मी व्यक्तीगत कुणाही संदर्भात भूमिका मांडलेली नाही. विशिष्ट मोबाईल क्रमांकांबद्दल आणि त्यावरून झालेल्या संभांषणावर माझा आक्षेप आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे माझे टार्गेेट नाही, असा स्पष्ट खुलासा ईथीकल हॅकर मनिष भंगाळे यांनी ‘साईमत’शी बोलतांना केला. विशेष म्हणजे त्यांनी काल खडसेंविरूद्ध नव्हे तर, ‘त्या‘ पाच मोबाईल क्रमांकाची चौकशी व्हावी, म्हणून हायकोर्टात याचिका दाखल केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
खडसे यांची राजकीय कारकिर्द संपविण्यासाठी आपला उपयोग केला जातो आहे का? या प्रश्नांचे उत्तर देतांना भंगाळे म्हणाले की, मला राजकारणाचा गंध नाही, मी व्यक्तीश: कुणाचेही नाव घेतले नाही, त्यामुळे या आरोपात तथ्य नाही.कॉंग्रेस, आम आदमी पार्टी यांनी या विषयात केलेल्या राजकारणाशीही मला देणे घेणे नाही. एनटीआरओ, रॉ, आयबी यासारख्या सुरक्षा यंत्रणाच्या रडारवर हे फोन कॉल्स व त्यांचे संभाषण का आले नाही, यावर भंगाळे यांनी कदाचित हे फोन कॉल्स मिस्प्लेस (गहाळ) झाले असतील किंवा भविष्यात ते या कॉल संदर्भात अधिक माहिती मिळावी म्हणून गुप्तता पाळत असतील, असा दावा त्यांनी केला. खडसेंच्या व्यतीरिक्त ‘त्या’ चार क्रमांकाच्या व्यक्तींबद्दल मीडियामध्ये का चर्चा होत नाही? या प्रश्नांवर भंगाळे उत्तर देतांना म्हणाले की, खडसे मंत्री असल्यामुळे त्यांच्यावर कदाचित मीडिया फोकस करत असेल. परंतुु ‘त्या’ चार लोकांचे देखील तथ्य समोर आले पाहिजे. आणि यासाठीच आपण न्यायालयात कुणा व्यक्तीविरूद्ध नव्हे तर ‘त्या’ मोबाईल क्रमांकांविरूद्ध याचिका दाखल केली आहे, असे ते म्हणाले. दरम्यान फोन करणारी महिला दाऊदची पत्नीच तसेच ते लॅण्डलाईन क्रमांक दाऊदचेच आहेत. यासंदर्भात आपल्याकडे काही पुरावे आहे का? त्यावर भंगाळे यांनी पुरावे आहेत, परंतु ते सुरक्षतेच्या कारणास्तव आपल्याला देता येणार नाही, असे सांगितले.
‘ते’चौघे मोबाईलधारक समोर का येत नाही ?
मनिष भंगाळे यांनी दाऊद सोबत कधीच संभाषणाबाबत एप्रिल महिन्यात पाच नंबर जाहीर केले होते. त्यापैकी आसाम राज्यातील कॉंग्रेसचे नेते राणा गोस्वामी यांचा मोबाईल क्रमांक ९८६८५३७७५६, राजस्थानमधील जुबेर खान यांचा ९४१४०१७२७७, आंध्रप्रदेशमधील चिन्ना रेड्डी यांचा ९४४०२९५००२ तर नवी दिल्लीमधील सतिष नामक व्यवसायिकाचा ९८६८५३७७५५ हा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला होता. हे क्रमांक भंगाळे यांच्याकडून माध्यमांसमोर आल्यानंतर काही दिवस हे मोबाईल क्रमांक सुरू होते. त्यानंतर मात्र हे क्रमांक बंद झाले. दाऊद सोबत संभाषण झाल्याचा आरोप झाल्यानंतर फक्त एकनाथराव खडसे हेच माध्यमांसमोर आले. परंतु राणा गोस्वामी, जुबेर खान, चिन्ना रेड्डी किंवा सतिष यापैकी कुणीही आपल्यावरील आरोपाचे खंडन करण्यासाठी समोर आले नाही. एवढेच नव्हे तर कुठल्याही माध्यमांचा प्रतिनिधी अद्याप त्यांच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यामुळे या लोकांची भूमिका स्पष्ट होत नाही. खडसेच याप्रकरणी मुद्दाम टार्गेट केले जात असल्याचा आरोप या निमित्ताने खडसे समर्थकांकडून केला जात आहे.
दाऊदची पत्नी आणि फोन नंबरबाबत पुरावे काय ?
दाऊदच्या वास्तव्याबाबत पाकिस्तान नेहमी नकारघंटा वाजवत आला आहे. यामुळे खडसे यांच्या मोबाईलवर आलेले फोन दाउदचे कसे? यावरून गुंता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मनिष भंगाळे यांनी सादर केलेले दाऊदच्या पत्नीच्या नावावरील फोन बील हे संबंधित पाकिस्तानी कंपनी,बील खरे आहे असे प्रमाणीत करीत नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा गुंता कायम राहणार आहे. याच प्रकारे पाकिस्तान सरकार अधिकृतरित्या दाऊद किंवा त्याच्या कुटुंबियासंदर्भात अधिकृत माहिती जगासमोर आणत नाही तो पर्यंत याप्रकरणाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कायम राहतील. हा विषय थेट राष्ट्रीय सुरक्षिततेशी निगडीत असतांना यावर सुरू असलेल्या ‘मीडिया ट्रायल’ आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एकाच सिरीजचे दोन नंबर
मनीष भंगाळे यांनी जाहीर केलेल्या पाच नंबर पैकी दोन नंबर एकाच सिरीजचे आहेत.आसाम राज्यातील कॉंग्रेसचे नेते राणा गोस्वामी यांचा मोबाईल क्रमांक ९८६८५३७७५६ आणि नवी दिल्लीमधील सतिष नामक व्यवसायिकाचा ९८६८५३७७५५ या मोबाईल क्रमांकमध्ये फक्त शेवटच्या एक आकड्याचा फरक आहे.वास्तविक बघता एखाद कंपनीची विशिष्ट क्रमांकांची सिरीज ही एकाच राज्यात दिली जात असते.
सतीश सोबत संवाद
दरम्यान,मनिष भंगाळे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व नंबर बंद येत होते. त्यापैकी नवी दिल्ली येथील सतिष यांचा ९८६८५३७७५५ हा नंबर काल दुपारी ४.३० वाजेपर्यंत सुरू होता. त्यांच्यासोबत साईमत प्रतिनिधीने केलेला संवाद जसाचा तसा खाली देत आहोत.
साईमत प्रतिनिधी – हॅलो… माझे बोलने सतिषजी यांच्यासोबत होत आहे का?
सतिष – कोण बोलतंय्…!
साईमत प्रतिनिधी – मी महाराष्ट्र, जळगाव येथून दैनिक साईमतचा प्रतिनिधी बोलत आहे.
सतिष – हॅलो…हॅलो…
साईमत प्रतिनिधी – माझा आवाज ऐकू येत आहे का?
सतिष – हा बोला…
साईमत प्रतिनिधी – मनिष भंगाळे यांनी आपल्यावर दाऊद संभाषणासंदर्भात लावलेले आरोप यावर आपले म्हणणे जाणून घ्यायचे आहे.
सतिष – हॅलो…हॅलो…आपला आवाज ऐकू येत नाहीय्.
साईमत प्रतिनिधी – सतिषजी मला आवाज स्पष्ट ऐकू येत आहे, आपण बोला.
सतिष – हॅलो…हॅलो…हॅलोे… (मोबाईल फोन कट केला.)
यानंतर पुन्हा त्या क्रमांकावर फोन लावला असता कट करण्यात आला. त्या नंतर पुन्हा फोन लावला असता फोन बंद करण्यात आला होता.