का गं … तुने… ‘ब्रा’ ला बाहेर उघड्यावर वाळी घातलय, तुझ्या ‘ब्रा’ ची स्ट्रीप दिसतेय, कशी मुलगी आहे, हिला काहीच सेन्स नाही, किती मूर्ख आहे, सफेद कपड्यांवर काळी ब्रा घातलीय, असे वाक्य भारतीय मुलींना नेहमीच ऐकायला मिळतात. एवढेच नव्हे तर, सार्वजनिक ठिकाणी आजही लोकं एखाद्या मुलीची ‘ब्रा’ची स्ट्रीप बघून अस्वस्थ व्हायला लागतात. त्यांची नजर ‘ब्रा’ वर पडली म्हणजे…हटतच नाही. सोबत असलेल्या मित्रांसोबत देखील लगेच ही गोष्ट शेअर केली जाते, त्यावर अश्लील शेरेबाजी सुरु होते. म्हणून तर महिला देखील ‘ब्रा’ दिसायला लागल्यास खूप अस्वस्थ होतात आणि लागलीच एकमेकींना इशारा करून बाहेर आलेली ‘ब्रा’ची स्ट्रीप आत ढकलण्याचा इशारा करतात. दुसरीकडे मात्र, पुरुषाचा बनियान बाहेर दिसत असल्यास कुणालाही काही फरक पडत नाही. महिलांचे वक्षस्थळ धार्मिक किंवा पवित्र नाहीत, ते फक्त तिच्या शरीराचा एक भाग आहे. त्यामुळे त्याकडे एकटक बघून तिला असहज करणे म्हणजे मूर्खपणा आहे. त्याचपद्धतीने अंतरवस्त्र देखील काही लपवून ठेवण्यासारखी गोष्ट नाहीय. त्याकडे लैंगिक सुखाची गोष्ट म्हणून बघणे म्हणजे विकृती असून अंडरवेअर आणि बनियान या कपड्यांप्रमाणेच ‘ब्रा’सुद्धा एक अंतरवस्त्रच असल्याचे आपण सहजतेने स्वीकारले पाहिजे.
मुलांचे बनियान आणि अंडरवेअर उघडपणे घराबाहेर बिनधास्तपणे सुकवले जातात. दुसरीकडे जिथे कुणाचीही नजर जात नाही, अशा आतल्या खोल्यांमध्ये कुठेतरी मुली ब्रा वाळी घालतात. एवढेच नव्हे तर, बहुतांश महिला पॅटी व ब्राला इतर कपड्यांखाली झाकून ठेवतात. कारण तिला माहित आहे की, महिलांच्या अंतर्वस्त्रांकडे, खासकरून ‘ब्रा’कडे एक लैंगिक वस्तू म्हणून आजही पाहिले जाते. म्हणून तर काही दिवसांपूर्वी पुण्यातील व दिल्लीतील एका शाळेने विद्यार्थिनीं त्वचेच्या रंगाची ब्रा घालावी, त्यावर स्लीपही घालावी,असा आदेश काढला असावा. दिल्ली, गुजरात याठिकाणी तर महिलांचे अंतरवस्त्र चोरणाऱ्यांना पोलिसांनी पकडले आहेत. यावरून एक लक्षात येते की, ‘ब्रा’कडे एक लैंगिक सुख देणारी वस्तू म्हणून पाहणायची विकृती समाजात मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आपण सोयीने विसरतो की, आपल्या बनियानप्रमाणे ब्रा देखील एक अंतरवस्त्रच आहे.
बहुतांश मुलींना सातवी किंवा आठवीत असतांना ‘ब्रा’ घालायची सक्ती केली जाते. सुरुवातीच्या काळात आई योग्य मापाची ब्रा म्हणजेच स्पोर्ट्स ब्रा घालायला लावते. खरं म्हणजे मुलींसाठी ही एकदम अनकम्फर्टेबल गोष्ट असते. परंतु दबावामुळे तिला ब्रा घालावीच लागते. एकदा सवय पडल्यानंतर मुलींना अगदी कॉन्फिडंट आणि अगदी सहज वाटते. पण घरी आल्यावर हीच ब्रा काढल्यानंतर जे समाधान मिळते, ते मात्र, शब्दात मांडता येणे शक्य नाही. शेवटी शरीराचा एक भाग दिवसभर बांधून ठेवल्यावर कुणालाही गुदमरल्यासारखेच होणार.त्यातून मोकळे झाल्यावर आनंद मिळणे स्वाभाविकच आहे. तुम्ही कोणत्याही महिलेला ‘ब्रा’ वर जर बोलते केले तर, तुमच्या लक्षात येईल की, ब्रा घालणे हा त्यांच्यासाठी काही सुखावह अनुभव नसतो. ब्रा मुळे त्यांना खूप त्रासही होतो. परंतु विकृत नजरा रोखण्यासाठी त्यांना ब्रा घालणं महत्त्वाचे असते.
सतत ब्रा घातल्यामुळे महिलांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. ‘ब्रा’ मुळे शरीरातील रक्तभिसरण प्रक्रियेला प्रभावित होते. यामुळे रक्तप्रवाह वक्षस्थळांपर्यंत व्यवस्थित पोहचण्यात अडचणी येतात आणि काही आंतररिक समस्या निर्माण होण्याची भीती असते. एवढेच नव्हे तर, योग्य मापाच्या नसलेल्या टाइट ब्रा वक्षस्थळांच्या मासपेशींना नुकसान पोहचवू शकतात. पाठ दुखणे, त्वचा विकार होणे सर्वात महत्वाचे आणि गंभीर म्हणजे भविष्यात यामुळे स्तनांचा कॅन्सर होण्याची भीती असते. त्यामुळे ब्रा शी संबंधित संशोधनात अनेक वेळा समोर आले आहे की, ब्रा फक्त १२ तासच घातले गेले पाहिजे. जगभरातील महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळेच जगभरात ‘नो ब्रा डे’ ही संकल्पना उदयास आली आहे. भारतात देखील या मोहिमेत अनेक सेलिब्रेटी महिलांनी सहभाग नोंदविला होता. कारण काही वर्षांपूर्वी भारतात इतर कॅन्सरच्या तुलनेत स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक होते. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तर भारताचा जगात प्रथम क्रमांक लागायचा.
ब्रा फक्त एक अंतरवस्त्राचा प्रकार आहे. म्हणायला गेले तर कापडाचा एक तुकडा. त्याला घालायचे किंवा नाही, याचे स्वातंत्र फक्त परिधान करणाऱ्याला अर्थात महिलांनाच पाहिजे. ब्रा दिसणे हा लाजीरवाणा किंवा अपमानाचा मुद्दा नको बनायला हवा. जर महिला ब्रा परिधान करून कॉन्फिडेंट आणि सुंदरतेचा अनुभव घेत असेल तर हा विचार, तिचा अधिकार आहे. त्यावर कुणालाही प्रतिबंध लावण्याचा काहीच अधिकार नाही. बघायला गेले तर सर्व दोष आपल्या समाजाचा आहे. आजच्या समाजात दोन आणि तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. यावरून आजच्या समाजाचा नैतिकस्तर काही खालावला आहे,हे लक्षात येते. आज अनेक मुलं रस्त्यावर उभे राहून मुलींच्या ब्रा आणि पॅटीवर कमेंट करतात. परंतु आपल्या घरात देखील आपली बहिण देखील हेच वस्त्र परिधान करते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. आपली बहिण देखील घरा बाहेर निघते, तिच्यावरही कुणी तरी अशीच शेरेबाजी करीत असेल. म्हणून आज आपली मुलं दोन इयत्ता कमी शकले तरी चालतील परंतु त्यांच्यावर संस्कार हे उच्चच झाले पाहिजेत. अन्यथा तिचे अंतरवस्त्र आणि समाजाची विकृत नजर कधीच बदलणार नाही.
यावरून लक्षात येते की अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीच आहे स्त्री ने कितीही प्रगती केली तरी तिला हीच वागणूक मिळेल या स्क्रिप्ट नुसार लोकांना वागायला अजून बरीच वर्षे जाऊ द्यावे लागतील सर
आज समाजाने कितीही प्रगती केली असली तरी स्त्रीच्या बाबतीत अजूनही समाजाचे विचार आहे तिथेच आहे म्हणून पुरुष कसाही वागला तर त्याकडे दुर्लक्ष होते आणि स्त्री च्या एका चुकीकडे सर्व समाजाचे लक्ष असते.अजूनही तिला अग्निपरीक्षा ही द्यावीच लागते आणि आपण म्हणतो काळ बदलला
अजूनही विकृती जिवंत आहे।
धन्य ती माऊली जी अश्या भयावह वातावरणात जीवन जगते।
छान लेख।
सलाम
विजयजी आपण लिहिले ते अत्यंत प्रखळ लिहिले आहे परंतु ही मानसिकता होण्यासाठी फार दशकं मोजावे लागतील ब्रा वरून च विकृती वाढते ….ब्रा वाळलेली पाहून विकृत माणसाचे संतुलन बिघडत जात असत तर घाराचे संस्कार महत्वाचे आहेत
सोच बदलो देश बदलो