आमच्या ‘साईमत’च्या कार्यालयात गत रविवारी संडे क्लबमध्ये ‘ बोल ‘ हा पाकिस्तानी चित्रपट पहिला.मन सुन्न करणारा आणि समाजातील विदारेकतेवर एवढ्या परखड आणि स्पष्टपणे प्रकाश टाकणारा चित्रपट मी याआधी कधीहि पहिला नाही हे ठामपणे सांगू शकतो.इस्लाम आणि त्याची मूळतत्वे यावर कदाचित भारतात देखील कधी सिनेमा बनेल याबाबत मी शाश्वत नाही.पाकिस्तानातील लोकांच्या सामाजिक जीवनात भारतीय चित्रपट संस्कृतीचा प्रभाव या चित्रपटातून अधिरेखीत होतो.”खिला नही सकते तो पैदा क्यू किया ” , “भारत पाकिस्तान कि मॅच जबभी होती है,तब-तब पाकिस्तानी अल्लाह को, और हिंदुस्तानी भगवान को परेशान करना शुरू कर देते है !”,मारना पाप है तो पैदा करना पाप क्यो नही” असे या चित्रपटातील एकसे एक संवाद मनाला सुन्न करून हादरवून सोडतात.पाकिस्तान सारख्या धार्मिक कट्टरता जोपासणाऱ्या देशात असा सिनेमा तयार करणे म्हणजे मोठे धाडसच म्हणावे लागेल.ज्या देशात आजहि महिलांना शाळा शिकण्याची परवानगी देताना पालक नाक मूरडतात, मलाला सारख्या तरुणीला आपल्या शिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये लढा द्यावा लागतो.त्याच देशात असा चित्रपट…खरच सलाम आहे चित्रपट बनविणारयाला, या एका चित्रपटात अनेक विषय हाताळण्यात आले आहेत.आणि ते सर्व विषय धार्मिक कट्टरता वाद आणि सामजिक विषमतेवर आहेत.एकीकडे एकापाठोपाठ मुली जन्माला आल्याचे दु:ख आहे,तर दुसरीकडे मुलेच झाली म्हणून मातम करणारा बाप समाजाची दोन टोके आणि दोघांची दु:ख लैंगिक विषमतेवर आधारित ,खरच यालाच जीवन म्हणतात का ? आणि जीवनाचे सत्य हेच असेल तर यापेक्षा मोठे दु:ख काय ?असा प्रश्न मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. तृत्तीय पंथी मुल घरात जन्माला आल्यानंतर काय गहजब होतो.त्याचे जीवन आपल्या अपमानाचे कारण असल्याचा विचार करणारा बाप,आपल्या पोटी मुली जन्माला येतात याचे शल्य ठेवणारा बाप,त्याच मुली जन्मामुळे समाजात अपमानित होण्यापासून कसा वाचतो याची मांडणी भन्नाट आहे.त्याच बरोबर तृतीय पंथी जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या भावना या सर्वसाधारण मुलाप्रमाणे किवा मुली प्रमाणे असणे कसे स्वाभाविक असते,ते देखील उत्कृष्टपणे दाखविण्यात आले आहे.धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली परिवारातील लोकांना दाबून मारणारा आणि ज्या वेळी स्वतःच्या जीवावर बेतते त्यावेळी धर्माच्या नियमांचे सहज उल्लंघन करणारा कुटुंबप्रमुख आपल्याला या चित्रपटात दिसतो. ज्यावेळी आपण भारतीय सिनेमांमध्ये हिंदू धर्मावर टीका केली जाते,मुस्लीम किवा अन्य धर्मातील भंपकपणा,बुवाबाजी यांना दिसत नाही का ? असा आरोप करत लज्जा,ओह माय गॉड आणि पीके सारख्या सिनेमावर टीका करतो, त्याआधी टीका करणाऱ्या अश्या सर्व मित्रांना मी विनंती करेल कि,त्यांनी एकदा तरी ‘बोल’ हा चित्रपट पाहावा.माझ्यामते पीके सारखा सिनेमा भारतात आणि बोल सारखा सिनेमा फक्त पाकिस्तानातच तयार होऊ शकतो.कारण चुकीच्या गोष्टी तोच दाखवू शकतो ज्या तो पाहतो किंवा अनुभवतो.हिंदू आणि मुस्लीम धर्मातील अनेक चांगल्या गोष्टीचा कट्टरतावाद्यांनी आपल्या सोई प्रमाणे अर्थ लावून लोकांना धर्माध बनविले आहे.इस्लामच्या नावावर जिहाद असो कि,हिंदू धर्माच्या नावावर बुवाबाजी आणि अस्पृशता असो,धर्माच्या ठेकेदार आपल्या सोईसाठी धर्माचे सर्व निकष लावतात हे या चित्रपटातून सिद्ध होते.मित्रानो खरच एकदा हा चित्रपट आवर्जून पाहावा असाच आहे.