळा मार्ग धरला नाही. कदाचित धरला असता तर २० पेक्षा अधिक वर्ष इलेक्ट्रानिक मिडियासारख्या प्रभावी क्षेत्रात राहून देखील त्याच्या घरची परिस्थिती बेताची राहिले नसती. प्रताप तसा खूप साधा आणि भोळा त्याच्या बोलण्यातूनच तो समोरच्याला आपला करून टाकायचा. बातम्यांबद्दलची त्याची तळमळ चांगल्या नवख्या रिपोर्टर देखील लाजवाण्यासारखीच असायची. पत्रकारितेत असून देखील तो कधी व्यसनाच्या आहारी गेला नाही. कमालीचा धार्मिक प्रवृतीचा असणारा प्रताप आपल्या दिवसाची सुरुवात भल्या मोठ्या पूजेनेच करायचा. घरात वयोवृद्ध वडील-आई यांचा तो एकमेव आधार आहे,याची पूर्णपणे त्याला जाणीव होती. म्हणून बिचारा सतत काहीतरी करण्यासाठी धडपडत असायचा अनेकदा त्याच्या बोलण्यातून ते स्पष्ट जाणवायचे.
मागील काही दिवसापासून त्याला छातीत त्रास जाणवत होता.आमचा दोघांचा मित्र अजय पालीवाल त्याला दवाखान्यात देखील घेवून गेला.डॉक्टरांनी त्याला ‘स्ट्रेस टेस्ट’ करण्याचा सल्ला दिला.परंतु राजस्थान येथे बहिणीकडे जावून आल्यानंतर तपासेल म्हणून त्याने ती गोष्ट अंगावरून काढली आणि तीच गोष्ट जीवावर बेतली. त्याचा मृतदेह पहिल्या बरोबर डोळे पाणावले आणि मी डॉक्टराना आणि लतीष जैन यांना कसे काय ? म्हणून विचारले, डॉक्टरांनुसार त्याला सिव्हीअर हार्ट अटक आला होता. हृदयाला रक्त पुरवठा करणार्या दोन्ही मुख्य व्हेन्स ब्लॉक झाल्यामुळे एका मिनिटात त्याचे हृदय बंद पडले. पत्रकार हा देखील इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे आपल्या कुटुंबियांच्या आनंदात आपला आनंद शोधत असतो. म्हणून तटपुंज्या पगार किवा मानधनात तो आपल्या पोटाला चिमटा घेत स्वतःचे दुखणे अंगावर काढत असतो. परंतु मित्रहो आपण आहोत तर कुटुंबाचा आनंद आहे.आपण या जगातून जाताना त्यांना कोणत्या दुखाच्या खाईत लोटून जाणार असतो याचा विचार करा. त्यामुळे मित्रानो,सर्वाना विनंती आहे आपल्या तब्येतीची काळजी घ्या. कामाचा तणाव देखील जास्त घेवू नका, नियमित वैद्यकीय तपासणी करीत रहा,छोटे असो की साधे कोणतेही दुखणे अंगावरून काढू नका कारण याच दुर्लक्षामुळेच आपण आपल्या प्रतापला गमावले आहे.