महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती क्रिडा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेसोबत जळगावमधील काहींचे नाव जोडले जात आहे. अर्थात माझ्या पुस्तकात याबाबतचे सर्व तथ्य मी आधीच लिहिली आहेत. माझ्या पुस्तकातील काही मुद्दे पुन्हा याठिकाणी मांडतोय. परंतु मुंबईत येथील एका लेखकाने आपल्या पुस्तकात जळगावातील एका बड्या राजकारण्याने आणि तत्कालीन मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने एका तरुणाला मुद्दाम सिमीच्या प्रकरणात गोवल्याचे म्हटले आहे, हे जळगावमधील फार कमी लोकांना माहिती असेल. विशेष म्हणजे मागीलवर्षी जळगावातच या वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. त्यामुळे सिमी प्रकरणाशी निगडीत काही तथ्य आणि त्या पुस्तकातील नवीन माहिती आपल्यासमोर मांडतोय. ते वाचल्यानंतर कुणाला धक्कादायक तर कुणी हे तर आम्हाला माहित होतं, पण कधी कुणी मांडलं नाही, असंच म्हणतील.
‘सिमी’मुळे संशयाचे भूत सकारात्मक आणि नकारात्मक दृष्ट्या जळगावमधील अनेकांवर आजही कायम आहे. जळगावमधील असिफ खान याला ज्यावेळी मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षा झाली. त्यावेळी अवघ्या देशाचे लक्ष जळगावकडे वेधले गेले होते. म्हणून की काय आजही सुरक्षा यंत्रणा जळगावची अधूनमधून झाडाझडती घेत असतातच. एवढेच काय तर सर्जिकल स्ट्राईकनंतरही जळगाववर यंत्रणांची बारीक नजर होतीच. असो पुढील मुद्दा असा की, जळगावात मागील वर्षी २०१७मध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जळगावात वाहिद शेख लिखित ‘बेगुनाह कैदी’ नामक वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकात सिमी प्रकरणाशी निगडीत एका विषयावर खळबळजनक तर्क मांडण्यात आले आहेत. एक पोलीस अधिकारी व एका बड्या राजकारणी नेत्यावर गंभीर आणि तेवढेच खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. मुंबई लोकल बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा झालेला जळगावचा आरोपी असिफ खानला पोलीस आणि राजकारणींच्या संगनमताने गोवण्यात आल्याचा आरोप या पुस्तकात करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर,अगदी नाव घेऊन पुस्तकात संबंधित व्यक्तींच्या नावाचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. अर्थात या पुस्तकात लेखकाने आपले तर्क मांडले आहेत. तथ्य आणि पुराव्याचा आधार म्हणून त्यात फार काही दिलेले नाही. आरोपीने सांगीतले तेच या पुस्तकात लिहिण्यात आले आहे. अर्थात या गोष्टी आरोपीने न्यायालयात देखील सांगितल्याच असतील, असा माझा अंदाज आहे.
‘बेगुनाह कैदी’त म्हटले आहे की, १९९९मध्ये जळगावमधील ख्वाजा नगर झोपडपट्टी हटविण्यासाठी बिल्डर तथा राजनेता सुरेशदादा जैन यांनी तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक नवल बजाज यांना हाताशी धरून एक षडयंत्र रचले. त्यानुसार झोपडपट्टी हटविताना बजाज यांनी त्याठिकाणी फायरिंग केली. या फायरिंगमध्ये मुहम्मद सलीम खान (वय ३५) या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी असिफखान बशीर खानने तत्कालीन पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंग यांना निवेदन देऊन गोळीबाराची चौकशीची विनंती केली होती. कारण मयत हा त्याचा नातेवाईक होता. परंतु पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंग यांनी असिफला नंतर कार्यालयात बोलावून धमकी देत तक्रारी निवेदन परत घेण्यास सांगितल्याचे पुस्तकात म्हटलेले आहे. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातून परत आल्यावर असिफने चौकशीसाठी राजकीय दबाव निर्माण व्हावा म्हणून भाजप नेते एकनाथ खडसे यांची भेट घेत, त्यांना तक्रारी निवेदनाची एक कॉपी दिली असल्याचे देखील पुस्तकात नमूद आहे. या पुस्तकात त्याकाळात काय घडले याबाबत आणखी बराच सविस्तर वृतांत दिला आहे.
भूतकाळात गेल्यावर आपल्या लक्षात येईल की, जळगावमधून ‘सिमी’ची पाळेमुळे जिल्ह्यात रोवली गेल्याचा आरोप सुरुवातीपासूनच का केला जातो. ज्या ठिकाणी बैठका व्हायच्या त्या मशिदीचे तत्कालीन सचिव म्हणून फारुख शेख हे नेहमी संशयाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. वास्तविक ते सरकारी साक्षीदार होते. सिमीचे प्रकरण २००१मध्ये उघडकीस आले, तेव्हा फारुख शेख हे अक्सा मशिदीचे सचिव व प्रभारी अध्यक्ष होते. सिमी खटल्यातील आरोपी शेख सिद्दीक, खालिद अजमल व शकील हन्नान यांना ओळखत असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले होते. त्यातील सिद्दीक हा नातेवाईक तर खालिद अजमल हा घरासमोर तसेच शकील हन्नान घराच्या पाठीमागे राहत असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते. तसेच शेख रिजवान, शेख मुस्ताक, शेख इलियास हे देखील घराच्या परिसरात राहत असल्यामुळे त्यांना ओळखत असल्याचे देखील शेख यांनी म्हटले होते. सिमी संघटनेचा जळगाव विभागाचा अध्यक्ष शकील हन्नान याने अक्सा मशिदीच्या आवारात इस्तेमा घेण्याकरिता अर्ज केले होते. शकीलने एकूण १० अर्ज केलेले होते. सचिव व प्रभारी अध्यक्ष फारुख शेख यांनी हे सर्व अर्ज सभेपुढे ठेवण्यात यावे, असा शेरा दिला होता.
शेख सिद्दीक, मुस्ताक शेख, शेख इलियास, शेख रिजवान यांनी पासपोर्ट बनविताना ओळख म्हणून फारुख शेख यांचे नाव टाकले होते. परंतु याबाबत शेख यांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी कधीही ओळख दिल्याबाबत माझे ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’ केले नाही. संबंधितांनी ओळख म्हणून माझे नाव मला न विचारता टाकले असल्याचेही शेख यांचे म्हणणे आहे. सिमी संघटनेचे कार्यक्रम जळगाव शहरात झाले, तेव्हा या संघटनेवर बंदी नव्हती. त्या वेळी संघटनेने घेतलेल्या इस्तेमामध्ये चहा व नाश्ता पुरविल्याचे देखील शेख यांनी मान्य केले होते. १ ऑगस्ट २००१ रोजी पोलिसांना दिलेल्या जबाबात फारुक शेख यांनी त्यांच्या नातेवाइकांव्यतिरिक्त कुणालाही ओळखत नसल्याचे सांगितले होते, तर दहशतवादी कृत्यांच्या बाबतीत लोकांकडून माहिती मिळाल्याचे म्हटले होते. १८ ऑगस्ट २००१ रोजी पुरवणी जबाबात मात्र खालिद असद याच्या घरी येणारे फोन हे काश्मीरमधून येत होते व हे मुले जिहादसाठी काश्मीरमध्ये गेलेले होते हे माहीत झाले होते. सिद्दीक व खालिद परत आल्यानंतर सविस्तर समजले होते की, काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन यांच्यासोबत भारतीय सैन्याविरुद्ध जिहाद करीत होते. वरील सर्व घटनेसंदर्भात पोलिसांना कळवायला पाहिजे होते, परंतु कळविले नाही, ही माझी मोठी चुक झाली असल्याचे पुरवणी जबाबात म्हटले होते. दरम्यान, पोलीस स्थानकात आरोपी किंवा साक्षीदार यांचे घेण्यात येणाऱ्या जाब-जबाबला न्यायालयात फार महत्व नसते. कारण त्यावर फक्त तपासी अधिकाऱ्याची स्वाक्षरी असते. त्यामुळे आरोपी किंवा साक्षीदार सहज जबाब नाकारू शकतात. याच काही गोष्टींच्या आधार घेत काही जण सिमीच्या प्रकरणात तर्काच्या जमिनीवर तथ्य शोधण्याचा प्रयत्न करत असतात.
‘सिमी’शी निगडीत आज दोन गोष्टी आपल्याला सांगितल्या. ज्याने त्याने आपआपल्यापरीने तथ्य तपासावे किंवा तर्क लावावेत. माझ्या पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत ‘बेगुनाह कैदी’ या पुस्तकातील मुद्दे सविस्तर मांडणार आहे. तसेच इतर आणखी अनेक घडलेल्या धक्कादायक गोष्टी देखील लिहिणार आहे. त्यात देखील एकाहून एक पडद्याआड घडलेल्या भारी गोष्टी आपल्याला वाचावयास मिळतील. फक्त ‘तर्क आणि तथ्य’ या दोघांची जोड माझ्याकडून अपेक्षित धरू नये. ज्याने-त्याने आपापल्या परीने ते लावावेत.