अवघ्या जगाला आपल्या दहशतवादी कौर्याने धडकी भरवणार्या इसिस या आतंकवादी संघटनेच्या नावाने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जळगाव जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण ठिकाण बॉम्बस्फोटाने उडवून देण्यासंदर्भातले पत्र नुकतेच जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना प्राप्त झाल्यामुळे राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.याचवर्षी जानेवारी महिन्यातदेखील जळगावात इसिसचे आतंकवादी शिरल्याचे पत्र पोलिस प्रशासनाला प्राप्त झाले होते.चौकशीनंतर मात्र हा खोडसाळपणा असल्याचे उघड झाले होते.यावेळीदेखील इसिसच्या नावावर प्रशासनाला वेठीस धरण्याचा हा खोडसाळपणा असल्याची दाट शक्यता आहे.यास अधिकृत सूत्रांनीही दुजोरा दिला आहे.
जानेवारीतही इसिसचे
अतिरेकी जिल्ह्यात शिरल्याचे पत्र
इसिस आतंकवादी संघटनेच्या नावाचा उपयोग करून जळगाव जिल्ह्यात इसिसचे आतंकवादी शिरल्याबाबतचे पत्र जिल्हापेठ पोलिस स्थानकास व पोलिस अधिक्षक कार्यालयास जानेवारी महिन्यात प्राप्त झाले होते. त्यात बाहेर जिल्ह्यातून आलेले पाच जण इसिसमध्ये जळगाव जिल्ह्यातून भरतीचे काम करीत असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे जळगाव शहरातील व जामनेर येथील काही तरुणांची नावेदेखील देण्यात आली होती. विशेष म्हणजे भरती झालेल्या तरुणांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठविण्याच्या तयारीत असल्याचे देखील सांगण्यात आले होते. परंतु चौकशीअंती कौटुंबिक संपत्तीच्या वादातून त्रास देण्याच्या उद्देशाने हे पत्र पाठविण्यात आल्याचे समोर आले होते.त्यामुळे नुकत्याच आलेल्या पत्राबाबत देखील खोडसाळपणा असल्याची दाट शक्यता यंत्रणांना आहे.परंतु राष्ट्रीय सुरक्षतेचा मुद्दा असल्यामुळे सर्व स्तरावर चौकशी सुरु आहे.
पत्रात स्थानिक बोलीभाषा
इसिस ही आतंकवादी संघटना इस्लाम धर्मातील सुन्नी पंथातील वहाबी/सलाफी विचारांच्या कट्टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघटना आहे. पश्चिम आशियातील इराक व सीरिया ह्या देशांमध्ये ही संघटना कार्यरत आहे.भारतातदेखील या संघटनेने आपले अस्तित्व हळूहळू निर्माण करायला सुरूवात केली आहे. मुळात इसिस ही कट्टरवादी संघटना असल्यामुळे तिच्या नावावर स्थानिक बोली भाषेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवलेल्या पत्रावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. कट्टरवादी असलेली कुठलीही आतंकवादी संघटना स्थानिक भाषेत धमकीचे पत्र किंवा संदेश पाठवित नाही. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेले हे पत्र संपुर्ण मराठी भाषेत असून भाषा शैली स्थानिक पध्दतीप्रमाणे आहे. त्यामुळे हा खोडसाळपणा असल्याचा अंदाज विविध यंत्रणांनी लावला आहे.
हल्ला करण्यापूर्वी धमकी का?
जगातील कुठलीही आतंकवादी संघटना कधी? कुठे? आणि कशा पध्दतीने? हल्ला करणार आहे याचे वर्णन करत नाही.फार लांब तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा पध्दतीचा साधा संदेश संदेश ते देत असतात.परंतु या पत्रात औरंगाबाद, परभणी, अकोला, खामगाव येथे इसिसचे कार्यकर्ते तयार असून त्यांच्याजवळ विविध हत्यार, बॉम्ब बनविण्याचे साहित्य असल्याचे म्हटले आहे. त्याप्रकारे भुसावळ, जळगाव, मलकापूर, अमरावती या रेल्वेस्थानकासह काही धार्मिक स्थळे उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. वास्तविक बघता हल्ल्यांचे ठिकाण आणि हल्ल्याची पध्दत सांगून सुरक्षा यंत्रणा व प्रशासनाला सावध करून स्वत:चे ऑपरेशन कुठलीही आतंकवादी संघटना धोक्यात घालणे शक्य नाही.त्यामुळे हा संपुर्ण प्रकार खोडसाळ वृत्तीतून झाला आहे.परंतु यंत्रणांनी वारंवार होणारा हा खोडसाळपणा करणाऱ्याचा शोध घेतला पाहिजे अन्यथा भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.
खबरदारी हीच आपली सुरश्राा ….