काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील एका स्मशानभूमीतील भिंतीवर लावलेले छोटे पोस्टर वाचण्यात आले. ‘एक सच, मौत जिंदगीसे कितनी बेहतर…?’ शीर्षकाखाली त्याठिकाणी काही ओळी लिहिलेल्या होत्या. याआधी अशा पद्धतीने जीवन आणि मृत्यूकडे बघितले नव्हते,त्यामुळे विचारात पडणे स्वाभाविक होते. साधारण आठवडाभर मनात याच विषयावर विचारांचा काहूर माजलेला होता. अखेर ओशोंच्या मदतीने जीवनासारखाच मृत्यूही सुंदर! असतो,या निष्कर्षापर्यंत पोहचलो. मृत्यूची सुंदरता आणि कुरूपता फक्त आपल्या दृष्टीकोनात सामावलेली असते,हे सत्य उमगले.त्यामुळे जिंदगी भरपूर नव्हे तर सहज-सुंदर जगायची आणि छोट्या-छोट्या गोष्टीत तिचा आनंद लुटायचे ठरवले आहे.
जीवन जगत असतांना मित्र, नातेवाईक किंवा इतर स्नेही आपल्या सोबत असतात.त्यावेळी राग,अहंकार,मत्सरमुळे आपण कधी त्यांना जवळ घेत नाही,त्यांच्याशी बोलत नाही. परंतु तोच व्यक्ती या जगातून गेल्यावर मात्र,त्याच्या जवळ बसून रडतो. आयुष्यात त्यांना आपण कधी भेट म्हणून साधा रुमाल देखील दिलेला नसतो. परंतु मृत्यूनंतर त्याच्या देहावर शाली आणि कपडे टाकतो. मृत्यूनंतर या गोष्टी त्याच्या काहीही उपयोगाच्या नाहीत,हे सत्य सर्वांप्रमाणे आपल्याला देखील माहित असते. परंतु देखाव्यासाठी ही दुनियादारी करतो. जिवंतपणी आपण साधं पाणी त्या व्यक्तीला दिलेले नसते. मृत्यूनंतर मात्र काळजीपूर्वक शुद्ध देशी तूप तोंडात टाकायला विसरत नाही. संपूर्ण जीवनात त्याच्या सोबत चालण्यात आपला अहंकार आड येतो. परंतु मृत्यूनंतर देहावर फुलहार टाकून आपल्या खांद्यावर त्याला स्मशानात नेतो.हे सर्व कर्मकांड करीत असतांना आपल्या मनात कुठं तरी मृत्यू विषयी भय असते.परंतु मृत्यूचे भय मनातून निघाले तर जीवना एवढाच मृत्यू देखील सुंदर ठरतो.
ओशो रजनीश आपल्या एका प्रवचनात मृत्यू विषयी बोलतांना सांगतात, मृत्यू असत्य आहे,जो कधी झाला ना,कधी होऊ शकतो. या जगात सर्व काही कायमस्वरूपी आहे. याठिकाणी फक्त रूपं बदलत असतात आणि याच बदलाला आपण मृत्यू मानतो. आपण बालपणातून तारुण्यात येतो. त्यावेळी आपल्याला बालपण कुठेच दिसत नाही. मग बालपणाचे काय झाले? बालपण मेले का? वृद्ध झालो,म्हणून तारुण्य मेले का? नाही ना…वृद्धापकाळात आपले तारुण्य आपल्याला सभोवताली जसं दिसत नाही.त्याच पद्धतीने उद्या जीवनाचा मृत्यू होईल आणि आपल्याला जीवन दिसणार नाही. त्यामुळे मृत्यू देखील स्थिर आणि अटळ आहे. ओशोंचे विचार आपल्याला खरंच विचार करायला भाग पाडतात. मानवी शरीर सोडले म्हणून आपला प्रवास संपत नाही. सुख आणि दुःखाचे क्षण जसं जीवनाला सुंदर बनवितात.त्याच पद्धतीने जीवनानंतरचा प्रवास देखील सुंदर होऊ शकतो, अर्थात त्यासाठी कर्माचा सिद्धांत लागू असणारच आहे.
ओशो म्हणतात, आपले जीवन भावपूर्ण,सनदशीर तसेच धर्माचे पारंपारिक भय मनात न ठेवता जो मनुष्य जीवन जगतो,त्याला मृत्यू कधीच भयभीत करू शकत नाही. अर्थात त्यासाठी जीवन हे प्रामाणिक,सहज आणि सुंदरपद्धतीने जगणे गरजेचे असते. जीवन अशा पद्धतीने जगल्यास येणारा मृत्यू एका मोठ्या विश्रांती आणि जीवनाच्या अंतिम तथा सर्वोच्च सुखाच्या वास्तविक स्वरुपात येईल.त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने मृत्यूचा आनंद घेत तिचा उत्सव साजरा करू शकू. जो व्यक्ती मृत्यूचा आनंद आणि उत्सव साजरा करतो,याचाच अर्थ त्याने आपले संपूर्ण जीवन व्यवस्थित जगले आहे आणि सुखमय जीवनाचा हाच मापदंड असतो.त्याला दुसरा कुठलाही मापदंड लागू पडत नाही. आपला मृत्यूच आपण जीवन कसे जगलो हे सिद्ध करत असते. या जगात प्रत्येक गोष्ट आपल्या मुलभूत स्त्रोताच्या ठिकाणी परत येत असते.तिला आपल्या मुलभूत स्त्रोताच्या ठिकाणी परतावेच लागते. तुम्ही जर जीवन समजून घेतले तर तुम्ही मृत्यूला समजू घेऊ शकतात. जीवन आपल्या मुलभूत स्त्रोताचे विस्मरण आहे आणि मृत्यू त्याचे पुन्हा होणारे स्मरण आहे. जीवन म्हणजे आपल्या मुलभूत स्त्रोतापासून दूर जाणे,तर मृत्यू आपल्या घरी परत येण्यासारखे आहे. कुठल्याही व्यक्तीला आपल्या घरी परत येण्याचा आनंद होतोच,म्हणून मृत्यू देखील सुंदर आहे. फक्त घरी परत येण्याचा आनंद मिळविण्यासाठी जीवन हे सहज,सरळ आणि कुठल्याही प्रतीबंधाशिवाय जगले गेले पाहिजे.
जीवन सुंदरपद्धतीने जगणाऱ्यांचाच मृत्यू देखील सुंदर असतो. म्हणून जीवन उत्सवाप्रमाणे जगा मग मृत्यू आपोआपच उत्सव बनेल. जर तुम्ही जीवन दुख:मय जगलात तर मृत्यू देखील दुःखच प्रकट करणार. त्यामुळे आहे त्यास्थितीत जीवन सुंदर बनविणे आपल्याच हातात आहे. जीवनात आपण प्रसन्न राहिलो तर मृत्यू देखील प्रसन्नभाव प्रकट करतो. तुम्ही फक्त शारीरिक आराम आणि सुखाचे जीवन जगला असाल तर निश्चितच मृत्यू तेवढाच असुविधाजनक आणि क्लेशदायी ठरेल कारण तुम्हाला त्यावेळी फक्त शरीर सोडत असल्याची पिडा होईल.जीवन जगल्याचा समृद्धभावाची तुम्हाला जाणीवच होणार नाही. जगातील एखादं दुसरा धर्म सोडला तर प्रत्येक धर्मात आत्मा अमर असल्याची मान्यता आहे. त्यामुळे शरीर फक्त अस्थायी निवास आहे,असं एक हॉटेल ज्या ठिकाणी आम्हाला फक्त रात्र काढून सकाळी घरी परतायचंय. त्यामुळे रात्र आनंदात घालवा जेणे करून परतीचा प्रवासा सुखकर होईल. आपण मृत्यूत विलीन झालो तर जीवनात कुठलेही रहस्य राहणार नाही.त्यामुळेच मृत व्यक्तीत कुठलेही रहस्य नसते.कारण मृतदेह पुन्हा मरू शकत नाही.त्या देहात मृत्यू विलीन झालाय आणि मृत्यूसोबतच जीवन आपोआपच विलीन होतो. बुद्ध म्हणतात,जीवन-मृत्यूचे कालचक्र हे प्रत्येकाला पूर्ण करावेच लागते.कालचक्र पूर्ण करतांना कसले दु:ख आणि भय? हे कालचक्र सहज पद्धतीने मार्गक्रम केल्यास मृत्यू सुंदर होईल.
अतिशय सुंदर लिहिलंय सरजी