चूक कितीही लहान अथवा मोठी असली तरी भूतकाळात जाऊन तिला दुरुस्त करणे शक्य नसते. परंतु वर्तमान काळात त्या चुकीला दुरुस्त करण्यासाठी ‘क्षमा’ पेक्षा मोठे शास्त्र अथवा शस्त्र कोणतेच नाही. त्यामुळे ‘क्षमा’ मनुष्याच्या जीवनातील अनमोल आणि सर्वोत्तम गुण मानला जातो, क्षमाशील व्यक्ति नेहमी संतोषी, वीर, धैर्यशील, सहनशील तथा विवेकशील असतो. असा व्यक्ती नेहमीच शांतिप्रिय तथा मानसिकरित्या संतुष्ट असतो. क्षमा करण्याच्या प्रक्रियेत क्षमा करणार व्यक्ती हा क्षमा प्राप्त करणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक सुख प्राप्त करत असतो. जर आपण एखादं व्यक्तीची चूक माफ़ करतो तर एकप्रकारे आपण त्याच्यासह स्वतःची देखील मदतच करतो.त्यामुळे भीमा-कोरेगाव प्रकरणात कुणाची चूक,कोण बरोबर या भानगडीत न पडता, झालेली हिंसा आणि प्रतिक्रियेत हिंसा करणाऱ्यांनी माफी मागत हा विषय संपवला पाहिजे. कारण ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ ! हे वैश्विक सत्य असून बुद्धांची करुणा संपूर्ण जगासाठी होती, हे आपण विसरता कामा नये.
आचार्य रजनीश (ओशो) यांनी आपल्या एका प्रवचनात सांगितलेला किस्सा आहे. एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना प्रवचन देत असतात.अचानक एक व्यक्ती येतो आणि त्यांच्या तोंडावर थुंकूतो. त्यावर बुद्ध म्हणतात महोदय आणखी काही बोलायचय,काही करायचय का? त्यावर मान हलवीत तो व्यक्ती नाही म्हणतो. त्यानंतर बुद्ध त्याला हात जोडून नमस्कार करत जायला सांगिततात. या घटनेनंतर बुद्धांचा आवडता शिष्य आनंद म्हणतो…काय आपण त्याला काहीच बोलला नाहीत,साधं कारण देखील विचारले नाही.त्यावर बुद्ध म्हणाले असू दे,त्याचे कधी तरी मी मन दुखवले असेल,अपमान केला असेल. त्यावर आनंद म्हणाला, नाही हे शक्य नाही, मी इतक्या दिवसापासून तुमच्या सोबत आहे,आपण कधीच कुणाचे मन दुखवू नाही शकत.त्यावर बुद्ध म्हणतात या जन्मात नव्हे तर मागच्या जन्मात केला असेल अपमान किंवा दुखवले असेल मन त्यात काय एवढे. आनंदचे समाधान होत नाहीय, हे ओळखून बुद्ध म्हणतात मला वाद वाढवायचा नाही, हिशोब बरोबर झाला.त्याने थुंकण्याची क्रिया केली त्यावर मी प्रतिक्रिया व्यक्त न करता क्षमा करण्याची क्रिया केली. आनंदला बुद्धांचे म्हणणे पटले. तात्पर्य वादात मुनुष्य आपल्याच वेळेचे आणि शक्तीचे नुकसान करतो. क्षमा केल्याने कमीपणा येत नाही तर पुरुषत्व प्राप्त होते. जीजस क्राईस म्हणतात कुणी तुम्हाला एका गालावर मारले तर तुम्ही त्याच्या समोर दुसरा गाल पुढे करा,परंतु बुद्ध म्हणतात तुम्ही समोरच्याच्या हिंसेवर प्रतिक्रिया देऊच नका.कारण हिंसेवर व्यक्त केलेली कुठलीही प्रतिक्रिया भले ती चांगली असली तरी, तुमचा संबंध हिंसा करणाऱ्या व्यक्तीशी जोडून ठेवते. त्यामुळे फक्त त्याला क्षमा करा.
एक शायर म्हणतो
चमन में इख्तिलात-ए-रंगोबू से बात बनती है,
हम ही हम हैं तो क्या हम हैं
तुम ही तुम हो तो क्या तुम हो…!
मित्रांनो जीवन खूप सुंदर आहे.फक्त त्याला सकारात्मक दृष्टीने बघायला शिका.इतिहासातून चांगले ते घ्या,वाईट सोडून द्या. हे असं होत, आणि ते असं म्हणण्याने काही फरक पडत नाही. या जगात कित्येकदा इतिहास बदलविण्याचा,त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न झालाय.पण सत्य उमलत्या फुलासारखे असते.त्याला उमलण्यापासून आणि जगाला सुंगंध देण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. एकदा एक व्यक्ती जगाच्या इतिहासाचा अभ्यास करायचे ठरवतो.त्यानुसार जगातील सर्वच देशातील इतिहासाची पुस्तक मागवीत अभ्यास सुरु करतो.वर्ष दोन वर्ष अभ्यास करण्यात जातात. एकेदिवशी दुपारी अभ्यास करीत असतांना अचानक त्याला खिडकीतून मोठा गोंधळ सुरु असल्याचा गोंगाट ऐकू येतो. खाली उतरून गर्दीच्या दिशेने पळत जात तो घटनास्थळी पोहचतो. तिथं पोहचल्या नंतर तो लोकांना विचारतो काय झालं? काही जण सांगतात,अपघात झालाय. गर्दीतून थोडं पुढे सरकल्यानंतर आणखी दुसऱ्या लोकांना विचारतो काय झालाय? त्यावर ते सांगतात,मोटारसायकलवाल्याचा गोळी मारून कुणीतरी खून केलाय,गर्दीतून थोडं पुढे सरकत आणखी पुढे जात अपघातस्थळावर पोहोचतो.त्याठिकाणी दोन जण खाली पडलेले असतात.तिथे उभे असलेल्या पोलिसांना विचारतो. त्यावर पोलीस सांगतात… काही नाही हो…दोघं जण दारू पिऊन मारामारी करीत होते.चांगला बदडला मूर्खाना म्हणून ओरडत होते दोघे. फालतू गोष्टीमध्ये वेळ वाया गेला म्हणून तो व्यक्ती पुन्हा अभ्यास करायला आपल्या खोलीकडे भराभरा वळतो. परंतु त्याच्या डोक्यात अचानक विचार येतो,की पाच मिनिटांपूर्वी घडलेल्या गोष्टीची पाच लोकांनी मला वेगवेगळी कहाणी सांगितली,तर हजारो वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टीचीं विश्वासर्हता काय? कोणी आणि कसा हा इतिहास लिहून ठेवला असेल. घरी आल्या बरोबर तो सर्व इतिहासाची पुस्तक जाळून टाकतो.मित्रांनो खरा इतिहास वाचायचा नव्हे तर आत्मसात करण्याची गरज आहे. इतिहासातील चुका दुरुस्त करणारा व्यक्तीच इतिहास घडवत असतो.म्हणूनच बुद्ध,महावीर,कबीर,फुले,शाहू महाराज आणि बाबासाहेब ही मंडळी युगपुरुष ठरतात. आपल्या मान्यतेनुसार इतिहास खरा किंवा खोटा ठरत नाही. मानवी जीवनाला भूतकाळ नव्हे तर वर्तमानकाळ सुखी ठेवत असतो.ज्या काळात आपण एकत्र आहोत.तोच काळ खरा आणि गोड आहे.
आपल्या देशाची लोकशाही जगातील कोणत्याही देशातील घटनेपेक्षा प्रगल्भ आहे. आपल्या लोकशाहीत सर्वाना सामावून घेत सन्मान देण्याची क्षमता आहे. रत्यावर उतरून संसदीय मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांनाच हक्क आहे. परंतु असहिष्णुतेबाबत कोणताही राग असेल तर तो शांततेच्या मार्गाने व्यक्त करा. गौतम बुद्धांच्या नावाने आपला देश जगात ओळखला जातो. जगाला आपण शांती आणि अहिंसेचा संदेश दिला आहे,हे विसरून कसे चालेल. भोवताल नक्कीच अस्वस्थ करणारा आहे. पण विवेक ढासळू देऊ नका, संयम सोडू नका.कारण इतिहास सांगतो बाबासाहेबांना अस्पृश्यतेची वागणूक देणारे आज काळाच्या ओघात भूतकाळाच्या गटारीत लोळताय. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड भिरकावणारे मुर्खांचा नव्हे तर बुद्ध आणि महावीरांचा अहिंसेचा मार्ग जगाला मार्गदर्शक ठरतोय.
Very very….Nice..Sir vijayji
khup chan sirji