जळगाव जिल्हा बॅकेच्या नुकत्याच लागलेल्या निकाला नंतर अनेकानी यांचे श्रेय पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांच्या बिनविरोधच्या नावाखाली खेळलेल्या राजकीय खेळीला दिले.विरोध करणार्यापासुन तर सोबत असणारे हे सुरवातीपासुनच नाथाभाऊंना शरण गेलेले होते.त्यामुळे या निवडणुकीत सुरूवातीपासुन सगळं काही ठरलेल होत. आणि जे ठरलं तेच घडलं ! आणि म्हणून नाथाभाऊचे पॅनल निवडून आले.
जिल्हा बॅकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच नाथाभाऊंनी बिनविरोधची हाक दिली.त्याला सर्व पक्षातील नेत्यंानी साथ दिली. नाथाभाऊंसमोर चापलूसी करीत अनेक नेत्यानी तर स्वंत:हुन हात पुढे करायला सुरूवात केली.निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासुनच हे स्पष्ट होते की, कोणीही नाथाभाऊंच्या विरोधात जाण्याची हिंमत ठेवणार नाही.नाथाभाऊंना खा.ईश्वरलाल जैन विरोध करतील आणि आपल्याला संधी भेटेल असे अनेक इच्छुक आस लावून बसले होते.परंतु यावेळी बाबूजींना थेट नाथाभाऊंना विरोध शक्यच नव्हता.सुरुवातीला नाथाभाऊंच्या भूमिकेला समर्थन दिले.नुसते समर्थनच नव्हे तर,ज्याला लढायचे असेल त्याने खुशाल लढावे असे आम्ही नाथाभाऊंच्या बिनविरोधच्या भूमिकेचे समर्थन करीत असल्याचे देखील सांगितले होते.बाबूजी आजच्या घडीला नाथाभाऊंच्या विरोधात जाणार नाहीत.परंतु ते ऐनवेळी नुसती नावाला वेगळी भूमिका घेतील आणि आतून जे राहील ते राहिलच याचा अंदाज पहिल्यापासूनच वर्तवण्यात येत होता.
या लिंकवर जावून त्यासंदर्भात वाचता येईल.
( https://vijaywaghmare.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3/ प्रसिद्ध दि.३० मार्च )
फक्त फरक एवढाच की,यावेळी त्यांनी नाथाभाऊंसोबत स्वतः दोन हात न करता आ.सतीश पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली.ऐनवेळी बाबूजी आपली भूमिका विधानपरिषदप्रमाणे बदलवतील व पॅनल बनवतील हेदेखील पक्के होते.कारण त्यांचे राजकारण हे नाथाभाऊंच्या विरोधावर टिकलेले आहे.परंतु बाबूजींची परिस्थिती सध्या नाथाभाऊंना विरोध करण्यासारखी नव्हती.नाथाभाऊंच्या विरोधात जाण्याची इच्छा असुन देखील त्यांच्या तोंडातून ब्र शब्द निघत नव्हता.अर्थात ही सर्वांचीच परिस्थिती होती.नाथाभाऊंबद्दलची ही आदरयुक्त नव्हे तर शुद्ध भीतीच होती.कोणालाही ’त्या’ विधानपरिषदेनंतर सुरेशदादा जैन यांच्यासारखा आपल्या मागे ससेमिरा लावून घ्यायचा नव्हता.कारण अनेकांच्या गुंड्या नाथाभाऊंकडे आजही आहेत.बाबूजी व अण्णां या दोघांना नाथाभाऊंच्या रस्त्यात येवून डोक्याला ताप करून घायचा नव्हता.विरोधी पक्षनेते असतांना नाथाभाऊ यांनी आपल्या विरोधकाना कसे जेरीस आणले हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.आता तर नाथाभाऊ सत्तेत आहेत त्यामुळे त्यांच्या सोबत कोणीही दोन हात करण्याची हिंमत ठेवणार नाही हेदेखील निश्चित होते.त्यामुळे या निवडणुकीत जेव्हा अर्धे मैदान नाथाभाऊंनी मारून नेले, तेव्हा अचानक बाबूजी आणि सतीशअण्णा यांना ठरल्याप्रमाणे ऐनवेळी उपरती झाली की,नाथाभाऊ विश्वासघात करीत आहेत. अहो….एवढ्या वर्षापासून राजकारणात असतांना आमदार ,खासदार मंत्रीपद भूषविलेल्यांना एवढे साधे राजकारण समजले नाही,हे कसे शक्य आहे.
आताच्या विधानपरिषदेच्या वेळी आ.गुरुमुख जगवानी यांनी सतीशअण्णा यांचे पुतणे करण पवार यांच्या विरुद्ध बिनविरोध विजय मिळविला,त्यावेळी देखील आम्हाला लक्षात आले नाही असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते.त्यावेळी पक्षातील कार्यकर्त्यांनी संशयाच्या भोवर्यात अनेक नेत्यांना उभे केले होते.पुन्हा तीच परिस्थिती उदभवू नये म्हणून यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दाखवायचे होते की, आम्ही नाथाभाऊला विरोध करण्याची हिंमत ठेवतो ते ! पॅनल उभे करून बाहेरगावी निघून गेल्यानंतर शेवटी नावाला मेळावे घेतल्यावर उमेदवार कसे काय निवडून येतील हो !
नाथाभाऊंच्या विरोधात जाऊन भविष्यात काय अडचणींना सामोरे जावे लागेल याची पूर्ण जाणिव खा.जैन व आ.पाटील यांना होती.निवडणूक लढविण्याचा देखावा करण्यात आला.’त्या’ विधानपरिषद नंतर जिल्ह्याचे बदललेले राजकारण सर्वांनी जवळून पहिले आहे.नाथाभाऊंनी यावेळी आपल्या मुलीला प्रोजेक्ट केले होते.त्यामुळे काही उलट निकाल लागले तर स्वतःची गुंडी अडकवून घेण्यात काही अर्थ नाही, हे या दोघांसोबत सर्वच जण ओळखून होते.त्यामुळे दाखवायलाच सर्व सुरु होते.मात्र,सर्वांची मनापासून इच्छा होती की,नाथाभाऊंचे पॅनल यावे.कारण यावेळी पुन्हा वेगळे निकाल आले तर,सर्व खापर आपल्या डोक्यावर तर फोडले जाणार नाही ना …आणि नाथाभाऊंच्या रोषाला आपल्यालाच बळी पडावे लागणार नाही ना ….? हीच भीती सर्वाना सतावत होती.म्हणून तर विष्णू भंगाळे,आर.जी.पाटील यांच्यासारखी स्वबळावर निवडून येणार्या लोकांनी देखील उभे असून निवडणुकीचा नाद सोडून दिला नसता.अनेक वर्षापासून संचालक,चेअरमन राहिलेल्या बाबूजी व अण्णा यांना बँकेच्या राजकारणाची खडनखडा माहिती आहे.त्यामुळे नाथाभाऊंनी त्यांना चर्चेत गुंतवून ठेवत काही जागा बिनविरोध करून घेतल्या हे बुद्धीला पटत नाही.
दुसरीकडे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना देखील नाथाभाऊंचे पॅनल निवडून यावे असेच वाटत होते.कारण,सध्या आ.सतीशअण्णा यांच्याकडे जिल्हा राष्ट्रवादीची सर्व सूत्रे आहेत.अनेक निर्णय अण्णा आपल्या मर्जीप्रमाणे घेतात.सतीशअण्णाची हम करे सो …..! भूमिका असल्याचेदेखील अनेकांना वाटते.त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक मंडळीला अण्णांना एकटे पाडायचे होते.त्यामुळे निवडणुकीतून बर्याच जणांनी अंग चोरून घेतले आणि अण्णांवर चांगलीच बितविली.दुसरीकडे चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील आणि अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी नाथाभाऊच्या विरुद्ध भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या रडारवर हे दोघे आले आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
पारंपारिक विरोधक रवींद्रभैय्या पाटील यांचा विजय तेवढा नाथाभाऊना टूचला असेल.परंतु एकप्रकारे त्यांचे भविष्यातील राजकारण बघता पाटील यांचा विजय देखील नाथाभाऊसाठी फायदेशीरच ठरणारा आहे. सर्वच बाजूने नाथाभाऊंच्या पथ्यावर पडणार्या सर्व गोष्टी या निवडणुकीत घडल्या,बाबुजींनी थोडा वेळ ना.गिरीश महाजन यांच्या रुपात आपली चाल खेळली होती.परंतु नाथाभाऊंनी ती खेळी परतवून लावली,त्यामुळे ठरल्या प्रमाणे घडले आणि अपेक्षित निकाल लागले.