पत्रकारांना संरक्षण दिले तर समाजातील सर्वच घटक संरक्षण मागतील.भारतीय दंडविधान पुरेसे असल्याची प्रतिक्रिया विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी काल दिली.त्यांनी कोणत्या विषयाला अनुसरून हि प्रतिक्रिया दिली हे माहित नाही,यामुद्द्यावरून पत्रकारांमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत आणि ते स्वाभाविक देखील आहे.कुणाला निकम साहेब यांचे म्हणणे बरोबर वाटते तर,काहींच्या मते ते सपशेल चुकीचे बोलले,असो खर म्हणजे मला माझ्या पत्रकार मित्रांचा अभिमानच वाटतो,कारण समाजहितासाठी दोन्ही बाजूने विचार करणारी माणसे फक्त पत्रकारीतेतच भेटू शकतात या मतावर मी आता ठाम झालो आहे.अन्यथा कोट्यवधीची मालमत्ता असण्याचे निवडणुकीत शपथपत्र देणारे राजकीय नेते सभागृहात मानधन वाढीसाठीचा प्रस्ताव विनाचर्चेने व सर्वसंमत्तीने अवघ्या काही मिनिटात मंजूर करतात.सामान्य नागरिकाची कामे करणारी अधिकारी किवा त्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस दादाला ३५३ चे कलम वगळायचे सांगितले तर ते देखील एकवटून नाहीच म्हणतील.ते योग्य देखील आहे.दुसरीकडे समाजासाठी काम करणाऱ्या कुठल्याही क्षेत्रातील लोकांमध्ये असा विरुद्ध मतप्रवाह आपल्याला दिसून येणार नाही.एवढेच काय तर काही गरजू आणि गरीब लोकांसाठी वकिल,इंजिनिअर,डॉक्टर यांना आपल्या खाजगी क्षेत्रात दरमहा काही विशिष्ट मानधन मिळायला पाहिजे या मतावर मला नाही वाटत त्यांच्यामध्ये मतभेद होतील.अर्थात माझ्या पत्रकार मित्रांमधील हे मतभेद समाजहिताच्या दृष्टीनेच ते व्यक्त करीत आहे.कारण काहींना वाटते कि ,पत्रकारांना संरक्षण दिले तर ते मुजोर होतील आणि हे समाजहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही,तर काहींच्या मते संरक्षण दिले तर,पत्रकार आणखी परखड आणि निर्भीडपणे लिखाण करू शकतील.अर्थात दोन्ही प्रकारची मते ठेवणारी व्यक्ती समाजहिताच्या दृष्टीकोनातूनच विचार करीत आहे.म्हणूच मला माझ्या पत्रकार मित्रांचा अभिमान वाटतो.कारण आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्याबद्दल एवढी प्रामाणिकता खूप कमी लोक ठेवतात.एक प्रसंग याठिकाणी मला आवर्जून सांगावासा वाटतो घरकुल प्रकरणात निर्भीड लिखाणामुळे माझ्या एका पत्रकार मित्राला पोलीसाना संरक्षण द्यावे लागले होते.असे अनेक उदाहरण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे उदाहरण देता येतील.ठीक आहे काही चुकीच्या लोकांच्या प्रवेशामुळे पत्रकारिता आज बदनाम झाली असल्याचे मला मान्य आहे.परंतु हे सर्वच क्षेत्रात आहे,कोण छातीवर हात ठेवून सांगू शकतो कि,त्याच्या क्षेत्रात चुकीची लोक नाहीत.खुद्द निकम साहेब देखील मान्य करतील कि,आज वकिली क्षेत्रात देखील सर्वसामान्यसह गरिबांसाठी काम करणारी बोटावर मोजण्या इतकीच माणसे आहेत.खर तर आपला हा समाज चांगल्या लोकांवरच टिकून आहे,अन्यथा समाजात एवढ्या वाईट प्रवृत्ती असून देखील आपण जगतोच आहे ना ! माझे व्यक्तिगत मत आहे हे जग प्रेमावर चालते…द्वेषावर नाही.त्याच प्रकारे कुठलेही क्षेत्र हे त्यातील चांगल्या लोकांमुळेच समाजातील विश्वार्हता टिकवून असते.त्यामुळे लाचखोर अशी प्रतिमा असतांना देखील लोक आपली तक्रार पहिल्यांदा पोलिसांकडेच देतात.गल्लीतल्या गुंडाकडे जात नाही.अर्थात कुठल्याही अतिरेकाला माझा विरोध आहे तो आहेच. भारतीय दंडविधान पुरेसे असल्याचे मला देखील मान्य आहे,मग हे डॉक्टराना कायद्याचे संरक्षण देतांना हा विचार का कोणी मांडला नाही,अर्थात याचा अर्थ डॉक्टराना संरक्षण दिले यावर माझी काही हरकत आहे असा होत नाही.निकम साहेब दहशदवाद्याविरुद्ध लढतात म्हणून त्यांना आज झेड दर्जाची सुरक्षा आहे.किंबहुना ती देशहिताच्या दृष्ट्तीने आवश्यक देखील आहे.अनेक नेत्यांना धमक्या मिळाल्या तर त्यांना देखील सुरक्षा दिली जाते.मग त्याच दहशदवाद्याविरुद्ध आणि समाजकंटकाविरुद्ध लिहिणारया पत्रकारालाच मात्र वाऱ्यावर का सोडले जात आहे.या देशात प्रत्येकाला सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे. पत्रकार काय मागतो ? गुंडांपासून संरक्षण….! याचा त्याला अधिकार नाही का ? काही बोगस लोकांना याचा फायदा होईल किवा ते त्याचा दुरुउपयोग करतील म्हणून चांगल्या लोकांना मरू द्यायचे का ? आपले भारतीय संविधानच सांगते कि,हजार दोषी सुटले तर हरकत नाही मात्र, एक निरअपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये !