राज्याचे माजी महसूलमंत्री आ.एकनाथराव खडसे यांचे मंत्रीपद घालविण्यामागे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांचा निकटवर्तीय जामनेर भाजपा नेत्याचा मुलगा असून याप्रकरणी लवकरच पुरावे देणार !, अशी खळबळजनक पोस्ट मुंबईचे पत्रकार केतन तिरोडकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याबरोबर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. दरम्यान खडसेंचे मंत्रीपद घालविण्यासाठी हॅकर मनीष भंगाळेला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी फायनान्स केला असल्याचा खळबळजनक दावा तिरोडकर यांनी केल्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे.
सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल
फेसबुकवर मुंबईचे पत्रकार केतन तिरोडकर यांनी दि.5 ऑगस्ट रोजी दुपारी 3.26 मिनीटांनी ‘‘जामनेरचे भाजपा नेते आणि गिरीष महाजनचे कलेक्शन *** श्रीराम महाजन चे चिरंजीव दिपक महाजनने मोठा वाटा उचलला नाथाभाऊंच्या विकेटमध्ये, लवकरच पुराव्यांसकट’’अशी खळबळजनक पोस्ट टाकली. काल जिल्ह्यातील विविध व्हॉटस्अप गृ्रपवर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चर्चेला एकच उधाण आले. अनेक राजकारणी व भाजपा नेते एकमेकांना फोन करून या पोस्टसंदर्भात विचारणा करत होते. रात्री उशिरा दिप श्रीराम महाजन यांच्यावतीने देखील उत्तर म्हणून एक पोस्ट व्हॉटस्अपवर टाकण्यात आली. त्यात त्यांनी दिप व श्रीराम महाजन बदनामीबाबत माफी न मागितल्यास केतन तिरोडकर विरूद्ध पोलीस तक्रार दाखल करणार, तसेच कोर्टात खाजगी दावाही करणार असल्याचे म्हटले आहे. तिरोडकर यांना लिहलेल्या पोस्टमध्ये ‘‘आपण दि.5 ऑगस्ट रोजी फेसबुकवर आमचे विषयी खोटी व बदनामी कारक माहितीची पोस्ट टाकली आहे. त्यामुळे मी व माझे वडिलांची बदनामी होत आहे. तरी आतापासून 4 तासाच्या वेळेत आमच्या विषयीची पोस्ट आपल्या वॉलवरून डिलेट करून आमची जाहीर माफी मागावी- दिप श्रीराम महाजन’’ असे म्हटले आहे.दरम्यान, या पोस्टसंदर्भात भाजपाकडून अद्याप कोणतेही प्रतिक्रीया आलेली नाही. मात्र केतन तिरोडकर व दिपक महाजन यांच्या दाव्या-प्रतिदाव्यामुळे वातावरण गंभीर झाले आहे.
तत्कालीन महसूल व कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर में महिन्यात विविध आरोप करण्यात आले होते.त्यात प्रामुख्याने कथित पीए गजानन पाटील याने ३० कोटी रूपयांची मागितलेली लाच,कथित इथिकल हॅकर मनीष भंगाळे याने खडसे यांनी डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केल्याचा केलेला दावा, आणि खडसे कुटुंबियांनी भोसरी एमआयडीसीत खरेदी केलेला भुखंड हा बेकायदेशीर असल्याच्या आरोपांचा त्यात समावेश होता.खडसे यांना विरोधी पक्षाने नव्हे तर पक्षांतर्गत विरोधकांनी कोंडीत पकडल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते. या वादामुळे एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिला. त्यांना डॉन दाऊदशी संभाषण आणि लाच प्रकरणात क्लिन चीट मिळाली असून भोसरी एमआयडीसी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे. या सर्व प्रकरणात एकनाथराव खडसे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठराखण केली. मात्र स्थानिक पातळीवर खडसे समर्थक वगळता त्यांच्या समर्थनार्थ कोणताही मोठा नेता समोर आला नव्हता.तेव्हाच राज्यासह जिल्ह्यातील जनमानसात याबाबत चर्चा सुरू झाली होती. तशात आता मुंबईतील पत्रकार केतन तिरोडकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून यामागे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
तिरोडकरांच्या दाव्याने खळबळ
खडसेंचे मंत्रीपद घालविण्यासाठी गिरीष महाजन यांनी मनीष भंगाळेला फायनान्स केला आहे. या संदर्भात भंगाळे व त्यांच्या पत्नीची संभाषणाची ऑडीओ क्लिप माझ्याकडे आहे,असा उघड दावा पत्रकार तिरोडकर करीत आहे.याबबत तिरोडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते काश्मिरमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे तिरोडकर म्हणाले की, मनीष भंगाळे सध्या दुबईला गेला असून त्याच्या पत्नीसोबत झालेल्या संभाषणात त्याची पत्नी मनिषला सांगत आहे की, दिपक महाजन बँकेच्या खात्यात पैसे टाकायला गेले असल्याचे सांगत आहे तेच सांगण्यासाठी तुला फोन केला, असे मनीष आपल्या पत्नीला सांगत असल्याचे स्पष्ट ऐकू येते असा दावा तिरोडकर यांनी केला आहे. तिरोडकरांच्या या दाव्यामुळे खडसे राजीनामा प्रकरणाला नवीन वळण लागले असून भाजपातील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण पुन्हा एकदा चर्चीले जात आहे. तिरोडकरांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून याचे काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
100℅ True
खडसे साहेब भाजपच्या घाणेरड्या कुटनीतीचे बळी आहेत, जी बाब भाजप पक्ष्याच्या नैतिकतेला शोभत नाही. C.M. उघडे पडतील.