मित्रांनो,आज पर्यंत मी लिहिलेल्या सर्वात कठीण विषयांपैकी असणार्या एका विषयावर आज लिहित आहे, पण रक्ताने माखलेल्या कागदावरील शाईने हे लिहावे लागेल असे कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.जगात आतापर्यंत झालेल्या अतिरिकी हल्ल्यापैकी संपूर्ण मानव जातीला मानवी जन्माची लाज वाटावी अश्या हल्ल्यापैकीच कालचा पॅरीसमध्ये झालेला हल्ला होता. माझ्यासाठी पुन्हा एकदा हल्ल्यासाठी सांगण्यात आलेले कारण प्रचंड क्लेषदायक असे होते. लहानपणापासून माझे बहुतांश मित्र हे मुस्लीमधर्मीय आहेत.त्यामुळे नकळत कधी इस्लाम धर्माच्या प्रेमात पडलो हे मलाच कळले नाही. इस्लाममधील अनेक गोष्टी ज्या माझ्यासाठी त्यावेळी नवीन होत्या त्याबद्दलची उत्सुकता आजहि माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे. इस्लाम धर्मातील कुठल्याही नवीन विषयावर चर्चा समोर आली तर, संबधित विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेतल्या वाचून मला चैन पडत नाही. त्यामुळेच की काय मी आणि इस्लाम एकमेकाच्या खूप जवळ असल्याचे मला नेहमी जाणवते. सलीम पटेल, रियाजोद्दीन शेख, अहमद पठाण, असिफ कादरी, वाजीद शेख, परवेज शेख असे माझे असंख्य मुस्लीम मित्र आहेत. त्यातील सर्वच माझ्या भावासारखी. अफरोज खान नामक व्यक्तीकडे तर मी कित्येक वर्ष फोटोग्राफी आणि व्हिडीओ शुटींग शिकण्याठी होतो.अनेक यात्रा,उरूस आजहि मी यातील अनेक मित्रांसोबत जातो,ते कधी मंदिरात यायला नाही म्हणत नाही आणि मी देखील मशीद मध्ये जाण्यास मागे पुढे पाहत नाही. परंतु यापैकी एकालाही इस्लामच्या नावाखाली कट्टरतावाद जोपासताना मी पहिले नाही.
फ्रान्स मधील घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. प्रेषित मोहंमद पैगंबरांचे कार्टून काढले म्हणून, ते हत्याकांड केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. खर तर माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो यांना खरच इस्लाम कळला का? मला क्षणात आतून उत्तर मिळते नाही ! कारण खरा मुसलमान कोणत्याही परीस्थित असे घृणास्पद कृत्य करणार नाही. जो कठीण मधल्या कठीण परीस्थित आपल्या इमान (धर्माने आखून दिलेल्या तत्वावर) कायम राहतो त्याचाच अर्थ खरा ‘मुसलमान’ असा होतो. त्यामुळे रागातून,द्वेषातून निष्पाप लोकांना मारून हत्याकांड करणारे कधीच सच्चे मुसलमान राहू शकत नाही.इस्लाम तर प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा धर्म आहे. त्याच्या नावाखाली चालवलेला दहशदवाद कदापि आणि कोणत्याही स्थितीत समर्थनीय नाही. खर्या अर्थाने सांगायचे झालेच तर इस्लामला अशा विकृतांनीच बदनाम केले आहे. खरा मुसलमान हा अल्लाहला समर्प्रित आणि शांती,प्रेमाच्या मार्गाने आपले जीवन मोहमद पैगंबर यांनी आखून दिलेल्या धर्माच्या चौकटीत जगणारा असतो. इस्लाममध्ये चांगल्या उद्देशाने देण्यात आलेल्या मुभांचा अशा विकृतांनी गैरफायदा तर घेतलाच परंतु जगाच्या नजरेत इस्लामला बदनामही केले. उदाहरण द्यावयचे झाले तर चार विवाहांची मुभा ही स्त्री जातीच्या कल्याणासाठी तिचे जीवन फुलवण्यासाठी देण्यात आली आहे. परंतु काही विकृत इस्लाममध्ये अशी सुट असल्याचे सांगून लग्न करतात आणि इस्लाममधील अपेक्षित उद्देशावर ते यानिमित्ताने घाव घालतात. अरे इस्लाममध्ये तर गैर स्त्रीला पाहून तुमच्या मनात पाप आले तरी गुन्हा असल्याचे सांगतो.
इस्लामनुसार या जगात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती अल्लाहचा बंदा असल्याचे सांगतो, मग कुणी कसा काफिर असेल? इस्लामला बदनाम करणारे लोग, इस्लामवर आरोप करणारे, इस्लाममध्ये राहून जो इस्लामला नाही मानत त्यांना काफ़िर म्हटले जाते परंतु याचा अर्थ काही जण सर्वाना वापरून गैर-इस्लामिक लोकांसाठी वापरतात,परंतु माझ्यामते इस्लाममध्ये राहून त्याच्या मुळ तत्वांच्या विरोधात जीवनशैली जगणारा देखील काफिरच आहे. मग इस्लाममध्ये सांगितल्यानुसार कोणता आज दहशदवादी निष्पाप, वृद्ध, बालके, महिला यांच्या सोबत रियायात (सवलत/सूट ) करत त्यांची हत्या टाळतो. कुणी नाही मग ते कसे सच्चे मुसलमान असतील. उठसुट जिहाद -जिहादच्या नावाने बोंबा मारायच्या आणि दहशदवादी कृत्य करायचे अरे जिहादचा खरा अर्थ काळाला असता तर तुम्ही जगभरात असे हत्याकांड घडविले असते का ? इस्लाम धर्म शांततेचा पुरस्कर्ता असल्यामुळे, शस्त्राने आक्रमक युद्धाचे तो कधीच आवाहन करीत नाही,मग बॉंब हल्ले, गोळ्या घालून लहान मुलांना ठार मारणे हा कुठला जिहाद आहे रे? अरे इस्लामला बदनाम करणार्यांनो खरे काफिर तुम्हीच आहात.तुम्हाला तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. जिहाद हे प्रत्येक मुसलमानाचे धार्मिक कर्तव्य आहे. अरबी भाषेनुसार जिहादचा अर्थ सेवा आणि संघर्ष असा आहे. माझ्या मते सत्कार्याला पाठिंबा आणि दुष्कृत्यांना विरोध, अंधश्रद्धा आणि शत्रूंशी लढाईला खर्या अर्थाने ‘जिहाद’ म्हणतात.
घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूं कर लें
किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए।
निदा फाजली यांचे असेच काही शेर इस्लामच्या नावावर स्वतःला धार्मिक गुरु म्हणवून घेणार्यांना चांगलीच चपराक देतात. एक शायर तर त्याहूनही पुढे जात म्हणतो की,
काबा अगरचे टूटा तो क्या जाए गम है शेख
कुछ कस्रे दिल नहीं कि बनाया न जाएगा।
म्हणजे काबा तुटले तर पुन्हा बनू शकते परंतु माणसाचे मन तुटले तर काही केल्याने जुडत नाही.एवढ्या पाकसाफ मनाने एक सच्चा मुसलमानच खुदा (परमेश्वरा )बद्दल लिहू शकतो. परंतु इस्लामिक कट्टरतावादाच्या नावाखाली दहशदवाद्यांना हे देखील इस्लामचा अपमान वाटेल. माझ्या मते हे शायर लोक काही चुकीचे नाही लिहीत.
उठ-उठ के मस्जिदों से नमाजी चले गए
दहशतगरों के हाथ में इस्लाम रह गया ।
निदा फाजली साहेबांच्या या मताशी पूर्णपणे सहमत आहे. खरा इस्लाम हा सत्य, शांतता, नैतिकता आणि प्रेमाचा संदेश देणारा आहे. मात्र दहशतवाद्यांनी याच्या नेमक्या उलट अर्थ घेतलाय. अर्थात खरा इस्लाम माझ्या मित्रांप्रमाणे तुमच्या-आमच्या भोवती असणार्यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवास येतो. खोटा इस्लाम मात्र दहशतवाद्यांच्या हातात पडून ते नरसंहार करत आपल्याच धर्माला बदनाम करत सुटलेत हे कोण नाकारणार?