आपल्या या जगात अनेक रहस्य आहेत. अनेक कलाकृती अशा आहेत की,आजचे प्रगत विज्ञान देखील त्या कलाकृती तयार करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले गेले असावे, हे सांगू शकलेले नाही. काही दिवसापूर्वी माझे कुबेर समूहातील मित्र विनीत वर्तक यांची कैलास मंदिरासंबंधी एक अशीच पोस्ट वाचली. उत्सुकतेपोटी कैलास मंदिरासबंधी अधिक माहिती मिळवीत असतांना अचानक द्रेंकुयु (Derinkuyu) या भूमिगत शहरासंबंधीची माहिती समोर आली. त्यानंतर युट्युब आणि आंतरमायाजालवरील माहिती वाचून,बघून तर थक्कच झालो. एक-दोन नव्हे तर तब्बल १८ मजली एक अख्ख शहर आणि त्याचप्रकराची इतर ३६ शहरे जमिनीच्या २९० मीटर खाली साधारण ५ हजार वर्षापूर्वी वसलेले असल्याची आश्चर्यचकीत करणारी तथ्य समोर आली. जगाच्या पाठीवरील स्थापत्य कलाकृतीचा एक चमत्कारीत अविष्कार म्हणजे तुर्की या देशातील द्रेंकुयु हे शहर होय. या शहराला जागतिक वारसेचा दर्जादेखील मिळालेला आहे. यावरून आपण अदांज बांधू शकतात की, हे शहर किती महत्वपूर्ण असेल. मानवी इतिहासातील सर्वात कठीण,जटील आणि तेवढेच रहस्यमयी ‘स्थापत्य कले’चा नमुना याठिकाणी आपल्याला बघावयास मिळते.
तुर्कीमधील एनाटोलिया भागातील कायरेरी प्रांतात १९६३ साली द्रेंकुयु हे शहर जगासमोर आले. एकेदिवशी ५० वर्षीय मुस्तफा बोज्देमिर यांनी विकत घेतलेले जुने घर ते मजुरांच्या सहाय्याने डागडुजी करीत होते. घरातील तळमजल्यातील एक भिंत नवीन बांधकामा आड येत होती. म्हणून त्यांनी ती भिंत मजुरांना पाडण्याचे सांगितले. मजुरांनी भिंत पाडल्यावर त्यांना एक भुयार दिसले. थोडं आत गेल्यानंतर सर्व मजूरांचे डोळे उघडेचे उघडेच राहिले. कारण एक-दोन नव्हे तर भलेमोठे सुरुंगाचे भुयार त्याठिकाणी त्यांच्या नजरेस पडले होते. त्यानंतर भेदरलेल्या मुस्तफा बोज्देमिर यांनी पुरातत्व विभागाला तात्काळ माहिती देत बोलावून घेतले. पुरातत्व विभागाने जेव्हा खोदकाम सुरु केले तर संपूर्ण जगाचे लक्ष तुर्कीकडे ओढले गेले. तुर्कीच्या पुरातत्व विभागाला त्याठिकाणी एकदोन नव्हे तर तब्बल १८ मजली एक भलेमोठे शहर सापडले होते. या शहराचे अधिक उत्खनन केल्यानंतर पुरातत्व विभागाला आणखी काही आश्चर्याचे धक्के बसले. कारण उत्खनन करतांना या शहराच्या एका मजल्यातून जाणारी एक भुयारी सुरुंग साधारण ४ किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना तब्बल ३६ तशाच पद्धतीची शहरे सापडली. त्यामुळे तुर्की शहराच्या भूगर्भात द्रेंकुयु प्रमाणे अनेक अंडरग्राऊड शहरे असल्याचे समोर आले. त्यानुसार या भूमिगत शहरांमध्ये साधारण ५ ते १० लाख लोकं राहू शकतील एवढी क्षमता होती,असा अंदाज बांधण्यात आला. साधारण तीन वर्ष खोदकाम केल्यानंतर पर्यटकांसाठी ही शहरं खुली करण्यात आली.
द्रेंकुयु शहराची रचना
द्रेंकुयु हे शहर जमिनीखाली साधारण ६० मीटर खाली वसलेले आहे. सुरुवातीच्या संशोधनात माहित पडले की, हे शहर म्हणजे सुरुंगाचे एक जाळे असून त्याला १८ मजले आहेत. याठिकाणी साधारण एकावेळी २० हजार नागरिक राहू शकतील एवढी व्यवस्था आहे. हे शहर आताच्या एखाद रेसिडेंशिअल अपार्टमेंट प्रमाणे आहे. फरक एवढाच की रेसिडेंशिअल अपार्टमेंटमध्ये प्रत्येक मजल्यावर काही घरे येतात तर याठिकाणी प्रत्येक मजल्यावर एक नवीन शहर आहे. प्रत्येक मजला एका सामाईक उभ्या सुरुगांने जोडलेला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मजल्यावर उभ्या सुरुगांतून येणारी शुद्ध हवा तेथील प्राकृतिक वातावरण शुद्ध ठेवत होतं. अगदी शेवटच्या तळमजल्यावर देखील पहिल्या मजल्याप्रमाणेच शुद्ध हवा खेळत असते. २९० फुट जमिनीखाली आताच्या आधुनिक युगात प्रगत तंत्रज्ञान वापरल्याशिवाय राहणे शक्य नाही.
भूमिगत शहरातील सुविधा
या भूमिगत शहरांमध्ये प्रत्येक घरात स्वयंपाकगृह असून काही ठिकाणी विहिरी आहेत. तर काही किल्ले देखील आढळून आले आहेत. या शहरांमध्ये चर्च,शाळा आणि दुकाने देखील होती. या शहरातून बाहेर ये-जा करण्यासाठी तब्बल ६०० प्रवेशद्वार होती. तसेच याठिकाणी धान्य साठवून ठेवण्यासाठी स्वतंत्र गोडाऊन, तेल काढण्यासाठी स्वतंत्र,प्राण्यांसाठी गोठे एवढेच नव्हे तर दारू बनविण्याची देखील सोय करण्यात आलेली होती. आजच्या काळातील अवजड वाहने त्यावरून जाऊ शकतील,असे काही रस्ते देखील त्याठिकाणी होते.
भूमिगत शहरे बांधण्याचे रहस्य काय ?
तुर्कीत संशोधन करणाऱ्या अनेक संशोधकांनी या भूमिगत शहरांबाबत आपापली मत मांडली आहेत. एका गटाच्या मान्यतेनुसार नैसर्गिकआपत्ती किंवा बाहेरील आक्रमण झाल्यानंतर युद्ध काळात प्रजेला शत्रूपासून वाचवण्यासाठी हे भूमिगत शहरे बांधण्यात आली असावी. परंतु दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, याठिकाणी भूमिगत शहरांची पसरलेले जाळे आणि त्याठिकाणी असलेल्या सुविधा लक्षात घेता,ही शहरे नैसर्गिकआपत्ती किंवा युद्धकाळात बचावासाठी बांधण्यात आली असतील,हा सिद्धांत अमान्य केला. कारण या गटाच्या मान्यतेनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्यानंतर जमिनीवर मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे राहिले असते.त्यामुळे आक्रमण करते आपसूकच या शहराकडे आकर्षित झाले असते. नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार केला तर नैसर्गिक आपत्ती ही काही ठराविक काळासाठी असते आणि या सर्व शहरांची बनावट ही दीर्घकाळ राहण्याच्या हिशोबानेच करण्यात आली होती.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा सिद्धांत देखील लागू पडत नाही.
भूमिगत शहरे एलिअन्सने बांधली?
तुर्कीमधील भूमिगत शहरे ही परग्रहावरील प्रगत एलिअन्सने बांधली असावी असा देखील सिद्धांत मांडला जातो. कारण या शहरांची खोदकाम पद्धत किंवा आतील रचना लक्षात घेता. त्याकाळातील जगातील कोणत्याच कोपऱ्यातील मानवी संस्कृतीकडे अशा शहराचे निर्माण होईल अशी साधनं उपलब्ध नव्हती. विशेष म्हणजे जमिनीखाली १८ व्या तळ मजल्यापर्यंत कुठल्याही यंत्राशिवाय शुद्ध प्राकृतिक हवा पोहचवणे आजच्या काळात देखील शक्य नाही. मग त्याकाळात शुद्ध हवा एका उभ्या सुरुंगच्या माध्यमातून संपूर्ण १८ मजल्यांवर प्राकृतिक वातावरण कसं ठेवत होती. तसेच ही शहरे बांधताना आधी आराखडा तयार करावा लागला असेल. एवढा मोठा आराखडा कसा तयार करण्यात आला. साधारण २९० फुट जमिनीखाली खोदकाम केल्यानंतर निघालेली माती कुठं गेली. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम केल्यावर बाहेर मातीचे मोठे डोंगर उभे राहिले असते. ज्या तुर्कीच्या ज्या भागात या भूमिगत शहरे सापडली आहेत.त्याभागाची माती अत्यंत पातळ आहे. तसेच त्याभागात दगडांचे मोठे पहाड आहेत. त्यामुळे साधारण २९० फुट जमिनीखाली खोदकाम करतांना जमीन ढासळण्याची तसेच आजुबाजूचे पहाड कोसळण्याची भीती होती.परंतु हजारो वर्षानंतर देखील आजही ही भूमिगत शहरे मजबुतीने उभी आहेत. ही भूमिगत शहरे निर्माण करतांना कुठले तंत्रज्ञान वापरले हे अजूनही स्पष्ट होऊ शकेलेले नाही. त्यामुळे ही भूमिगत शहरे कोणी आणि का बांधली हे रहस्यच आहे. दरम्यान,स्थानिक नागरिकांच्या मान्यतेनुसार भविष्य काळात येणाऱ्या हिमकाळातून वाचण्यासाठी ही शहरे बांधण्याच्या सूचना त्यांच्या देवतांनीच पूर्वजांना दिल्या होत्या. दरम्यान, या भूमिगत शहरांची निर्मितीचे कारण आणि तंत्रज्ञानाचे सिद्धांत आजच्या आधुनिक काळातही कोणताही पुरावा किंवा तर्क-सिद्धांतानुसार देखील सिद्ध करता येणे शक्य नाहीय. दरम्यान, उत्खननात काही मानवी सांगाडे देखील मिळाले होते. दगड आणि मानवी सांगाडे याचा अभ्यास केल्यानंतर ही सर्व शहरं साधारण ई.स. ७८०-११८० या कालखंडात बांधली गेली असावी असा अंदाज आहे. परंतु या शहरांमध्ये सापडलेल्या कलाकृती व चित्रांवरून ही शहरे ५०० बी.सी. या कालखंडातील देखील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ या शहराला स्थापत्य कलेचा अद्भूत आणि चमत्कारिक नमुना मानतात.