फोटो : अंतरमायाजालवरून साभार
आपण महाशक्ती झालो तरच आपण आर्थिक आघाडीवर यशस्वी ठरवू शकतो. आपण एक महासत्ता म्हणून जगाशी स्पर्धा केली पाहिजे. म्हणून देशात पुढील दहा वर्षांसाठी सशक्त आणि स्थिर सरकार आहे. म्हणूनच आपल्याला पुढची दहा वर्षे एक स्थिर आणि कठोर निर्णय घेणारे सरकारची गरज असल्याचे, मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. परंतु डोवाल साहेब तुमच्या सशक्त सरकारची व्याख्या काय आहे?
असो…बॉंड साहेब मजबूत सरकार म्हणजे नेमके काय? हे देशाला सविस्तर समजावून सांगा. मजबूत सरकारमधील केंद्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख म्हणजे अर्थात तुम्हीच जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर अमित शहा यांच्याकडे कुठलेही संवेदानिक पद नसतांना भेटायला का गेला होतात. तुमची भेट घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सरकारमधील युती का तुटली. ते जाऊ द्या, देसी बॉंड अजित डोवाल साहेब….कोणते मजबूत सरकार देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार प्रमुखाच्या मुलाला आपल्याच प्रमुख शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानी लोकांसोबत धंदा करण्याची परवानगी देते.
कोणत्या मजबूत सरकारमध्ये नोटबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची वाट लागते. काही उद्योजक देशाची करोडो रुपयांची संपत्ती कोणत्या मजबूत सरकारच्या नाकाखालून टिच्चून घेऊन जातात आणि सरकार त्यांचे प्रत्यारोपण देखील करू शकत नाही. कोणत्या मजबूत सरकारममधील केंद्रीय मंत्र्याला भेटून हे चोरटे उद्योजक थाटातून देशा बाहेर निघून जाण्यात यशस्वी होतात? कोणत्या मजबूत सरकारमध्ये असे भामटे उद्दोजक बँकांना आर्थिक डबघाईत लोटतात.
राष्ट्रीय माहिती आयोगाने आदेश दिल्यानंतरही कोणते मजबूत सरकार आपल्या केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात आलेल्या भ्रष्टाचारसंबंधी तक्रारी आणि त्यावर करण्यात आलेली कारवाई, या संदर्भात खुलासा करत नाही. कोणत्या मजबूत सरकारचा पंतप्रधान आपल्या सोबत परदेश दौऱ्यात जाणाऱ्या सरकारी आणि खाजगी लोकांची माहिती पत्रकारांना देतांना घाबरतो? एवढेच नव्हे तर आपली डिग्री सार्वजनिक होऊ नये म्हणून कोर्टकचेरी देखील करतो?
कोणती मजबूत सरकार आपल्या जवळच्या उद्योजकांना फायदा पोहचवण्यासाठी एअर इंडिया,आयएल आणि एफएस तसेच देशातील सर्वाधिक नफ्यात असणारी ऑईल आणि नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) गंभीर आर्थिक संकटात टाकते. कोणती मजबूत सरकार आपल्या जवळच्या उद्योजक मित्राला पत्र्याच्या शेडमध्ये राफेल सारखे विमान बनविण्याची परवानगी देते. कोणती मजबूत सरकार देशातील फक्त विशिष्ट उद्दोजाकांचाच विचार करते.
कोणती मजबूत सरकारमध्ये देशाचे प्रमुख न्यायधीश पत्रकार परिषद घेत लोकशाही धोक्यात असल्याचे जाहीररित्या सांगतात. मजबूत असलेली कोणती सरकार देशातील सर्वोच्च तपास संस्थेच्या प्रमुखाला अर्ध्यारात्री सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या घरावर पाळत ठेवते. कोणते मजबूत सरकार भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकारीला सीबीआयसारख्या महत्वपूर्ण संस्थेत संचालक बनविते.
पाकिस्तान आणि आयएसआयवर दहशतवाद्यांचे पोसायचे आरोप करायचे, सर्जिकल स्ट्राईक मिरवून घ्यायचे आणि नंतर देशात झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी परत आयएसआयलाच कोणती मजबूत सरकार विनंती करून बोलावून घेते. सततच्या दहशदवादी हल्ल्यानंतरही कोणत्या मजबूत सरकारचा पंतप्रधान अचानक पाकिस्तानात वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जातो.
कोणत्या मजबूत सरकाचा पंतप्रधान महत्वपूर्ण विषयांवर साडेचार वर्षानंतरही कोणतीही पत्रकार परिषद घेत नाही. कोणती मजबूत सरकार पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरते. कोणती मजबूत सरकार विरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या पत्रकारांच्या नौकऱ्या घालवते. कोणत्या मजबूत सरकारचे समर्थक पत्रकारांना सोशल मिडीयावर ट्रोल करून शिवीगाळ करतात.
कोणत्या मजबूत सरकारमध्ये विशिष्ट विचारधारेचा जमाव संशयावरून निर्दोष लोकांना मरेपर्यंत मारहाण करतो. कोणत्या मजबूत सरकारमध्ये दलित, अल्पसंख्याक समुदायावर सतत विशिष्ट गट दादागिरी करतो. कोणत्या मजबूत सरकारमध्ये दलित युवकाला गावातून लग्नाची मिरवणूक काढण्यासाठी देखील सुप्रीम कोर्टात जावे लागते.
कोणत्या मजबूत सरकारमधील मंत्री संविधानाला दुय्यम मानत,वेदांचे पुस्तक हातात घेऊन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी पदाची शपथ घ्यावी असं म्हणतात. कोणत्या मजबूत सरकारमध्ये देशाचे संविधान जाहीररित्या जाळले जाते. देशाचा प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपती यांना मंदिरात अपमानाला सामोरे जावे लागते. त्याची खुद्द तक्रार करून देखील तेथील जिल्हाधिकारी कारवाई करत नाही, असं कोणत्या मजबूत सरकारमध्ये घडतं. वैगैरे…वैगैरे भरपूर मुद्दे आहेत, डोवाल साहेब…तूर्त एवढेच !