आयुष्यात पहिल्यांदा पत्रकार नव्हे,तर एक पोलीस बॉइज म्हणून लिहतोय.पोलीसांचा पोरगा असून देखील बहुतांश बातम्या पोलीस दलाविरुद्ध द्याव्या लागतात.खरं म्हणजे मला देखील अशा बातम्या देतांना आनंद नाही होत, परंतु काय करणार कुठल्याही परीस्थित कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचे संस्कार पोलीस खात्यातूनच माझ्यावर झाले आहेत.पोलीस कर्मचारी म्हणून कितीही त्रास झाला असेल तरी माझ्या वडिलांनी कधी कामावर राग काढल्याचे मला आठवत नाही.लहानपणी पोलिसाचा पोरगा म्हणून कधी फौजदाराचा साधा बंगला बघण्याची संधी मिळाली नाही.परंतु काल आयपीएस दर्जाचा अधिकारी पोलिसांच्या पोरांना आपल्या घरी बोलवून काही आनंदाचे क्षण त्यांच्या सोबत घालवत असल्याचे बघून मन भरून आले.कार्यक्रम सुरु असतांना वडिलांची खूप आठवण आली.कारण त्यांच्या काळात आम्ही असं काही अनुभवलं नव्हतं. कार्यक्रम संपून घरी परतल्यावर वडिलांच्या फोटोकडे बराच वेळ बघत बसलो.सर्व बालपण डोळ्यासमोर आले.बालपणी अधिकाऱ्याकडून जो आपलेपणा मिळाला नाही तो एका कार्यक्रमात अनुभवला.त्यामुळे मनापासून थॅक्यू… कराळे साहेब ! थॅक्यू… व्हेरी मच !
जळगावचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बालदिनाचे औचित्य साधून आपल्या बंगल्यावर पोलीस पोलीस बॉइजसाठी खास कार्यक्रम ठेवला होता.माझे वडील पोलीस खात्यात कार्यरत होते,तेव्हा किती तरी दिवस फौजदार म्हणजेच पोलीस दलाचा प्रमुख असा समज होता.साहेबाच्या घरी कार्याक्रमाला जाणे म्हणजे दुर्मिळच…च्या…मारी दुर्मिळ काय शक्यच नाही.पोलीस अधीक्षक दर्जाचे अनेक अधिकारी बघितले.अनेक जण आपली जुनी ओळख लपवितात.किंबहुना आपला भूतकाळ लपविण्यात धन्यता मानतात.परंतु मी एका काॅन्सटेबलचा पोरगा असल्याचे ज्या अभिमानाने कराळे साहेब कार्यक्रमादरम्यान पोरांना सांगत होते,तेव्हा माझी पण कॉलर अभिमानाने टाईट होत होती.
पोलीस लाईन…म्हणजे प्रत्येक पोलीस बॉइजचा जीव की प्राण ! आयुष्यात पहिल्या मित्रांपासून तर जीवनातील प्रत्येक आठवणीचे बीज याच ठिकाणी रोवले जाते.प्रत्येक पोलीस बॉइजच्या आयुष्यातल्या अनेक गोड आठवूनी याठिकाणी जुळून असतात.मी स्वतःहा आजही जळगाव मुख्यालयातील १४४ कडून अनेकदा मुद्दाम ये-जा करतो.आई -बाबांसोबत राहत असलेल्या खोलीकडे बऱ्याचदा बघतो.अनेकदा विचार करतो,एकदा पुन्हा त्या बिल्डींगमधील आपल्या खोलीत जावे.कदाचित माझे वडील आणि माझं बालपण पुन्हा भेटेल.परंतु शहाणे होण्याचे नुकसान सोसावेच लागणार.आजच्या घडीला पोलीस लाईनमध्ये अनेक सुविधा आहेत.प्रत्येक घरात स्वत्रंत्र नळ,संडास वगैरे…वगैरे परंतु काही वर्षापूर्वी असे नव्हते.प्रत्येक लाईनची काॅमन संडास आणि नळ असायचा.कौलारू घर,जमिनीवर कोटा किंवा स्पारटेक नव्हे तर शेणाने घर सारावे लागायचे.आईला घर सारण्यासाठी गावातून शेन गोळा करून आणून देणे म्हणजे आम्हा मित्रांचा रविवारचा खेळ असायचा.फुटलेले कौल बदलविण्यासाठी आख्खी पोलीस लाईन पालथी घालून ज्या खोलीत कोणी राहत नाही,तेथील कौल काढून आपल्या घराचे कौल बदलविताना वेगळीच मजा यायची.अशा अनेक गमतीशीर कामांमुळे पोलीस लाईनमधील दिवस कसा सुरु व्हायचा अन् संपायचा ते कळायचेच नाही.खरचं मंतरलेले दिवस होते.ते सर्व आठवले की आजही कंठ दाटून येतो.
सकाळी शाळेसाठी लवकर उठून जाण्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे सार्वजनिक संडासची असायची.ड्युटीला जाण्याच्या घाई-गडबडीत लाईनीतले बरेच काका असायाचे तर दुसरीकडे आम्हा पोरांची शाळेत जायची घाई.नशीब त्यावेळी भारत स्वच्छ अभियान नव्हते.त्यामुळे आम्ही पोरं कुठही संडासांच्या मागं-पुढं मोकळी व्हायचो. खरं म्हणजे याच ठिकाणी सर्वात जास्त गमती जमती व्हायच्या.थंडीच्या दिवसात पोलीस लाईनीत प्रत्येक घरामागे बंब लावलेला असायाचा.आपल्या बंबात पाणी गरम नसल्यास शेजारच्या कोणत्याही काकुच्या बंबातून गरम पाणी चोरून आणत पटकन आंघोळ करायची मजा तर काही औरच होती.या कारणातून लाईनीत कायमच कुरबुर सुरु रहायची.
आमची पोलीस लाईन म्हणजे आमच्यासाठी अख्खा देशच.याठिकाणी कोणी हिंदू-किंवा मुस्लीम,दलित नसायचा.पोलीस लाईनीत फक्त पोलीस ही एकच जात आणि धर्म रहायचा.प्रत्येक सण हा प्रत्येक घरात असायाचा.गणपती जेवढ्या धूम-धामने बसायचा तेवढ्याच जल्लोषात ईद देखील मनवली जायची किंबहुना हे सण आजही पोलीस लाईनमध्ये अशाच पद्धतीने मनवले जात असतील.गणपती-देवी किंवा इतर सणांना संपूर्ण गावात बंदोबस्त असायचा परंतु आमच्या लाईनीतल्या सणांना कधी बंदोबस्ताची गरज पडली नाही आणि पडणारही नाही.
असं नाही की,आमच्यात सारचं आलबेल असायचे.आमच्यातही राडा व्हायचा परंतु आम्ही मुलं किंवा आमची आई आमच्या बापा पर्यंत कधीच विषय जाऊ द्यायची नाही.गेला तर मग खैर नसायची,कारण ‘थर्ड डिग्री’ आम्ही बऱ्याचदा अनुभवलेली असायची.त्यामुळे आपआपसातच भांडण मोडण्यावर आमचा अधिक भर असायचा.”माझ्या बापाचा स्वभाव जरा गरम आहे ,नाही तर तुला दाखवलं असतं बेटा!” एवढं बोलून विषय मोडून मोकळे व्हायचो. एका घरात असून देखील वडिलांची भेट तशी दुर्मिळच असायची,वडील रात्री उशिरा घरी यायचे त्यावेळी आम्ही झोपलेले तर सकाळी शाळेत जाताना वडील झोपलेली असायचे.परंतु कालच्या कार्यक्रमात वडिलांची खूप आठवण आली.एक गाणं सुरु असतांना डोळे देखील पाणावले.घरी गेल्यावर किती वेळ तर वडिलाच्या फोटोकडे एक टक बघत होतो.
कराळे साहेबांनी पोलिसांच्या पोरांना बालदिनानिमित्त एक स्वप्न दिलय.जर त्यांना अधिकारी होणे शक्य आहे तर कोणताही पोलीस बॉइज अधिकारी होऊ शकतो.अपयशी माणूस परिस्थितीच्या आड लपतो.म्हणून पोलीस लाईनमध्येच राहून आपला एक पोलीस बॉइज जर पोलीस अधीक्षक होऊ शकतो तर मी का नाही? असा प्रश्न प्रत्येक पोलीस बॉइज कालच्या कार्यक्रमानंतर घेऊन गेला.मित्रांनो फक्त इच्छाशक्तीला प्रयत्नांची जोड द्यायची गरज आहे.जिह्यातील काही पोलीस बॉइज तरी कराळे साहेबांनी दिलेलं स्वप्न पूर्ण करतील असा मला विश्वास आहे.आमच्या सारखी मंडळी फक्त आपल्याला धन्यवादच म्हणू शकते. थॅक्यू… कराळे साहेब ! थॅक्यू… व्हेरी मच अगेन !