‘देवा आसं कसं मन, आसं कसं रे घडलं?
कुठे जागेपनी तूले आसं सपन पडलं!’
जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा परीमार्थ बहिणाबाईंच्या कवितेतून समजून घेत आयुष्याला समृद्ध करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य जळगावकर पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर देशविघातक (‘अॅन्टीनॅशनल’) कृत्याच्या कलंकाला सामोरे जातोय. यावल तालुक्यातील साकळी येथून दोन तरुणांना नुकतेच एटीएसने अटक केली असून त्यांच्याकडून स्फोटकं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे धर्माची कट्टरविचार धारा असणारे तरुण चुकीच्या मार्गावर गेल्याचे, हे पहिलेच उदाहरण नाहीय. कधीकाळी ‘सिमी’ नामक विद्यार्थ्यांसाठी काम करणारी इस्लामिक संघटनेचे नंतर दहशतवाद्यांसोबत लागेबांधे असल्याचे उघड झाले होते. त्याच पद्धतीने कट्टर हिंदुत्व विचारधारेच्या नावाखाली देशात रक्तरंजित संघर्षाची तयारी सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा एटीएसने केलाय. वेगवेगळ्या विचारधारेकडून देशाची अंतर्गत सुरक्षा पोखरण्याची लिंक जळगावातच येऊन जुळणे आणि जिल्ह्यातील तरुणांचा ‘अॅन्टीनॅशनल’ कृतींमध्ये समावेश असणे, ही निश्चितच जळगावकरांसाठी भूषणावह बाब नाहीय. यामुळे प्रत्येकवेळी जळगावकरांना शरमेने मान खाली घालावी लागते. याबाबत आता गंभीररित्या विचार करून उपाययोजना करण्याची वेळ निश्चितच आली आहे.
कधीकाळी विद्यार्थी संघटन आणि नंतर दहशतवादी ठरलेल्या ‘सिमी’ या संघटनेच्या माध्यमातून कट्टर इस्लामिक विचारधारा रुजवून भारतात अराजकता माजविण्याचा प्रयत्न झाला होता. ९० च्या दशकात जळगाव शहरातील काही तरुणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून अनेक आक्षेपार्ह वस्तू आणि स्फोटक पावडर देखील जप्त केली होती. नागपूर येथे आरएसएस आणि व्हीएचपी या संघटनाच्या कार्यालयाबाहेर ठेवण्यासाठी जळगावात बॉम्ब तयार करण्यात आल्याचे माहित पडल्यानंतर तर अवघा देश प्रचंड हादरून गेला होता. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे आणि निषेध करण्यात आला होता. अटकेतील मुलांच्या पालकांनी देखील आधी देश आणि नंतर नातं-गोतं, अशी देशाभिमानी भूमिका घेतली होती. सुरुवातीला अनेक पालकांना आमच्या मुलांना अटक का आणि कशासाठी केली? हे देखील माहित नव्हते. आज देखील राष्ट्रीय तपास यंत्रणा अधून-मधून ‘सिमी’शी संबंधित लोकांची झाडाझडती घेतच असतात.
यावल तालुक्यातील साकळीचा गॅरेज व्यावसायीक वासुदेव भगवान सूर्यवंशी याच्यासह त्याचा मित्र विजय उर्फ भैया उखर्डू लोधी या दोघांच्या बाबतीत ही असेच काहीसे घडले आहे. हे दोघं जण धार्मिक संघटना असणाऱ्या ‘सनातन’चे ते साधक असल्याचा आरोप आहे. एटीएसने अटक केल्याच्या आठवडाभरा नंतरही दोघांच्या पालकांना नेमकं काय सुरु आहे, याची काहीच माहिती नाहीय. आपल्या पोरांना का अटक झाली? हे देखील त्यांना नीट सांगता येत नाहीय. परंतु एटीएसने वासुदेव आणि विजयला अटक करण्यापूर्वी त्यांच्या घरातून अनेक कागदपत्रांसह गावठी बॉम्ब देखील जप्त केल्याचे कोर्टात सांगितल्यामुळे अवघ्या जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र सुन्न झालाय. कथित हिंदू विरोधी लोकं या दोघांच्या रडारवर असल्याचे देखील एटीएसचे म्हणणे आहे. खरं-खोटं काळाच्या ओघात स्पष्ट होईलच. परंतु ‘अॅन्टीनॅशनल’ कृत्यांमध्ये पुन्हा एकदा जळगावचे नाव समोर आल्यामुळे या गोष्टीचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे.
मुळात जळगावसारख्या संवेदनशील जिल्ह्यात अवघी काही हजार लोकवस्ती असलेल्या खेड्या गावात दोन तरुणांच्या घरात बॉम्बसारखे घातक पदार्थ सापडणे. तसेच काही विचारवंतांच्या हत्येत त्यांचा सहभाग असल्याचे बोलणे जाणे, हे पोलीस विभागातील गुप्तचर विभागाचे मोठे अपयश आहे. या दोघांचा जळगावात देखील घातपात करण्याचा इरादा होता. त्यासाठीत्यांनी बॉम्ब बनवावेत किंवा कुठून तरी आपल्या घरी आणावेत, ही अत्यंत गंभीर आहे. या गोष्टी एटीएसकडून कोर्टात उघड करण्यात आल्यामुळे जळगावकरांची चिंता वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील कुठल्या व्यक्ती किंवा संस्था यांच्या रडारवर होत्या? या माहितीचा उलगडा अद्याप झालेला नाही. मुळात जळगाव सारख्या छोट्या जिल्ह्यातील काही तरुण इतके मोठे षड्यंत्र रचताय, याची साधी भनक लागू नये, हे स्थानिक यंत्रणांचे मोठे अपयश आहे.
२००९ मध्ये अशाच एका कट्टरपंथीय संस्थेच्या सदस्याला भुसावळ रेल्वे स्थानकावरून महाराष्ट्र एटीएसच्या टीमने गोवा बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केली होती. ऑक्टोंबर २००९ मध्ये गोव्यातील मारगाव येथील ग्रेस चर्च मार्गजवळ कमी क्षमतेचा बॉम्बस्फोट झाला होता. त्यात एनआयएने पाच जणांना अटक केली होती. तर बॉम्बस्फोट घडवून आणणारे दोघे त्यात मयत झाले होते. त्यानंतर ३१ जुलै २००९ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसचे तत्कालिन प्रमुख राकेश मारीया यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत मारीया यांनी सांगितले होते की, पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीकडून ७.६५ एमएम गावठी पिस्तूल देखील जप्त केले असून बिहारपासून पोलिस त्याच्या मागावर पोलीस होते. तसेच अटक केलेल्या व्यक्तीनेच गोव्यात बॉम्बस्फोट करणाऱ्या आरोपींना प्रशिक्षण देखील दिले होते. तसेच आयईडी (इंप्रोवाईज्ड एक्प्लोझीव्ह डीवाईस डेटोनेटर) आणि टायमिंग डीवाईस त्याच पध्दतीने लष्करी प्रशिक्षण देखील घेतले असल्याचे सांगितले होते. जळगाव जिल्ह्याला अनेक प्रकारच्या दहशतवादी संघटनांच्या कारवाईचा काळा इतिहास आहे. त्यात ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेमुळे तर जळगावचे नाव अवघ्या देशात बदनाम झाले होते. मध्यंतरीच्या काळात इसीसच्या नावानेही धमकी पत्रे मिळाली होती. तसेच नक्षलचळवळीबाबत देखील अधूनमधून वावड्या उठत असतात. भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणात जिल्ह्यातील अमळनेर येथील एका व्यक्तीची चौकशी झाल्याचे वृत्त देखील समोर आले होते.
‘सिमी’चे प्रकरण उघड झाल्यानंतर काही जणांनी निष्पाप पोरांना विनाकारण गोवल्याचा आरोप केला होता. त्याच पद्धतीने आता देखील काही जण साकळीच्या तरुणांना निर्दोष मानत आहेत. खरं म्हणजे आपण या गोष्टींकडे फक्त आणि फक्त राष्ट्राची अंतर्गत सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. अशा घटना किंवा व्यक्तींना धर्म-जातीचे किंवा संघटनांची लेबल लाऊ नयेत. मुळात वसुधैव कुटुंबकम म्हणणारा माझा धर्म, सहिष्णूतेची सांगड घालणारा माझा धर्म, दुसऱ्या धर्माचा सन्मान करणारा माझा धर्म, प्रेम आणि सहजीवन यावर विश्वास ठेवणारा माझा धर्म, अशीच आपली भूमिका कायम असली पाहिजे. नाही तरी भारतात जात, धर्म वगळून न्याय देण्याची परंपराच आहे.
‘बहुसांस्कृतिकता’ हे भारतीय समाजाचे अभिन्न अंग आहे. ‘विविधतेत एकता’ हीच आपल्या देशाची मूलभूत ओळख जगभरात प्रसिद्ध आहे. ‘विविधतेत एकता’ ही भारतीयांची मुख्य ओळखच नव्हे तर खरी शक्ती देखील आहे. आपल्या देशात विविध जाती, धर्म, भाषा, बोली, पेहराव असल्यानंतरही भारतीय संविधान देशातील नागरिकांना भारतीयत्वाच्या धाग्याने एकात्म ठेवते. म्हणूनच आज जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा बिरूद आपण जगात मिरवून घेत असतो. कुठल्याही कारणांच्या अधारे व्यक्तिभेद करणे संविधानाला मान्य नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांसह संविधान समानतेचा आग्रह धरते. त्यामुळे आपल्या देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था पोखरणाऱ्यांना कोणत्याही संवर्गात मोडून पाठराखण करू नका.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या काव्यातून साने गुरुजींनी मूल्याधिष्ठित जीवनाचा सार अवघ्या मानव जातीला समजावून सांगितला. परंतु माझ्या जळगावचा तरुण का भरकटतोय? याचा विचार आपण कधी करणार आहोत? माझ्या मते आज जळगावमधील तरुणांना समुपदेशनची नितांत गरज आहे. अन्यथा धर्माच्या नावावर देशद्रोही तयार करण्याचा कारखाना फुलत राहील आणि आपले जळगाव अशाच पद्धतीने पुन्हा-पुन्हा बदनाम होत राहील. त्यामुळे विविध धर्म आणि जातीच्या नावावर, अशा विकृत लोकांकडून जळगावच्या तरुणांना भरकटवण्याचा प्रकार भविष्यातही सुरूच राहण्याचा धोका आहे. त्यामुळे ‘जात,धर्म नव्हे आम्ही राष्ट्र’ ही संकल्पना कायम ध्यानात ठेवा.
जय हिंद !
टिप – अॅन्टीनॅशनलिस्ट लोकांना जात, धर्म नसतो. त्यांच्या अंगात असते फक्त धार्मिक, जात, संवर्ग किंवा कट्टर विचारधारेची विकृती असते आणि या विकृतीचे समर्थन करणे हे देखील फक्त एखादं विकृतालाच जमू शकते. त्यामुळे संघटना कुठल्याही जाती- धर्माची अथवा विचारधारेची असो, परंतु आपल्या देशाची अंतर्गत सुरक्षाव्यवस्था पोखरणारे देशद्रोहींपेक्षा कमी नसतात, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.