जळगाव – मागील काही दिवसांपासून शहरात व जिल्ह्यात एका विशिष्ट पध्दतीने म्हणजे चोर्यांची ‘मोडस ऑपरेडी’सारखीच असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे घरात चोरी होत असतांना झोपलेल्या लोकांच्या जवळून ये-जा केल्यानंतर देखील त्यांना जाग येत नसल्यामुळे चोरटे बुरनडंगा या गुंगी आणणार्या अंमली पदार्थाचा वापर करीत असल्याची दाट शक्यता आहे. मागील महिन्याभरापासून शहरात व जिल्ह्यातील काही भागात चोरटे एका विशिष्ट पध्दतीने घरफोडी करत असल्याचे समोर आले आहे. त्यात खिडकीचे नट (स्क्रु) खोलत खिडकी बाहेर काढून त्याद्वारे घरात प्रवेश करण्याच्या प्रकाराचा समावेश आहे. दि.२१ जून रोजी चोपडा येथे अग्रेसेन कॉलनीत अशास पध्दतीने अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत २ लाख ३७ हजाराचा ऐवज लंपास केला होता. शिक्षक असलेले पद्माकर पाटील हे घरात झोपलेले असतांना चोरटे त्यांच्या अंगावरून ये-जा करून घरातील सोने व रोकड लांबविली तरी त्यांना जाग आली नव्हती. जळगाव येथे रामदास कॉलनीत २७ जूनला प्लॉट नं.३५ मध्ये नितीन लोखंडे यांच्या घरातदेखील खिडकीचे नट उघडून आत प्रवेश करण्यात आला. परंतु याठिकाणी त्यांना रिकामे हाती परतावे लागले. परंतु त्याच दिवशी लोखंडे यांच्या घरापासून काही अंतरावर चोरट्यांनी एका घरात चोरी केली होती व त्याठिकाणाहून १० ते १५ हजाराची रोकड गेली होती. परंतु त्रास नको म्हणून याबाबत पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे या दोन्ही चोरींमध्ये देखील घरातील सदस्य अगदी जवळ झोपले असतांना चोरटे घरात कपाटाची व इतर वस्तूची झाडाझडती घेण्याचा आवाज त्यांना आला नाही. काल दि.२८ जून रोजी स्वामी विवेकानंद नगरातील हरीश डिगंबर भोळे यांच्या घरातून ३० हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या व ५ हजाराची रोकड लंपास झाली होती. विशेष म्हणजे भोळे यांच्या आईच्या उशीखाली ठेवलेली घराची चावी चोरट्यांनी काढून ही चोरी केली होती. चावी काढतांना त्यांनादेखील जाग आली नाही व आज देखील गणपती नगरमध्ये बांधकाम व्यवसायीक दिलीप झांबड यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांच्या आजूबाजूने गेले, घरातील दोन खोल्यांमध्ये बराच वेळ थांबत झाडाझडती घेतली तरीही त्यांना याचा पत्ता लागला नाही. या सर्व चोर्यांमध्ये चोरट्यांची चोरी करण्यासाठी घरात प्रवेश करण्याची पध्दत व घरातील सदस्यांच्या जवळून सहजतेने वावरून ऐवज लंपास करण्याची हिंमत बघता त्यांच्याकडून चोरीसाठी ‘बुरनडंगा’ या अंमली पदार्थाचा वापर होत असल्याची दाट शक्यता दिसत आहे. बुरनडंगा हे ‘स्कोपोलामाईन’ म्हणून देखील ओळखले जाते. स्कोपोलोमाईनचा वापर गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती मोठ्या प्रमाणात करीत असतात. त्यात बलात्कार किंवा समोरच्या व्यक्तीस बेशुध्द करण्यासाठी वापर होत असतो. बुरनडंगा हे अगदी साध्या पध्दतीने समोरच्या व्यक्तीच्या शरीरात पोहचविले जावू शकते. त्यात व्हिजीटींग कार्ड देतांना, समोरच्या व्यक्तीला स्पर्श करतांना, भित्तीपत्रके वाटतांना सह आदी प्रकारांचा समावेश आहे. बुरनडंगा शरीरात गेल्याबरोबर समोरील व्यक्ती काही सेंकदातच शुध्द हरपतो. वरील सगळ्या चोर्यांमध्ये घरातील झोपलेले सदस्यांच्या जवळ चोरटे वावरून देखील जाग न येण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या चोर्यांमध्ये बुरनडंगा या आमली पदार्थाचा वापर केला जाण्याची शक्यता जाणवत आहे. या दिशेने पोलीसांनी तपास करण्याची गरज आहे. दरम्यान, बुरनडंगा हाताळण्यासाठी कौशल्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबईत याचा वापर करण्याचा टोळीचा काही वर्षांपुर्वी पर्दाफाश झाला होता. तेव्हाच हा प्रकार जगासमोर आला होता. व्हिजीटिंग कार्ड दिल्यानंतर, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वा रेल्वे प्रवासातील खाद्यपदार्थ देऊन केलेली लूट आदींमध्येही बुरनडंगाचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. इंटरनेट व मोबाईलचा वापर वाढल्यानंतर पोलीसदलात ‘सायबर सेल’ कार्यरत झाला आहे. याचप्रमाणे घातक रसायने अथवा अंमली पदार्थांचा वापर करून होणारी लुट थांबवण्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असणारे पथक निर्मितीची आवश्यकताही यातून अधोरेखित झाली आहे.
पोलीसांची नाही गस्त…चोरी झाली स्वस्त
गेल्या काही दिवसांपासून शहरातील चोरींचे व घरफोडींचे सत्र वाढले आहे. पिंप्राळा रेल्वे गेटजवळ एकट्या राहणार्या वृध्द महिलेच्या घरी दरोडेखोरांनी घातलेला हैदोस असो की आज दिलीप झांबड यांच्या घरी झालेली चोरी असो. या चोरीच्या वाढत्या सत्रांमुळे नागरीकांना गस्त घालण्याची वेळ आली आहे. चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळमुळे नागरीकांची झोप उडाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून पोलीसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. परंतु पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शहरात चोरी करणे अगदी सोपे व सहज झाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
काय असते बुरनडंगा
नवनवीन तंत्रज्ञानाचा जगभरातील चोरटे वापर करत असतात. याचप्रमाणे गुंगी आणणारी अनेक औषधे व रसायनेही वापरण्यात येतात. यातच बुरनडंगाचा समावेश होतो. बुरनडंगा हे दक्षिण अमेरिका व विशेषत: कोलंबियात आढळूून येणार्या ब्रुगमान्सीया या वनस्पतीपासून तयार करण्यात येते. औषधनिर्माणशास्त्रात स्कोपोलामाईन नावाने याला ओळखले जाते. या अंमली पदार्थाचा अगदी त्वचेला स्पर्श झाला तरीही समोरच्या व्यक्तीला गुंगी येते. यामुळे याचा वापर करून लोकांना लुबाडणार्या टोळ्यांची संख्या दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आहे. नजीकच्या काळात जगभरात याचा वापर वाढला असून यात भारताचाही समावेश आहे. याचा सर्वाधीक वापर हा पावडरच्या स्वरूपात होतो. मात्र काही प्रकरणांमध्ये ‘स्प्रे’च्या माध्यमातूनही याचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे.