तृतीयपंथी समुदायाविषयी अनेक समज-गैरसमज आपल्या समाजामध्ये दिसून येतात.न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील अजूनही समान दर्जा मिळण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे. तृतीयपंथींविषयी समाजातील कथित सभ्य माणसांच्या मनात विनाकारण आकस, द्वेष, चीड, घृणा असते. तृतीयपंथी ज्या पद्धतीने कुणालाही अडवून पैसे उकळतात, मनासारखी रक्कम न दिल्यास विचित्र हातवारे किंवा हावभाव करतात, त्यामुळे त्यांच्याबद्दलची किळस किंवा हीन भावना वाढीस लागल्याचे कारण सांगितले जाते. परंतु त्यांना न्यायिक हक्कांपासून डावलल्यामुळेच उपजीविका भागवण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात,हे मात्र सभ्य समाज सोयीस्करपणे विसरतो.खरं म्हणजे तृतीयपंथी समुदाय आजही तथाकथित सभ्य समाजासाठी ’एलियन्स’ अर्थात परग्रही ठरतो.मुळात ते आपल्यासारख्याच हाडामासाची माणसे आहेत, हे आजही स्विकारले जात नाही,हीच खरी शोकांतिका आहे.त्यामुळे तृतीयपंथी समुदायाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक,राजकीय तथा मोठ्या उद्योग समूहांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक वर्तन हे त्याच्या शरीररचनेवर अवलंबून असते.प्रत्येक व्यक्तीची लैंगिक ओळख ही त्याच्या पोशाख व लैंगिक वर्तनानुसार ठरत असते.परंतु एखादं व्यक्ती अशी असते की, त्याचे किंवा तिचे वर्तन शाररिक रचनेतील लिंगाला अनुसरुन नसते.विरुद्ध लिंगी वर्तनामुळे त्यांना स्वतःचे लैंगिक अस्तित्व समजण्यास अडचण येते.असे वर्तन असणारी व्यक्ती, स्वतःला पुरुषलिंगी/ स्त्रीलिंगी किंवा आणखी तिसर्या लिंगाची असू शकते. ती व्यक्ती त्याच लिंगाच्या वर्तनास अनुसरुन वावरत किंवा विचार करत असते,असे वर्तन असणार्या व्यक्तींमधे अनेक प्रकार आढळतात. काही व्यक्तींना शाररिक रचनेने पुरुष असूनही स्त्रीवेश परीधान करणे आवडते व हीच खरी स्वतःची ओळख असल्याचे ते मानत असतात. तृतीयपंथी व्यक्तींना सतत वाटत असते की ते चुकीच्या शरीरात जन्माला आले आहेत. काही व्यक्तींच्या शरीर रचनेत जन्मतः पुरुष व स्त्री या दोघांचेही अंग असतात अशा प्रकाराला हर्माफ्रोडायटीस Hermaphrodites असे म्हणतात. हिजडे व तृतीयपंथींना व्यक्तींना सुप्रीम कोर्टाने ‘तिसरे’ लिंग म्हणून मान्यता दिली आहे.त्यामुळे त्यांना शिक्षण, नोकरी आदी ठिकाणी सामाजिक हक्क मिळतील असा समज होता.परंतु समाजाच्या मानसिकतेत आजही काडीमात्र बदल झालेला नाही.त्यातल्या त्यात आनंदायी बाब एकच की, त्यांना आपले लिंग स्त्री वा पुरूष असे लिहिणे आता बंधनकारण राहिलेले नाही.ते आता तृतीयलिंगी व्यक्ती म्हणून कायदेशीररित्या वैध मार्गाने जीवन जगण्यासाठी मोकळे झाले आहेत. अर्थात कायदेशीर लढाईनंतर समाजाने स्वीकारले का? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही नाहीच असेच आहे.परंतु कायदेशीर बंधनामुळे ऑफिस,शाळां,कॉलेजांमध्ये तृतीयपंथी म्हणून प्रवेश मिळु लागला आहे,ही सुखावह बाब आहे.
तृतीय पंथी/हिजडा म्हणजे कोण ?
हिजडा म्हणजे शरीर पुरुषाचे आणि वेषभूशा आणि लैंगिक भूमिका स्त्रीप्रमाणे असते. अशा व्यक्तींना तृतीयपंथी किंवा छक्का असेही म्हणतात.शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे एखादं व्यक्ती हा जन्मजात तृतीयपंथी म्हणून जन्माला येतो.ज्योतिष शास्त्रानुसार वीर्याच्या अधिकतेमुळे पुरुष तर रज (रक्ताच्या) अधिकप्रमाणामुळे कन्याप्राप्त होते.तर वीर्य आणि रजच्या सारख्या प्रमाणामुळे तृतीयपंथी अर्थात हिजडा जन्माला येतो,अशी मान्यता आहे. एखादं बालक आईच्या उदरातून जसा अधू, अपंग, अंध, बहिरा असं शारीरिक व्यंग घेऊन जन्माला येतो,त्याचपद्धतीने लैंगिक विकलांग असणारेही मुलं जन्माला येतात.त्यांना आपण हिजडा किंवा किन्नर म्हणतो.परंतु आता तृतीयपंथी समुदायाला ‘लैंगिक विकलांग’ अशी व्याख्या देखील वापरली जाते. तृतीयपंथी ज्यावेळी पूर्णपणे आपली खरी लैंगिक ओळख समाजासमोर आणतो.त्यावेळी त्याला विधिवत पूजा करून आपल्यातले पुरुषत्व त्यागावे लागते.याचा वैद्यकीय उपचार प्रचंड पिडादायी असतो.काहीजण पारंपारिक पद्धतीने तर काही जण नवीन वैद्यकीय पद्धतीने शस्त्रक्रिया करून घेत तृतीयपंथी होतात.या शस्त्रक्रिये नंतर पारंपारिक विधी करून त्यांना गुरु स्वीकारावा लागतो.
निसर्ग तृतीयपंथ विकास फाऊंडेशन
एक तृतीयपंथी असूनही समाजासाठी काही करता यावे,या प्रामाणिक भावनेतून जळगाव जिल्ह्याचे नायक सरदार गुरु सविता जान उर्फ काली आपा तसेच तमन्ना जान गुरु सविता जान उर्फ जगन मामा यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच निसर्ग तृतीयपंथ फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.अनेक तृतीयपंथी भीक मागून स्वतःचा चरितार्थ चालवितात, लाचार होतात. कारण पोटाची भूक मोठी असते. सहजासहजी कोणी भीक देणार नाही म्हणून काही तरी सोंग करावे लागते. परंतु आपल्या साथीदारांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या फाऊंडेशनचे काम सुरु होणार आहे.या फाऊंडेशनच्या माध्यमातून तृतीय पंथी व्यक्तींसाठी शाळा, वैद्यकीय मदत करण्याचा मानस आहे. तसेच अनाथ व गरीब आदीवासी मुलींचे लग्न करण्याचा विचार आहे. या फाऊंडेशनला आमदार व खासदार निधीतून निधी मिळाल्यास तृतीय पंथी समुदायासाठी हौसिंग सोसायटी निर्माण करण्याचाही निसर्ग विकास फाऊंडेशनचा मनोदय आहे.
गोदावरी टीआय/ एमएसएम प्रकल्प
शासनाच्या सर्वेक्षणानुसार एडस् किंवा एचआयव्हीचे प्रमाण सर्वाधिक तृतीयपंथींच्या माध्यमातून पसरत असतो.त्यामुळे शासन टीआय/एमएसएम प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात राबवीत असते. टीआय म्हणजे ट्रान्सजेंडर (लिंगपरिवर्तीत) आणि एमएसएम म्हणजे समलिंगी सबंध ठेवणारे.अशा व्यक्तींसाठी जळगाव शहरात गोदावरी टीआय/एमएसएम प्रकल्प ही संस्था महाराष्ट्र शासन एडस् कंट्रोल सोसायटीच्या अंतर्गत २००७ पासून काम करत आहे.सुरुवातीला याठिकाणी १५ कर्मचारी/स्वयंसेवक काम करीत होते.परंतु शासनाच्या अनास्थेमुळे आता फक्त ७ जण याठिकाणी काम करतात.ही संस्था तृतीयपंथी किंवा समलिंगी संबंध ठेवणार्या व्यक्तींमध्ये एड्सबाबत जनजागृती करते.तसेच त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करणे किंवा त्यांना कंडोम वापराचे महत्व पटवून सांगत असते. या संस्थेमार्फत दरमहा साधारण १५ ते १६ हजार कंडोमचे मोफत वाटप केले जात असते.सध्या या प्रकल्पात १ प्रकल्प व्यवस्थापक,७ समन्वयक,समुपदेशक १ तर बाह्यसंपर्क ठेवणारे २ असे एकूण ११ जण कार्यरत आहेत.वास्तविक जिल्ह्यातील समलिंगी आणि तृतीयपंथींची संख्या लक्षात घेता,ही संख्या फारच कमी मानली जाते. या संस्थेकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात साधारण ६५० समलिंगी संबंध ठेवणारे (एमएसएम), ट्रान्सजेंडर (लिंगपरिवर्तीत) ५० व्यक्ती आहेत.तर तृतीयपंथी अर्थात हिजडे २०० आहेत.ही शासकीय आकडेवारी आहे.परंतु आपली ओळख उघड होऊ न देणारे किंवा शासकीय रेकॉर्डवर नाव नसलेल्यां समलिंगींची संख्या साधारण २ हजाराच्या घरात आहे. संस्थेच्या कार्यालयात दर तीन महिन्यानंतर एसटीआय अर्थात गुप्तरोग तपासणीसाठी साधारण ३०० जण येत असतात त्यात साधारण ५० ट्रान्सजेंडर/तृतीयपंथी असतात. तर उर्वरित समलिंगी संबंध ठेवणारे असतात.
डॉक्टर आणि समुपदेशकांचे सहकार्य
जिल्ह्यात आजच्या घडीला ५७ समलिंगीसंबंध ठेवणारे तर ३० तृतीयपंथींना एचआयव्हीची लागण झालेली आहे.जळगाव शहरातील डॉ.अशोक रावेरकर,डॉ.प्रकाश महाजन व डॉ.योगेश बसेर हे शासनाच्या अनुदान किंवा मानधनाची वाट न बघता तृतीयपंथी किंवा समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांवर मोफत उपचार करीत असतात.नियमित तपासणी व उपचाराचा त्यामध्ये समावेश आहे. सध्या शहरात दिनेश डाकने, अंजली जान गुरु संजना जान व आदिल पटेल समुपदेशकचे काम उत्कृष्टपणे करीत आहे.त्यामुळे तृतीयपंथी व समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांमध्ये लैंगिक आजारांचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
सामाजिक हक्कासाठी लढा
जिल्ह्यातील काही तृतीयपंथी उच्च शिक्षित आहेत. परंतु त्यांना कोणीच काम देत नाही किंवा कामावर ठेवत नाही.त्यामुळे आपली उपजीविका भागविण्यासाठी त्यांना मनाविरुद्ध अनेक गोष्टी कराव्या लागतात. परंतु आपल्या सामजिक हक्क मिळवण्यासाठी आज हा समुदाय जागृत झाला आहे.जळगाव शहरातील तृतीयपंथी बांधवांनी वेगळे रेशनकार्ड, मतदार यादीत नाव यासह स्मशानभूमी मिळावी म्हणून एकत्रित येत लढा दिला होता.त्यामुळे त्यांना जिल्हाधिकारी यांनी भुसावळ रोडवरील टीव्ही टॉवरजवळ जागा देण्याचे कबूल केले आहे. दुसरीकडे बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कर्ज उपलब्ध करून दिल्यास या समुदायास स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मोठी मदत होऊ शकते. लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास या समुदायासाठी जागा उपलब्ध करून देत हाऊसिंग सोसायटी निर्माण करणे सहज शक्य आहे.
तृतीयपंथी समुदायातील ‘गुरु आणि घराणे’
आजच्या घडीला तृतीयपंथींमध्ये सात प्रमुख घराणे आणि त्यांचे गुरु आहेत.त्यात दय्यार,लष्कर,चखला बाजार,खैर गल्ली,जोगती,दिल्लीवाले,भेंडी बाजार यांचा समावेश आहे.यात सर्वात महत्वाचे स्थान दय्यार यांना आहे.आर्थिक न्याय निवाडा ,सामाजिक पद देण्याचे अधिकार दय्यार घराण्याकडे आहेत.राजस्थानमध्ये या समुदायातील तृतीयपंथी कायम घुंघट घेऊन असतात.ते कुणालाही आपला चेहरा दाखवीत नाही किंवा कुणाचाही चेहरा बघत नाही. लष्कर,दिल्लीवाले, चखला बाजार,भेंडी बाजार,खैर गल्ला हे समुदाय प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम करून बधाई मागणे हा व्यवसाय करतात. तर जोगती समुदाय पुजारी (देवदासी)काम करीत असतो. आजच्या घडीला तृतीयपंथी समुदायावर मुस्लीम धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतो.किंबहुना विधिवत तृतीयपंथी बनण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागतो,अशी मान्यता आहे.परंतु तृतीयपंथीला जात-धर्म नसतो.तो फक्त तृतीयपंथीच असतो,अशीच मानसिकता त्यांच्यात असते.म्हणूनच सर्व जाती धर्माच्या देवी-देवतांची पूजा ही मंडळी करीत असते.दरम्यान,तृतीयपंथी समुदाय आपल्या कमाईतील तीन हिस्से धार्मिक कामासाठी दिले जातात.त्यात मशीद,मंदिर आणि गोशाळेसाठी दान देत रीतसर पावती घेत असतात.
सविता जान उर्फ काली आपा मुख्य गुरु
आजच्या घडीला जळगाव जिल्ह्याचे प्रमुख गुरु सविता जान उर्फ काली आपा हे आहेत.दय्यार समुदायाने त्यांच्याकडे जिल्ह्याचे नायक सरदार हे पद दिले आहे.त्यानंतर तमन्ना जान गुरु सविता जान उर्फ जगन मामा हे दुसर्या स्थानावर आहेत.गैरवर्तन किंवा चुकीची गोष्ट करणार्या समुदायातील कुठल्याही व्यक्तीला दंड आकारण्याचा अधिकार यांच्याकडे आहे.त्यामुळेच या दोघांविषयी जिल्ह्यातील तृतीयपंथी समुदायात आदरयुक्त स्थान आहे.
जगनमामाचा समाजासमोर प्रेरणादायी आदर्श
लहानपणापासून तृतीयपंथी असल्यामुळे कमालीचा अपमान सहन केल्यानंतर देखील सविता जान उर्फ जगनमामा यांनी तृतीयपंथी समुदायासह कथीत सभ्य समाजासमोरदेखील एक आदर्श निर्माण केला आहे.जगनमामा यांनी तीन अनाथ मुलांचे भविष्य घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. यातील एका मुलीचे त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात लग्न लावून दिले तर अन्य दोन मुलांना चांगल्या बोर्डींग होस्टेलमध्ये ठेऊन संपूर्ण शिक्षणासह इतर खर्च करीत आहे. त्यामुळे व्यक्ती हा जन्माने नव्हे तर आपल्या कर्तृत्वाने आदर्श निर्माण करतो हे जगनमामा यांनी आपल्या कृतीतून सिध्द केले आहे. निसर्ग तृतीयपंथी फाऊंडेशनच्या माध्यमातून आपल्या समुदायाला न्याय मिळवून देण्यासाठी जगनमामा विशेष आर्थिक नियोजन करण्याचा मनोदय राखून आहेत. तृतीयपंथींच्या अनेक अडचणी आजही जगनमामा सोडविण्यासाठी अग्रेसर असतात.दुसरीकडे सामाजिक कामातही जगनमामांचा बडेजावपणा न करता सहभाग असतो.
अंजलीचा जीवनातील संघर्षपूर्ण लढा
अंजली जान गुरु संजना जान या तृतीयपंथीने २०१५मध्ये जळगाव जिल्ह्यातील भादली गावात निवडणूक लढली होती.अवघ्या ११ मतांनी तिला पराभव स्वीकारावा लागला होता.पराभव झाला तरी त्यातून एक चांगली गोष्ट समोर येते,ती म्हणजे आपला समाज आता तृतीयपंथींना स्वीकारत आहे.अंजलीने मोठ्या संघर्षातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.अंजलीने अनेकांना आपल्या गोदावरी टीआय/एमएसएम प्रकल्पाच्या माध्यमातून रेशनकार्ड तसेच पेन्शनचा हक्क मिळवून दिला आहे. दुसरीकडे जळगाव शहरात एका सुज्ञ आणि संवेदनशील व्यक्तीने एका तृतीयपंथीला आपल्या नाश्त्याच्या हातगाडीवर कामावर ठेवले आहे.ही गोष्ट फार छोटी वाटत असली तरी समाजाच्या मानसिकतेतील बदल दर्शविणारी आहे.अशा छोट्या गोष्टींमधूनच उद्याचा लैंगिक भेदभाव विरहित असलेला समाज निर्माण होण्यास मदत होणार आहे.
Great News Sir