राजकारणी आणि कथित समाज सेवक कितीही गप्पा मारत असले तरी देशात स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आपला देश महिला व मुलींसाठी आपण पूर्णपणे सुरक्षित करू शकलेलो नाही, हे उघड सत्य आहे. त्यामुळे स्त्री स्वातंत्र्यांचा मुद्दा तर फारच गौण ठरतो. ज्या देशात आजही आवडीचा जोडीदार निवडला म्हणून मुलीचा खून होतो, त्या देशात ‘ती’ च्या गरजा आणि लैंगिक स्वातंत्र्यांला विचारतय कोण? मुळात लैंगिक उत्तेजना आणि सेक्स फक्त पुरुषाचीच मक्तेदारी मानण्याचा समज आपल्या देशात दृढ आहे. त्यामुळे महिलांचे स्वातंत्र्य फक्त दिखाऊ असेच आहे. कारण स्त्रीने तिच्या लैंगिक गरजा उघड उघड सांगण अजूनही आपल्या समाजाला फारसं रुचत नाही. म्हणून ‘ति’ आणि त्याच्या लैंगिक स्वातंत्र्याचे काय? असा प्रश्न विचारला तर बिघडले कुठे?
सलमान खान शर्टलेस होऊन नाचला तर काय बॉडी…काय सिक्स पॅक आहेत. तर सनी लियोनीने ब्रा,पॅंटीवर कंडोमची जाहिरात केली, तर किती अश्लीलता…किती हा पांचटपणा. रणवीर कपूरने चित्रपटात हावभावसहित हस्तमैथुनवर बोलला तर कॉमेडी आणि स्वरा भास्करने हस्तमैथुनचा सीन दिला तर भारतीय संस्कृती ढासळल्याची ओरड.
एक आई आपल्या बाळाला स्तनपान करत असल्याचा फोटो एका मॅग्झीनमध्ये छापून आला तर काही बिनडोक मादकता आणि अश्लीलता पसरवत असल्याची तक्रार घेऊन थेट कोर्टात पोहचतात. परंतु उभारलेल्या लिंगासहीतची अंडरपॅटची जाहिरातीवर हे संकृतीचे रक्षक मुग गिळून गप्प असतात.
लैंगिक ताकदीवर पुरुषत्व सिद्ध करण्याची विकृती अलीकडील काळात अधिकचीच वाढीस आली आहे. वास्तविक आपल्या भारतात मुलींना लहानपणापासूनच शिकविले जाते की, आपल्या शरीराचा कुठलाही उघडा भाग पुरुषांना लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करतो. त्यामुळे ‘ब्रा’ची स्ट्रीप, लॅगीजमधून पॅंटीचा शेप किंवा ड्रेस, टी-शर्टमधून क्लीवेज दिसणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यायची. दुसरीकडे मुलाने जीन्समधून अंडरपॅंटची पट्टी बाहेर ठेवणे किंवा शर्टचे बटन उघडे ठेऊन छाती दाखविणे मात्र, फॅशन म्हटली जाते.
मुलगा अर्धनग्न अवस्थेत अंडरपॅंटवर अंगणात फेरफटका मारू शकतो. कितीही मोठा टेंपा झाला तरी तो शाॅर्टपॅंट घालून उघड्या मांड्यावर गावभर हिंडू शकतो. रस्त्याच्या बाजूला कुठेही लघुशंका करू शकतो. परंतु मुलींनी तरी देखील कुठल्याही परिस्थितीत खालची मान वर करून बघू नये, कारण तसं केले तर ते चारित्र्यहीनतेचे लक्षण आणि अनैसर्गिक मानण्याची प्रथा आहे आपल्याकडे.
मुलाने मुलीच्या छाती किंवा नितंबाकडे एक टक कितीही वेळ पाहिले तरी चालते. त्यावर अश्लील प्रतिक्रिया दिली तरी हरकत नसते. आजकालची पोरं वायबार झाली हो…म्हणून आपण विषयाचे गांभीर्य क्षणात गुटख्याच्या पिचकारी प्रमाणे थुंकून मोकळे होतो. मुळात आपल्या देशात पुरुषी लैंगिक गरज स्वाभाविक तर महिलेला लैंगिक संवेदना उमटू न द्यायचे संस्कार आहेत.
एवढेच काय तर लग्नानंतर पुरुष कधीही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा पूर्ण करू शकतो. परंतु कोणतीही महिला आपल्या पती म्हटल्या जाणाऱ्या जीवनसाथीला देखील आपली लैंगिक इच्छा स्पष्ट शब्दात व्यक्त करू शकत नाही. स्त्रीने तिच्या लैंगिक गरजा उघड उघड सांगण अजूनही आपल्या समाजाला फारसं रुचत नाही. किती हा विरोधाभास. अरे…स्त्री आणि पुरुषाच्या बाह्य शरीराची फक्त रचना वेगळी आहे. परंतु निसर्गाने दोघांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा सारख्याच ठेवल्या आहेत ना !
कुठलीही गोष्ट झाकून,लपवून ठेवली तर तिला बघण्याची, जाणून घेण्याची उत्सुकता तिव्रतेने वाढणार हे मानसशास्त्रीय सत्य आहे. एखादं घराच्या दरवाज्यावर ‘ फटीतून आत बघू नये’ एवढे लिहिले तर दुसऱ्याच दिवशी तुमच्या लक्षात येईल की, हजारो लोकं त्या घरात ढुंकून-ढुंकून बघताय म्हणून. या आधी त्या घराकडे कुणाचे लक्षही नसायचे. परंतु आता लिहिलेय ना…मग लोकं मुद्दाम बघणारच.
यासाठी पालकांनी आणि शासनाने देखील लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत आता सकारात्मक विचार केला पाहिजे. आजच्या बदलत्या काळात ही गोष्ट अत्यावश्यक झाली आहे. तुम्ही लैंगिक ज्ञान जितके झाकून ठेवाल, तेवढ्याच तिव्रतेने मुलं ते जाणून घेण्याचे मार्ग शोधतील. कदाचित ते मार्ग मोबाईल, टी.वीच्या माध्यमातून तुमच्या मुलांना ‘पोर्न अॅडीक्ट’ करण्यास पुरेसे असतील.
मुलाचा पहिला नाईटफॉल आणि मुलीची पहिली पाळी या गोष्टी मानवी शरीरातील हार्मोन्स बदलाचे संकेत आहेत. त्यामुळे शरीरात हार्मोन्समुळे होणारे बदल मुलांना समजावून सांगणे आज खूप गरजेचे झाले आहे. ती गोपनीय किंवा लपवून ठेवण्यासारखी मुळीच बाब नाही. शेवटी सेक्सशी निगडीत प्रत्येक गोष्ट नैसर्गिक आहे. मुलांच्या मनात त्याविषयी न्यूनगंड निर्माण होण्याआधीच योग्य वयात मुलांना शरीरातील प्रत्येक बदल आणि त्याच्या गरजा समजावून सांगणे आवश्यक आहे.
भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे. त्यामुळे आपल्या देशातील बलात्कार रोखायचे असतील तर मुलींना पडद्यात ठेवण्यापेक्षा मुलांवर संस्कार आणि लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. अन्यथा कठूंआ, मंद्सोर, निर्भया अशा विकृत घटनांची रांग दिवसगणित वाढतच राहतील.
100%right
सध्याचा काळ लक्षात घेता या शिक्षणाची आणि संस्काराची अत्यंत गरज आहे . जेणेकरुन सध्या समाजात घडत असलेल्या विकृत घटनांना आळा बसेल.