गोवंशहत्या बंदी कायद्यावर राष्ट्रपतींची मोहोर उमटल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली.अर्थात हा कायदा करणार्यांनी राज्यात पुढील निवडणूक कोणत्या मु्द्यावर लढायची, सोय आतापासून करून ठेवलेली दिसत,े असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.एकेकाळी आपला धर्म दुसर्यांवर लादून मोगल सम्राटानी जी विकृती दाखविली तीच विकृती आता फडणवीस सरकार दाखवीत आहे.आपल्या धर्मातील अमान्य गोष्टी इतरांवर लादून त्यांच्या खाद्यसंस्कृतीवर केलेला हा घालाच म्हणावा लागेल.जखम बेंबीला…मलम शेडीला ! अशीच सरकारची सध्या भूमिका आहे.विशिष्ठ समुदायावर जबरदस्तीने लादलेला या निर्णयामुळे मोगल सम्राट आणि फडणवीस सरकारमध्ये फरक काय ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
आपल्या धर्मातील मते आपण जबरीने दुसर्यावर कशी लादू शकतो?भविष्यात यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जातीय तणाव बघावयास मिळू शकतो.मुख्यमंत्र्यंानी फक्त मोजक्या लोकांना खुश करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंंत्र्याच्या गळा आळवला आहे.पृथ्वी तलावरील जन्म घेणार्या प्रत्येक सजीवासाठी जीव हा महत्वाचाच असतो.त्यामुळे करायचीच होती तर संपूर्ण प्राणी हत्याबंदी कायदा करायला पाहिजे होता.कोंबडी,बोकड कापलेला चालेल पण बैल नाही ? हा कपटी स्वार्थ कुणासाठी? आणि कोणी काय खावे- प्यावे, हे पण आता सरकार ठरविणार का ? ज्या सनातनी डोक्यातून हे भूत अवतरले आहे.त्यांना तर मनूचा कायदा देखील पाहिजे आहे; मग फडणवीस सरकार तो पण लागू करेल का ? असेच सुरु राहिले तर ,ते पण काही कठीण नाही वाटत.
१९७६ च्या कायद्या नुसार अनप्रोडक्टीव्ह गाय, बैल, म्हैस आदींची कत्तल करण्यास परवानगी आहे,विनोबा भावे यांनी देखील यासंदर्भात पुढाकार घेतला होता.त्यावर मुस्लीम समुदायातील अनेक खाटिकांनी आपण गाय नव्हे ,तर फक्त बैल कापतो असे सांगितले,गाय कापली तर भविष्यात आम्हाला बैल कुठून मिळणार; असा वस्तूनिष्ठ तर्क त्यांनी त्यावेळी मांडला होता.असो पण एक लक्षात घेतले पाहिजे की,आज दुष्काळात महाराष्ट्रातील अनेक शेतकरी मागील काही वर्षापासून होरपळत आहे.ज्याठिकाणी माणसाना जेवणाचे वांधे झाले आहेत.अशा परीस्थितीत शेतकरी भाकड जनावरांना चारा कुठून आणणार आहे.त्यांच्याकडून पोटाच्या मुल बाळांची व्यवस्था होत नाही, तो शेतकरी भाकड जनावरांना कुठून पोसणार आहे.ज्या उच्च जातीतील लोकांनी कधी गरिबी आणि सामाजिक तिरस्कार अनुभवला नाही त्यांना जनावरांचे मटन खाणेे बुद्धीला कधीच पटणार नाही.परंतु ज्यां समुदायाच्या लोकांना कधीकाळी उभ आयुष्य गावाबाहेर काढावे लागत असे, भूकेेने आपली पोटची गोळीे अश्रू गाळताना ज्यांनी पहिली त्यांना माणूस आणि जनावरातील फरक कळेनासा झाला होता,म्हणून मेलेल्या जनावराचे मास खाण्यात त्यांना काहीच गैर वाटले नसावे.तेव्हापासूनच नकळत अनेक जातींच्या खाद्य संस्कृतीचा हा भाग बनून गेला आहे.
खर तर याला त्यावेळीची कट्टर जातीयता जबाबदार होती.त्यावेळी किमान माणूस म्हणून त्यांच्याकडे पहिले असते तर ही खाद्यसंस्कृती पहावयास मिळाली नसती.धर्माच्या अनेक ठेकेदारांना मुस्लीम मित्रांच्या घरातील लग्नातून आपल्या घरी गपचूप डब्बे मागविताना पाहीले आहे.आणि त्यांनाच धर्माच्या गप्पा मारताना देखील ऐकले आहे.अरे…माणसाला भूकेला ठेवला तर तो माणसालाच खायला कमी करणार नाही,जनावरे कुठे लागली हो ! आज भारतातील अनेक धर्मातील लोक जनावरांचे मटन खातात.त्यात महाराष्टातील लोकांचा देखील समावेश आहे.असे नाही की,फक्त मुस्लीम लोक हे मटन खातात खिर्चन,पारशी यांच्यासह हिंदू धर्मातील अनेक जातीत व आसाम भागातील लोकही अशी मटन खातात.त्यामुळे कोणी काय खावे, हे आपण ठरवू शकत नाही.तो आपला अधिकार देखील नाही.शेवटी धार्मिक आचरण हे आतून आले पाहिजे,लादलेल्या गोष्टींमुळे अन्यायाची भावना निर्माण होते.किवा त्याचा काळाबाजार सुरु होतो.आज खाद्य संस्कृतीवर डोळा आहे.उद्या सुरक्षेेच्या नावाखाली पेहराव आणि राहणीमान देखील बदलावयाचे सरकारनेच ठरविले तर आश्चर्य वाटायला नको. फडणवीस सरकार यामुळे एका धर्माकडे झुकल्याचे दिसत आहे.फडणवीस साहेबाना एक सांगू इच्छितो, ज्यावेळी आपण या राज्याचे मुख्यमंत्री बनलात त्यावेळी आपला धर्म आणि जात फक्त महाराष्ट आहे.त्यामुळे विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी दुसर्याच्या अभिव्यक्ती स्वतंंत्र्यावर घाला घालणे गैर आहे.कोणत्याही प्राण्याची हत्याही माणुसकीला धरूनच नाही,या मताचा मी आहे.रविवारी चिकन किवा मटन खाणे हा आजच्या पिढीच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग झाला आहे.हिंदू धर्मातील बहुतांश जातीमध्ये बोकड,कोंबडी नवस करून कापले जातात.मग त्यांच्या हत्येवर बंदी का नाही ? या जनावराना जीव नाही का ? तुमच्या धर्मात चालते म्हणून काही हरकत नाही आणि ज्या गोष्टी चालत नाही त्यावर बंदी वा रे ! ही तर पेशवाई झाली. औरंगजेब,बाबर,मोगल सम्राटपासून तर आताच्या अरब राज्यातील कट्टर कथित मुस्लीम नेते इतर जातीतील लोकांना मुस्लीम धर्म स्वीकारण्यापासून ते मुस्लीम उत्सव जबरीने साजरे करायला लावायचे किंबहुना जगातील अनेक देशात आजही करायला लावतात.पाकिस्तानमधील हिंदू दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात ईद साजरी करतात. हे सर्व करवून घेण्यासाठी पाकिस्तानातील धार्मिक सत्तेचा वापर हातोे.मग आता महाराष्ट्रात जे घडत आहे,त्यात काय फरक ? काही नाही ! हिंदू धर्माच्या भावना जुळल्या असल्याचे सांगून गोवंश हत्याबंदी केली गेली,मग मुस्लीम धर्मात वराहचे मटन पाप आहे. हिंदू धर्मातील अनेक जातीतील तसेच इतर धर्मातील अनेक लोक देखील वराहचे मटन खातात.उद्या मुस्लिमांनी वराहच्या मटनबंदीची मागणी केली किंवा जैन किवा ब्राम्हणाकडून बोकड,कोंबडी,अंडी यांच्यावर बंदीची मागणी केली गेली तर फडणवीस सरकारची काय भूमिका असेल? या प्रश्नांचे उत्तर त्यांना आज नाही तर उद्या द्यावेच लागेल.शेवटी दुजाभाव जास्त दिवस नाही करता येणार.
शेवटी एक स्पष्ट करू इच्छितो मी कोणत्याही प्रकारच्या प्राणी हत्येचे समर्थन करीत नाही,किंबहुना मी त्याच्या विरोधातच आहे.परंतु भविष्यातील राजकीय सोय म्हणून घेण्यात आलेल्या निर्णय मला खटकला म्हणून मत मांडले.निर्णय घ्यायचाच होता तर तो सर्वसमावेशक पाहिजे होता.तुमची धार्मिक मते कुणावरही लादता कामा नये.कारण प्रत्येकाचे काही मुलभूत अधिकार आहेत.त्यावर घाला व्हायला नको एवढेच !
माझे फेसबुक फ्रेन्ड ‘एम.डी.रामटेके’ यांच्या स्टेटसवर ‘अभिराम दिक्षीत’ यांची प्रतिक्रिया मुद्दाम टाकत आहे,कारण त्यांची प्रतिक्रिया देखील मला या विषयावर समर्पक वाटली.त्याच प्रकारे लोकसत्तामधील ‘गोवंश हत्या बंदीचे अर्थकारण’ या लेखाची लिंक देखील देत आहे.कारण आधीच शिक्षणाचा आभाव असणाऱ्या मुस्लीम समाजातील लोक यामुळे बेरोजगार होतील आणि या समाजाची आर्थिक स्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे.तशात हे तरुण वेगळ्या मार्गाला लागले तर त्याला जबाबदार कोण ?आणखी आतंकवादीचे समर्थक म्हणायला आपण मोकळे. त्यामुळे याचे उत्तर देखील फडणवीस सरकारला द्यावे लागेल.
“ काय खावे – प्यावे यावर निर्बंध लादणारे सरकार कोण ? हा मुद्दा खाद्य स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याशि निगडित आहे . धार्मिक अधिष्ठानाचे कायदे खपवून घेणार नाही . विरोध गोहत्या बंदीला नसून बुद्धीहत्येला आहे . मी स्वत: आता शाकाहारी झालो आहे . सर्व प्राणि निरागस असतात आणि त्यांना मारू नये असे व्यक्तिगत रित्या मला वाटते . ….कायदा सर्व प्राण्याबाब्त नाही. आणि स्वत:ची धार्मिक मते दुसर्यावर थोपवायला हे काही उझबेकिस्तान नाही . गायीच्या बाबतीतला कायदा धार्मिक मुद्दा समोर ठेवून केलेला आहे .सौदी अरेबियात काफ़रानाहि सक्तीने रोजा पाळायला लागतो . आपण काही वेगळे आहोत कि नाही ? सरकारने तसाच कायदा आणला आहे . मुस्लिमांचा – ख्रिस्त्यांचा – आणि मुख्यत: पारशांचा खाद्याधीकार काढून घेणे अमानुष आहे. मानवाधिकाराची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचि पायमल्ली आहे. हिंदुच्याहि अनेक जाती गोमांस खातात . इशान्य भारतातले बहुसंख्य हिंदु गोमास खातात . महाराष्ट्रातील अनेकांना त्यांच्या रोजच्या स्वस्त प्रोटिन सोर्स ला मुकावे लागेल . खरे पाहता वेदातही गोमेध तुरळक् प्रामाणत आहेतच .असे काही प्रतिष्ठित अभ्यासक मानतात काही मानत नाही . वेदात काहीही लिहिलेले असो… ते काही असो हे चूक आहे…. आणि बुळचट धार्मिक अधिष्ठानावर कायदे बनवणे हि बुद्धीहत्या आहे . विरोध बुद्धीहत्येला आहे.“
– Abhiram Dixit
(लोकसत्ता मधील ‘गोवंश हत्या बंदीचे अर्थकारण’ लेखची लिंक )
http://www.loksatta.com/sampadkiya-news/maharashtra-bans-cow-slaughter-1077615/