जळगाव – दोन वेळेच्या अन्नालाही मोताद, डोक्यावर मोडकी झोपडी अन् अपंगत्वाने उद्ध्वस्त झालेले वयोवृध्द जोडपे किती प्रेमाने आणि समाधानाने राहू शकते हे पहावयाचे असेल तर मेहरूण भागातील जय भवानी शाळेसमोरच्या झोपडीतील पवार दाम्त्पत्याला भेटा. त्यांची मनाला चटका लावणारी मात्र प्रेमावर विश्वास दृढ करणारी जीवन कथा आपल्याला भावविवश केल्याशिवाय राहणार नाही.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात माणुसातील जगण्याची जिद्द हळूहळू कमी होत चालली आहे. पती-पत्नीतील प्रेम आता फक्त कागदावरच वाचायला मिळतो. विवाहात सप्तपदीच्यावेळी घेतलेल्या सात जन्माच्या आणाभाका आता फक्त एक धार्मिक विधी आणि औपचारीकता बनल्या आहेत. पण आजही सात फेर्यांच्या वेळी घेतलेल्या सात जन्माची शपथ पुर्ण करणारीही काही जोडपी शिल्लक आहेत. जीवन जगणे अगदी असह्य झाले तरी एकमेकांना न सोडता आला क्षण साजरा करण्याची त्यांची धडपड ही धडधाकट अन् ऐश्वर्यसंपन्न जोडप्यांनाही लाजवणारी आहे. जगण्याची बिकट वाट…हवी फक्त तुझीच साथ… हवी फक्त तुझीच साथ! या ओळींना साजेशीच कहाणी आहे जळगावातील वयोवृध्द पवार दाम्पत्याची! शहरातील जुने मेहरुण रस्त्यावर जय भवानी शाळेसमोर अगदी फाटकी, मोडकी झोपडी कुणालाही दिसून येईल. खर तर शहरात अनेक झोपड्या आहेत. मात्र ही झोपडी अत्यंत अनोखी आहे. या निराधार कुटुंबातील पती हा कर्णबधीर तर पत्नी ही अंध आहे. काळाच्या ओघात उद्ध्वस्त होत चाललेल्या व्यवसायात काबाडकष्ट करून ते उदरनिर्वाह करीत आहेत. गोर्ह्याबाई शंकर पवार व शंकर लदू पवार दोघांनी सत्तरी ओलांडलेली. गोर्ह्याआजींना आपला जन्म १९३६ सालचा असल्याचे आठवते. बाबांना तर तेही माहित नाही. आजी डोळ्यांनी अंध तर शंकरबाबा हे बहीरे. पण या शारिरीक व्यंगावर दोघांनी एकमेकाच्या प्रेमाच्या आणि साथीच्या जोरावर मात केलेली. त्यांचा व्यवसाय लोहार कामाचा. शेती अवजारांना धार देत आपला उदरनिर्वाह चालविणारी ही जोडी. आता अत्याधुनिक अवजार आल्यामुळे धंदा तसा नावापुरताच. कधी आलेच तर १५-२० रुपयापेक्षा जास्त नाहीच. अंगावर एक जोडी वस्त्र, एक मोडकी खाट, एक पातेले, एक ताट, दोन गोधडी हा त्यांचा संसार. पण याच फाटक्या संसाराची त्यांना कसलीही लाज नाही कि कमीपणा नाही, कारण जे आहे ते स्वत:च्या कष्टाचं आणि मेहनतीचं. शंकरबाबाला ऐकू येत नसल्यामुळे आजीच गिर्हाईकाशी कामाचा भाव ठरविणार, तर गोर्ह्याआजीला दिसत नसल्यामुळे भाता किती जोरात फिरवून, आग वाढवायची ते सांगतात. एकमेकाला कामात साथ देत दिवस मावळायची वाट बघायची, कोणी स्वत:हून खायला दिले तरच घेणार. पाठीचा कणा वाकलेला असला तरी मोडलेला नाही. एकमेकांच्या पाठीवर हात ठेवून हे एकमेकाला जगण्याची जिद्द देत आहेत. या दाम्पत्याला मुलगा नाही. एक मुलगी असून तिचे पती वारलेले. तीदेखील अत्यंत हलाखीच्या स्थितीत मेहरूण येथील स्मशानभूमिजवळ राहते. एका अर्थाने हे कुटुंब पूर्णत: निराधार आहे. मात्र काही वर्षांपूर्वी आलेल्या पुरामध्ये संसारोपयोगी वस्तूंसह रेशन कार्डही वाहून गेल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. कार्ड मिळवण्यासाठीची धडपड हे जोडपे करू शकत नाही. गोर्ह्याआजी यांना काहीही दिसत नसले तरी आपल्या पतीची आवडती भाजी हळूहळू त्यांच्याच मदतीने बनविते आणि त्यात तीला एक जगावेगळा आनंददेखील मिळतो. एका ताटात जेवण करत आपल्या प्रेमाचा ओलावा लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर देखील ते जपतात. रात्री नंतर उगवणारा दिवस परत त्यांचा तोच संघर्ष सुरु करतो. आजच्या या युगात छोट्या-मोठ्या कारणांमुळे वाढलेली घटस्फोटची संख्या पाहता पवार दाम्पत्याचे हे वैवाहीक जीवन खरच एक आदर्श आहे. आजचे तरुण-तरुणी तर साथीदारातील थोडेसेही शारीरिक व्यंग सहन करु शकत नाहीत. संसारात थोडाही फाटकेपणाही सहन करण्याजोगा नसतो. पण ही जोडी शारीरिक व्यंगासोबत आपला फाटका संसार आजही तेवढ्याच ताकदीने आणि आनंदाने करीत आहेत जेवढा पुर्वी करीत होते. आज माणसाच्या गरजा दिवसेंदिवस वाढल्या असल्या तरी मात्र आपसातला प्रेमाचा ओलावा वाढलेला नाही. जीवनात दारीद्रय आले म्हणून आत्महत्या करणारे दाम्पत्य देखील आहेत. पण जीवनात पराकोटीचे दारीद्रय असूनही शंकरबाबाने आपल्या पत्नीची साथ आजही सोडलेली नाही. सुख-दु:खाचे भागीदार, मित्र-मैत्रीण, नातेवाईक हे दोघं जणच एकमेकाचे सर्वकाही! क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या करणारे, फाटक्या संसाराची लाज बाळगणारे, छोट्या-मोठ्या रुसव्या-फुगव्यांवरुन घटस्फोट देणारे या सर्वांसाठी या दाम्पत्याचे जीवन एक आदर्श आहे. या दोघांच्या जीवन जगण्याच्या जिद्दीला अन् त्यांच्या प्रेमाला खरंच सलाम आहे… सलाम आहे!
समाजाला आवाहन
आज समाजात दानशुरांची कमी नाही. अनेक व्यक्ती आणि संस्था समाजातील गरजूंच्या मदतीसाठी हिरीरीने समोर येत असल्याचे आपणास दिसून आले आहे. काही जण यात निव्वळ चमकोगिरी करत असले तरी बरेच जण अगदी खरीखुरी मदत करत असतात. पवार दाम्पत्यासारख्या अक्षरश: उद्ध्वस्त आयुष्य जगणार्यांच्या मदतीला समाजातून हात सरसावतील का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
<प्रसिद्ध दिनांक २९ ऑक्तोबर १२ >
****************************