समलिंगी स्त्री, उभयलिंगी आणि तृतीयपंथी यांच्यासाठी काम करणाऱ्या एलजीबीटी या संस्थेने पाकिस्तानमधील तृतीयपंथी संबंधी बनविलेली ‘ट्रान्सजेंडर : पाकिस्तानस् ओपन सिक्रेट’ ही डॉक्युमेंट्री बघितली.अक्षरशः अंगावर काटा अन् डोळयात पाणी आले.टोकाची हेटाळणी,अपमान सहन करून देखील परिस्थितीशी दोन हात करून जीवन जगण्यास लागणारा पुरुषार्थ या डॉक्युमेंट्रींतून बघावयास मिळाला.तृतीयपंथींना देखील भावना असतात.त्यांना देखील आई-वडील यांच्या प्रेमाची गरज असते,त्यांचा देखील सर्वसामान्य तरुण-तरुणींप्रमाणे प्रेमभंग होतो या गोष्टी आपल्याला अपेक्षितच नसतात.सतत हसतमुखी राहणाऱ्या तृतीयपंथी मनात दुःखाचा समुद्र साठवून ठेवत असतो परंतु त्याला कधीही बाहेर निघण्यासाठी डोळ्यातून वाट मिळू देत नाही.पाकिस्तानच नव्हे तर,आपल्या देशातही आपल्याकडून नकळत तृतीयपंथींवर कसा अन्याय होतो,हे समाजाच्या लक्षात यावे,हा ब्लॉग लिहिण्या मागील माझा मुळ हेतु आहे.
खरं म्हणजे तृतीयपंथी समुदायाबद्दल असलेले गैरसमजच त्यांना आपल्यापासून वेगळे करून ठेवतात.जन्माच्यावेळी त्यांना देखील इतर मुलांप्रमाणे लिंग गटाचे ज्ञान नसते.हळू-हळू शरीराची होणारी वाढ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आवडी-निवडींच्या माध्यमातून एखाद मुलाची स्वतः सोबत लढाई सुरु होते.शरीर मुलासारखे आवडी-निवडी मात्र मुलींसारख्या,असे का? याचे उत्तर त्याच्याजवळ देखील नसते.समाज हेटाळणी करेल तेव्हा करेल, परंतु परस्पर विरोधी आणि परस्पर पूरक लिंगी समाज गटापेक्षा तो कसा वेगळा आहे,याची जाणीव त्याला सर्वप्रथम आपल्या कुटुंबातूनच करून दिली जाते.तो इतरांपेक्षा वेगळा जणू,या पृथ्वीतलावरीलच नाही ! अशा पद्धतीने त्याला वागणूक दिली जाते.जगातील प्रत्येक देशातील आणि धर्मात तृतीयपंथी आपल्याला आढळून येतील.निसर्गाने ज्यावेळी स्त्री-पुरुष अशा विभिन्न अंगांनी मानवी शरीर तयार केले त्यावेळी त्यांच्या भौतिक व शारिरीक गरजा देखील ठरवून दिल्या. अन्न, वस्त्र व निवार्याप्रमाणे मानवी शरीरासाठी सेक्स हे देखील तेवढेच आवश्यक आहे. मानवी शरीरासाठी शरीरसंबंध अन्नाप्रमाणेच अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष संबंधाप्रमाणेच समलैंगिक संबंध देखील संपूर्ण जग उशिरा का असेना आता सहजतेने स्विकारत आहे.त्याच पद्धतीने तृतीयपंथींच्या समस्या देखील या जगाला आता कुठे कळायला लागल्या आहेत.परंतु पाकिस्तान सारख्या कट्टरपंथी देशात वरील गोष्टी स्वीकारणे जरा कठीणच !
पाकिस्तान मुळात इस्लामिक मुल्यांवर चालणार देश आहे.त्यामुळेच न्यायालयाच्या आदेशांनंतर देखील तिथल्या तृतीयपंथींना त्यांची ओळख अद्याप मिळालेली नाही.कायदेशीर लढाई जिंकूनही त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अर्थात पाकिस्तान सारख्या धर्म संविधानावर चालणाऱ्या देशात धार्मिक मूल्य किती वरवर पाळली जातात,याचे जिवंत चित्रण या डॉक्युमेंट्रींतून आपणास बघावयास मिळते.कारण इस्लाममध्ये समलिंगी सबंध हराम मानले गेले आहेत.अर्थात या डॉक्युमेंट्रींत काही धर्मगुरूंचे म्हणणे दाखविण्यात आले आहे.परंतु धर्माच्या पलीकडे मानवी जीवन आणि त्याचे काही अधिकार असतात हे मान्य करण्यास त्यांचा नकार आपल्यला दिसून येतो. तृतीयपंथींना सर्व सामान्य नागरिक म्हणून सन्मानाचे जीवन जगण्याची इच्छा असून देखील त्यांना कशा प्रकारे पारंपारिक व्यवसाय करून जीवन जगण्यास बाध्य केले जाते, हे बघणे कुठल्याही संवेदनशील माणसाला हादरवून सोडतात.यातील काही तृतीयपंथींची सन्मानाने जगण्याची इच्छाशक्ती कोणत्याही माणसाला प्रेरणादाई ठरावी अशीच आहे.परंतु याच पाकिस्तानमध्ये ज्या विकृत पद्धतीने तृतीयपंथी आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण होते,ते कोणत्याही धर्माचे प्रामाणिकपणे अनुकरण करणाऱ्या व्यक्तीस लाजविणारे आहे.
मै उसे चाहती हुं,लेकीन प्यार नही करती…प्यार करूंगी तो उसे छोड नही पाऊंगी !,मेरे बस में होता तो मैं अपने मां के साथ जानवर बनकर भी रहती,असे काही तृतीयपंथीं बांधवांचे हृदयस्पर्शी संवाद आणि त्यांच्या कहाण्या डोळ्यात पाणी आणतात.वासनांध फक्त मुलींवरच नव्हे तर तृतीयपंथींवर देखील बलात्कार करतात हे धक्कादायक आणि कटू सत्य आपल्याला याठिकाणी दिसते.त्याच प्रकारे नाईलाजाने वैद्यकीय औषधींचा आधार घेऊन स्त्री सारखे शरीर बनविण्याची धडपड आपल्याला विचार करायला भाग पाडते.ज्या विचारसरणीत तृतीयपंथींचे अस्तित्वच मान्य नाही,त्या विचारसरणीत राहून जीवन जगण्यासाठी कमालीचा पुरुषार्थ असावा लागतो आणि हाच पुरुषार्थ आपणास या डॉक्युमेंट्रींतून आपल्याला बघावयास मिळतो.
(डॉक्युमेंट्रींची लिंक)