साधारण दोन-तीन दिवसापूर्वी नेहमी प्रमाणे बातम्या ऐकत असताना अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर व कॉ.गोविंद पानसरे यांचे मारेकरी संमोहित होते, असा खळबळ जनक आरोप प्रा.श्याम मानव यांनी केल्यानंतर थोडा हबकलो कारण यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली होती. यावेळी त्यांनी नुसते दाभोळकर नव्हे तर कॉ.गोविंद पानसरे या दोघांच्या मारेकर्यांना संमोहित करण्यात आले असल्याचा आरोप केला होता.त्यामुळे आरोपी पकडले गेले तरी त्यांच्याकडून संपूर्ण माहिती मिळविणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. संगणकाच्या मेमरीतून एखाद गोष्ट डिलीट करावी त्याच पद्धतीने संमोहित झालेल्या व्यक्तींच्या डोक्यातून संपूर्ण हत्येचा कट हा डिलीट केला गेला असल्याची थेअरी त्यांनी मांडली. यामुळे मनात कुतूहल निर्माण झाले की,खरच एखाद व्यक्तीला संमोहित करून कुणाचा खून करण्यासारखे गंभीर कृत्य करून घेता येत असेल का ? संमोहनाबाबत थोडी फार माहिती होती… पण अशा प्रकारची थेअरी पहिल्यांदा ऐकत होतो. त्यामुळे साहजिकच याविषयी थोडा अभ्यास अभ्यास करावा असे वाटले.
त्यामुळे नेहमी प्रमाणे गुगलवरून अनेक संदर्भ तपासले,मित्रांसोबत थोडी चर्चा केली.यातून संमोहन शास्त्र भन्नाट असल्याचे समजले परंतु समजात त्याबाबत गैरसमज अधिक असल्याचे देखील जाणवले. आपल्या अंतर्मनाशी संपर्क साधण्याच्या शास्त्राला संमोहनशास्त्र असे म्हणतात.संमोहनशास्त्रचे दोन प्रकार आहेत.पहिला स्वयंसंमोहन आणि दुसरा बाह्यसंमोहन असा आहे. बाह्यसंमोहन या प्रक्रियेत एखाद व्यक्ती आपल्या स्वइच्छेने संमोहित होतो.तर स्वयंसंमोहन प्रकारात व्यक्ती स्वतःला संमोहित करतो. बाह्यसंमोहनाच्यावेळी दुसरी व्यक्ती एखाद्याला आपल्या प्रभावी सूचनांव्दारे बाह्यमनास कृत्रिम निद्रावस्थेत नेऊन त्याला संमोहीत करतो आणि त्यातून आपल्या मनाचे एक-एक पडदे उघडत जातो. संमोहन हे आपल्या इच्छेशिवाय होवूच शकत नाही. त्यामुळे मला कोणीही संमोहित करू शकत नाही असा ज्यांचा समज आहे किंवा ज्यांची इच्छा नाही त्यांना संमोहित करणे अशक्य आहे.परंतु ज्यांचे मन चंचल आहे त्यांना संमोहित करणे काही प्रमाणात शक्य आहे.थोडक्यात एकमेकाला सहकार्य केल्याशिवाय संमोहन करणे किवा होणे शक्य नाही.संमोहनाच्या चार अवस्था असतात.त्यात प्रथम हलकी,मध्यम,गाढ व अतिगाढ अवस्थेचा समावेश आहे.यातील गाढ आणि अतिगाढ अवस्था या फार कमी लोकांना प्राप्त होतात.अगदी शंभर पैकी १० टक्के लोक म्हटली तरी योग्य ठरेल.अतिगाढ गाढ अवस्थेत संमोहित व्यक्तीवर शस्त्रक्रिया देखील केली जाऊ शकते.या अवस्थेत संमोहित व्यक्ती पूर्णपणे सूचनांच्या अधीन असतो.या अवस्थेत संमोहित व्यक्ति ही संमोहनकाराच्या पूर्ण नियंत्रणाखाली असतो या परीस्थितीत त्याला आजुबाजूचे कोणतेही भान राहत नसले तरी,मूळ स्वभावाच्या विरुद्ध अथवा संमोहित व्यक्तीच्या नैतिकतेच्या विरुद्ध तो सूचनांचे पालन करीत नाही.संमोहित अवस्थेतून बाहेर आल्यावर या अवस्थेची आठवण देखील राहत नाही. संमोहनामध्ये संमोहीत करणारा व्यक्ती कुणालाही आपल्याला हव्या तशा सुचना देवून आपल्याकडून दुष्कृत्य करवून घेवू शकतो, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. संमोहित व्यक्तीच्या नैतिकतेच्या विरूद्ध कुठलीही सुचना दिल्यास त्याची संमोहन अवस्था भंग पावण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दाभोळकर किंवा पानसरे यांच्या मारेकर्यांना संमोहीत करून खून करण्यात आले, ही गोष्ट या शास्त्राच्या चौकटीत बसत नाही. संमोहीत व्यक्तीच्या इच्छेशिवाय संमोहीत अवस्थेत त्याच्याकडून कुठलेही कृत्य करून घेणे अशक्य असते. अर्थात या गोष्टीसाठी संमोहीत व्यक्तीच्या मुळ स्वभाव किंवा प्रवृत्ती कारणीभूत असते. त्यामुळे पानसरे किंवा दाभोकर यांचे मारेकरी गुन्हेगारी मानसिकतेचे असल्याशिवाय त्यांच्याकडून असे कृत्य कदापी शक्य होणार नाही. प्रा.मानव यांच्या म्हणण्या नुसार मारेकरी संमोहित असल्याचे मान्य केले तरी त्यांच्या इच्छेविरूद्ध ते संमोहीत होणे शक्य नाही.मारेकरी हत्या करतांना संमोहन निद्रेच्या अतिगाढ अवस्थेत असले असे आपण गृहीत धरले तरी, त्यांना मग भर रस्त्यात सुचना कोण देत होते. कारण अशा अवस्थेत थेट सूचना दिल्याशिवाय संमोहित व्यक्तीकडून एवढी मोठी कृती होणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना सूचना देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे देखील आवश्यक ठरेल. सामान्य अवस्थेत परत आल्यावर संमोहीत अवस्थेतील गोष्टी संमोहीत झालेल्या व्यक्तीला काही प्रमाणात का असेना आठवतात मात्र जरूर. त्याला स्वप्न पाहील्यासारखे पुसटशे आठवते. कारण संमोहीत व्यक्तीवर संमोहीत अवस्थेत सुद्धा त्याच्या अंतर्मनाचे त्याच्यवर नियंत्रण असते. संमोहन शास्त्रात काही जणांचे हे मानने आहे की, संमोहीत अवस्थेत एखाद व्यक्तीला दिलेल्या सुचना नंतर विशिष्ट शब्द (अर्थात कोड) उच्चारल्या शिवाय त्याला काही ठराविक गोष्ट आठवू शकत नाही त्यामुळे प्रा.श्याम मानव यांची थेअरी प्रथमदर्शी आपण मान्य केली तरी मारेकर्यांच्या इच्छेशिवाय त्यांचे संमोहन कसे शक्य झाले. मारेकरी हे स्वच्छेने संमोहीत झाले असतील तर त्यांना संमोहीत करणार्यांची नावे किंवा चेहरा १०० टक्के लक्षात राहील. त्यामुळे मारेकरी पकडून देखील उपयोग होणार नाही,असे म्हणने माझ्या दृष्टीने तरी चुकिचे ठरेल. दरम्यान शाम मानव यांनी इतक्या दिवसानंतर दाभोळकरांच्या खुनासंदर्भात ही नवीन थेअरी का मांडली या दृष्टीने तपास होणे देखील गरजेचे आहे.त्यांना मारेकरी संमोहित होते हे कोणी सांगितले, त्यांनी हा तर्क कोणत्या मुद्द्याच्या आधारे लावला याची माहिती घेणे देखील गरजेचे आहे.
Wa Viju dada very nice