आपल्या देशात चित्रपटांबाबत होणारे वाद नवीन नाहीत. ‘पद्मावत’ नंतर सध्या प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांचा जीएसटी (God, Sex and Truth) अर्थात ‘गाॅड,सेक्स आणि ट्रुथ ‘ हा ‘पॉर्न’ सिनेमा वाद निर्माण करतोय. या चित्रपटाबाबत वर्मा म्हणतात, ‘देवाला अभिप्रेत असणारा सेक्सचा अर्थ’ या चित्रपटात आपण उलगडून दाखवला तसेच वर्षानुवर्षं दडपलेल्या स्त्रीच्या लैंगिक आकाक्षांचा हा मुक्त आविष्कार असून एका अर्थाने तो स्त्रीला मुक्त करणारा अनुभव आहे. तर वर्मा महिला सबलीकरण करत नसून, पॉर्नला उत्तेजन देत आहेत. स्त्रियांच्या लैंगिकतेचा आविष्कार म्हणून ते अश्लीलतेचे समर्थन करत आहेत. हे असलं काही करणे म्हणजे ‘महिलांचा उद्धार’ नाही,असं काही महिला संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत समाजात अधिक गैरसमज वाढण्यापेक्षा ‘काम,परमेश्वर आणि सत्य’ आपल्याला आचार्य रजनीश (ओशो) यांच्या माध्यमातून समजून घेणे गरजेचे ठरते.
ओशो आपल्या एका प्रवचनात म्हणतात, सेक्स एक शक्ती असून तिला समजणे कसे गरजेचे आहे. मानवी जीवनाला अधिक समृद्ध करण्याच्या दिशेने मार्गदर्शन करतांना ओशो सांगतात. मनुष्याने सेक्सला विकृतीशिवाय दुसरा कुठलाही सन्मान दिला नाही. सेक्सच्या विषयावर बोलताना आम्ही प्रचंड घाबरतो. मनुष्य सेक्स अशा पद्धतीने लपवून ठेवतो,जसं त्याचे अस्तित्व या जगातच नाही. परंतु सत्य यापेक्षा वेगळे आहे, मानवी जीवनात सेक्स शिवाय अन्य महत्वपूर्ण असं काहीही नाही. परंतु मानवाने सेक्सला लपवले,अंतरमनात दाबले.असं केल्याने सेक्सपासून मानवी जीवन मुक्त होणार नाही. याउलट मनुष्य अधिक कामवासनेने पेटून उठेल. ‘कुए’ नामक महान विचारवंताने सांगीतलेले आहे की, आपल्या चेतनेचा ‘लॉ ऑफ रिवर्स इफेक्ट’ हा एक नियम आहे. या नियमानुसार मानवी स्वभावानुसार आपण ज्या गोष्टीपासून पळण्याचा प्रयत्न करतो,चेतना त्याच गोष्टीवर केंद्रित होऊन जाते,परिणामी वारंवार तिच्यासोबतच आपला संघर्ष होतो. सेक्स देखील यापेक्षा वेगळी भावना नाही.
परमेश्वर,काम आणि सत्य समजून घेतांना सेक्स मानवी जीवनाचे एक सत्य आणि तथ्य असल्याचे समजून घेणे गरजेचे आहे. परंतु हे समजून घेतांना परमेश्वर आपल्यापासून अद्याप बराच लांब असल्याचे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. सेक्स मानवी जीवनाचे तथ्य असून या तथ्याला समजून मनुष्य परमेश्वराच्या सत्य प्रर्यंतची यात्रा करू शकतो. परंतु सेक्सला समजून घेतल्याशिवाय मनुष्य या यात्रेसाठी एक इंच देखील पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे परमेश्वर,काम आणि सत्य या गोष्टी आपल्याला तटस्थपणे स्वीकाराव्या लागतील.
आपल्याला या जगात सेक्सचे ज्ञान कुणीही देत नाही. संपूर्ण जग तर जणू सेक्स समजावून सांगण्याच्या विरोधात असते. आई-वडील,शिक्षक,धर्म,शास्त्र सर्वच त्याकडे तुच्छतेच्या नजरेने बघतात. कोणतीही शाळा,विद्यापीठ आपल्याला सेक्स समजावून सांगत नाही. तरी देखील जीवनात एक दिवस असा उजाडतो की, आपले सर्व पंचप्राण कामवासनेने भरले गेल्याची अनुभूती आपल्यला होते, हे कसे शक्य होते? कुणीही न सांगता कामवासनेला आपण कसं ओळखून घेतो? याचे उत्तर कुणाकडेही नाही. दुसरीकडे आपल्याला ‘सत्य आणि प्रेमा’ची शिक्षा दिली जाते परंतु आपणास आयुष्यभर या दोन शब्दांची अनुभूती होत नाही. त्यामुळे सेक्सचे प्रचंड आकर्षण आणि नैसर्गिक केंद्र काय आहे? निश्चित यात एक रहस्य असून हे रहस्य समजून घेतल्यास आपल्याया त्यातून मुक्ती देखील मिळू शकते. ‘प्रेम आणि काम’ विरुद्ध गोष्टी आहेत. प्रेम जेवढे वाढत जाते, तेवढीच कामभावना कमी होत जाते. प्रेम जेवढे कमी होईल तेवढीच कामभावना वाढेल आणि जेवढे प्रेम वाढेल तेवढीच कामवासना क्षीण होत जाईल. ज्या व्यक्तीच्या मनात प्रेम जितके भरलेले असेल, तेवढीच कामवासना त्याच्यात विलीन होऊन जातो. आपले मन प्रेमाने ओसंडून वाहू लागल्यानंतर आपल्या अंतरंगात कामवासानेसारखी कुठलीही गोष्ट नसल्याची अनुभूती देखील आपल्याला होते. परंतु आपल्या मनात जर प्रेम नसेल तर, मात्र अंतरंगात संपूर्ण कामवासना असल्याची जाणीव आपल्याला वेळोवेळी होत असते.
काही वर्षांपूर्वी ओशोंनी ‘संभोगातून समाधी’कडे हा मंत्र दिला आणि संपूर्ण देश त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागला. कारण आपण सेक्सला चारित्र्याची जोड देतो. सेक्सला आपण साक्षीभावाने कधी बघतच नाही. तसंही भारतात ‘सेक्स’वर जाहीर चर्चा करणे हे चारित्र्यहीनतेचे लक्षण मानले जाते. परंतु पाश्चत्य देशामध्ये सेक्सवर आज सहजतेने चर्चा होते. अन्न,वस्त्र आणि निवारा याप्रमाणे मानवी शरीराची सेक्स ही देखील एक गरज असल्यामुळे जागतिक स्तरावर सेक्सच्या बाबतीत एक खुलेपणा आलेला आहे. परंतु आपल्या देशात आत्ताची आणि भविष्यातलीही सगळ्यांत मोठी कुतूहल आणि गुप्ततेची गोष्ट म्हणजे सेक्स असेल,असं मला वाटते.
Nice concept by Osho ….
सुंदर समीक्षा आहे.