आपल्या क्रौर्यामुळे अवघ्या जगाला धडकी भरवणारी ‘इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया ऍन्ड इराक’ अर्थात ‘इसीस’चा जळगाव जिल्ह्यात शिरकाव झाल्याचे धक्कादायक वृत्त असून स्थानिक पोलीस व विविध गुप्तचर यंत्रणा इसीसचा प्रभाव वाढवू पाहणार्या संबंधित संशयीतांवर करडी नजर ठेवून आहेत.
एकेकाळी ‘सिमी’चे हेडक्वार्टर म्हणून जळगाव जिल्हा संपूर्ण देशात बदनाम झाला होता. सिमीच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांमध्ये अनेक तरूण अडकले होते. तेव्हापासून जळगाव जिल्हा हा सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने संवेदनशील असाच आहे. यातच शहरासह जिल्ह्यातील काही तरूण इसीसच्या प्रभावाखाली आणले जात आहे. स्थानिक पोलीसांना आणि गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार काही जण जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसांपूर्वी दाखल झाले आहेत. जिल्ह्याबाहेरील एका सेवानिवृत्त पोलीस अधिकार्याच्या जुन्या खबर्याने जळगाव जिल्ह्यात इसीससाठी काम करणार्या काही लोकांची नावे दिली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास आलेली ही मंडळी तरूणांना धर्माच्या नावावर भडकवीत इसीसकडे आकर्षीत करून त्यांची भरती इसीसमध्ये करण्याचे काम करण्यासाठी आली असल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस व विविध गुप्तचर यंत्रणा या लोकांवर लक्ष ठेवून असून त्यांच्या बारीकसारीक हालचाली टिपत आहेत. विशेष म्हणजे इसीससाठी काही तरूण भरती झाल्यास त्यांना विदेशात प्रशिक्षणासाठी पाठविण्याची तयारी देखील ते ठेवून आहेत. शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील ते संशयीत लोक कार्यरत असल्याचे कळते. जळगावात दाखल झालेल्या त्या लोकांची विविध यंत्रणा आपापल्या स्तरावर विविध प्रकारे चौकशी करीत आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात असून यंत्रणा पूर्णपणे चौकस आहे. ‘इसीस’च्या प्रभावाखाली असणार्या काही विद्यार्थ्यांची धुळे येथे नुकतेच दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कसून चौकशी केली होती. या पार्श्वभुमिवर आता जळगावातही ‘इसीस’चा झालेला शिरकाव हा धोक्याची नवीन घंटा मानली जात आहे. या वृत्ताला सुत्रांनी दुजोरा दिला असला तरी अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही.
जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये साधारण पाच जण इसीसमध्ये भरतीचे काम करण्यासाठी आले आहे. तरूणांना इसीसकडे आकर्षीत करणारे ते पाचही जण मुळ जळगाव जिल्ह्यातील आहे की बाहेरचे? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु या पाचही जणांची चौकशी स्थानिक तसेच उच्च स्तरावरून सुरू आहे. मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
सिमीचे जाळे उध्वस्त झाल्यानंतर इसीसचे भूत जळगावच्या मानगुटीवर येवून बसले आहे. सिमीवर प्रतिबंध लादले गेल्यानंतर अनेक जण वेगवेगळ्या संघटनांशी जुळले आहेत. पाकिस्तानमधील काही धार्मिक संघटनांमध्ये काही जण कार्यरत आहेत. या संघटना पाकीस्तानी असल्या तरी त्यांना अद्याप भारतात प्रतिबंध नसल्यामुळे संशयीतांवर फक्त नजर ठेवली जात आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक व्हॉटस्ऍप ग्रुप संशयास्पद आहेत. त्यांच्यावर व्हायरल होणारा मजकूर हा संवेदनशील स्वरूपाचा व तरूणांची माथी भडकविणारा असा आहे. जिल्ह्यातील काही जण इसीसच्या समर्थनार्थ तरूणांजवळ बोलत आहे. अशा लोकांवर देखील लक्ष ठेवले जात आहे. तूर्त त्यांच्याकडून कुठलीही मोठी गतिविधी न झाल्यामुळे यंत्रणा सावध भूमिका ठेवून आहे.
काय आहे इसीस ?
‘इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक ऍन्ड सीरिया’ (आयएसआयएस) ही एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे. या संघटनेला ‘आयसीस’ अथवा ‘इसीस’ या नावाने संबोधले जाते. इस्लाम धर्मातील सुन्नी पंथाच्या वहाबी/सलाफी विचारांच्या कट्टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघटना प्रामुख्याने पश्चिम आशियातील इराक व सीरिया ह्या देशांमध्ये कार्यरत आहे.
आजच्या घडीला इराक व सीरिया देशांतील मोठ्या भूभागावर आयसिसचे नियंत्रण आहे. इसीसची स्थापना २००४ साली झाली व तिने अल कायदामध्ये प्रवेश केला. २०१४ साली आयसिस अल कायदामधून वेगळी झाली व अबू बक्र अल-बगदादी ह्या आयसिसच्या म्होरक्याने इस्लामिक खिलाफतीची घोषणा केली व स्वत:ला खलिफा जाहीर केले. २०१४ साली आयसिसने इराकच्या वायव्य भागातील मोठा भूभाग काबीज केला व मोसुल हे इराकमधील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर ताब्यात घेतले.
इसिस हा एक अत्यंत हिंसक गट असून सुन्नी वगळता इतर मुस्लिम पंथांच्या तसेच परधर्मीय लोकांचे शिरकाण, महिलांचे शोषण, अपहरण, बलात्कार, इत्यादी अनेक गुन्हे आयसिसद्वारे करण्यात येत आहेत. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून भारत, अमेरिका, रशिया, युरोपियन संघ इत्यादी प्रमुख देशांनी आयसिसला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. इसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून त्यांच्याद्वारे करण्यात येत असणारे हल्ले हा जगातील देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मध्य पूर्वेसोबतच युरोप व उत्तर आफ्रिकेमध्ये देखील आयसिसचे अतिरेकी कार्यरत आहेत. बोको हराम, तालिबान इत्यादी इतर मुस्लिम अतिरेकी संघटनांनी आयसिसला पाठिंबा दर्शवला आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये आयसिसने पॅरिस महानगरामध्ये घडवून आणलेल्या हल्ल्यांमध्ये १२९ लोक मृत्यूमुखी पडले. दरम्यान, एमआयएमचे पक्षप्रमुख असददुद्दीन आवेसी यांना देखील नुकतीच सोशल मिडियाच्या माध्यमातून इसीसने धमकी दिली आहे.
या सर्व प्कारास पोलिस अधिकारी जबाबदार आहेत कारण विद्यापिठातील प्रकरण वारंमवार सांगुन चौकशी करत नव्हते तसेच असाच प्रकार पाँलिटेक्निकला पण घडला होता पण तक्रारदारासच पोलिसांनि धमकावले होते काही धर्मांध तरुणांनकडे दहा पंधरा मोबाईल महागड्या कशा येतात याची माहिती काही पोलिस अधिकार्यांना दिली तरत्यांनि अधिकाराचा दुरुउपयोग करीत त्यांनाच दोषी ठरवले ह्यासाठी भ्रष्ट्र पोलिसांनवर व कामचुकार अधिकार्यानवर कारवाई करणे गरजेचे आहे
Very gOod information provide be careful