कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेना-भाजपा यांच्यात कधी नव्हे ते एवढे टोकाचे वाकयुद्ध रंगले. अगदी युती तुटते की,काय अशी परीस्थिती दिसू लागली.दोघं पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर मतदारदेखील त्यांच्या भांडणात रस घेवू लागला.या निवडणुकीत असे चित्र निर्माण करण्यात आले जणू ही निवडणूक फक्त सेना-भाजपाच एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. शिवसेना-भाजपच्या नेतृत्वाच्या अपेक्षे प्रमाणेच सर्व घडत होते.एरवी दोंघांचे भांडण तिसर्याचा लाभ ,असे आपण म्हणतो; परंतु या लढाईत दोघांचे भांडण अन फायदापण दोघांचाच झाला.युती तोडून राज्यातली सत्ता गेली तरी चालेल, असा आवेश दाखवत मतदारांना बुचकळ्यात टाकण्याचा त्यांचा दोघांचाही हेतू होता.संभ्रमात पडल्यामुळे मनोमन भाजपचा निष्ठावान असलेला मतदार भाजपसाठी , तर शिवसेनेशी निष्ठावान असलेला मतदार शिवसेनेशी व्याकुळ होत पक्का झाला ! आणि त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये दोघांच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या.
मुळात ’कॉंग्रेसमुक्त भारत’ ही संकल्पना संघाच्या डोक्यातून आलेली आहे.अनेक दिवसापासून त्यादृष्टीने नियोजनदेखील सुरु होते.देशात पूर्णपणे हिंदुत्वाचा अजेंडा कॉंग्रेस देशात आहे,तोपर्यंत शक्य नसल्याचे संघ ओळखून आहे.भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यात सर्वात मोठा अडसरदेखील कॉंग्रेसच राहणार आहे.शिवसेना नेतृत्वाला पण पहिल्यांदा संघाचे गणित उमगले आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी पण भाजपला चांगलेच अंगावर घेतले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे राहणारे असल्यामुळे त्यांना निरोपाची गरज नव्हती.त्यामुळे त्यांनी संघाचा अजेंडा बरोबर राबविला.तू थोडे मारल्यासारखे कर…मी थोडे रडल्यासारखे करतो…! याप्रमाणे सेना-भाजप सरकार केंद्रासह राज्यात आपला कार्यकाळ पूर्ण करेल, यात सध्यातरी काही शंका नाही.परंतु उद्धव ठाकरे हे आजच्या घडीला शरद पवार यांच्यानंतर सर्वात धूर्त नेते असल्याचे मला वाटते त्यामुळे ते सरकारचा कार्यकाल ४ वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर पाठींबा काढून,परत एकदा कल्याण-डोंबिवली निवडणुकीप्रमाणे आपल्या अवती-भवती राज्याची निवडणूक रंगविण्याचा प्रयत्न करून जणू राज्यात भाजपाला फक्त शिवसेनाच खमक्या विरोधक आहे, असे दाखवतील.भाजपाला पण नेमके असेच राजकीय वातावरण त्यावेळी अपेक्षित राहील.मुळात या विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपा-सेना काही दिवसआधी लवकर वेगळे झाले असते तर,किमान मुंबई,पुणे,नाशिकसह नागपुरमधील अनेक जागांचे निर्णय बदलले असते.आगामी ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीतदेखील हे दोन्ही पक्ष याचपद्धतीने एकमेकावर टोकाची टीका करत कार्यकर्त्यामध्ये यामाध्यमातून एक नवा जोश भरण्याचा प्रयत्न करतील आणि ’कॉंग्रेसमुक्त भारत’ या संकल्पनेची चाचपणीदेखील पुन्हा एकदा तपासून घेतली जाईल.
संघ आगामी लोकसभा आणि मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या सोबतच्या नैसर्गिक मित्रांसोबत महाराष्ट्राप्रमाणेच भांडण करतील आणि निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसवरून लोकांचे लक्ष हटविण्याचा प्रयत्न करतील.यातून कॉंग्रेस एकूणच संपल्याचे चित्र निर्माणदेखील करण्यात येईल,यासाठी भले संघाला काही काळासाठी आम आदमी पक्ष किंवा त्यांच्या स्थानिक मित्र पक्षाची स्वतःहून शक्ती वाढू द्यावी लागली तरी ते तसे करतील.कल्याण-डोंबिवलीप्रमाणे राज्यातील अन्य निवडणुुका सेना-भाजपा याप्रमाणेच लढण्याची शक्यता आहे.शिवसेना सत्तेत राहून विरोधकाच्या भूमिकेत लोकांसमोर येत आहे.महागाई असो की,दुष्काळ,शेतकरी आत्महत्या; सर्व मुद्यांवर शिवसेना प्रचंड आक्रमक आहे.त्यांच्या तुलनेत विरोधी पक्ष असलेले कॉंग्रेस,राष्ट्रवादी फिके पडल्यासारखे आहे.एकांदरीत राज्यात विरोधीपक्ष संपल्यासारखी परिस्थती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करायचे, एकदा का लोक आपले भांडण पाहावयाला लागले की,आपसूकच मानवी स्वभावाप्रमाणे आजुबाजुच्यां वास्तवावरुन लक्ष विचलित होते.याप्रकारची समूह मानसिकतेशी खेळी खेळून आपला उल्लू सीधा करायचा आणि लोकभावनेचे राजकारण करून राजकीय फायदे उचलायचे अशा प्रकारचे राजकारण सध्या भाजप-सेनेकडून खेळले जात आहे.कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीनंतर या दोघं पक्षांची सत्तावाटपाबाबत एका दिवसात नरम पडलेली भाषा लोकांना बुचकळ्यात टाकणारी आहे.त्यामुळे भविष्यात लोक अशी दिखाऊ भांडणाची राजकीय चाल सहज ओळखू शकतील, हा भाग वेगळा.तूर्त तरी त्यांचे राजकरण यशस्वी होत दोघांचे भांडण अन दोघांचाच फायदा झाला हे स्पष्ट झाले आहे.