जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार महायुतीचे असले तरी शहरी आणि ग्रामीण भागातील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास भाजपच प्रथम क्रमांकावर आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुती न झाल्यास भाजपसमोर राष्ट्रवादी बरोबर शिवसेना देखील कडवे आव्हान उभे करू शकते. एकंदरीत यामुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये मोठी फुट निर्माण होत,त्याचा फटका विद्यमान खासदार ए.टी.नाना पाटील यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१४ मध्ये या मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नव्हता. मात्र, २०१९ मध्ये जळगाव,चाळीसगाव या दोन ठिकाणी भाजपने मुसंडी मारली आहे. तर जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिकेत देखील प्राबल्य वाढवले आहे. एकंदरीत २०२० लोकसभा निवडणुकीत मते खेचण्यासाठी सर्वच पक्षाकडून व्यूहरचना रचण्यास आतापासूनच सुरूवात झाली आहे.
जळगाव लोकसभा आधी एरंडोल लोकसभेच्या नावाने होता. भाजपचे एम. के. पाटील तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. मागील विधानसभेला भाजपचे या मतदारसंघात चाळीसगाव आणि अमळनेर या दोन ठिकाणी आमदार होते. खासदार लाच प्रकरणानंतर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत पोटनिवडणूक लागली होती. त्या वेळी अल्पावधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. वसंतराव मोरे लाखाच्या मताधिक्क्याने निवडून आले; परंतु त्यानंतर गतसार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा भाजपचेच उमेदवार ए. टी. पाटील लाखांच्याच मताधिक्याने निवडून आले. या मतदारसंघात ग्रामीण व शहर भागात भाजप व शिवसेनेचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे, तर राष्ट्रवादी देखील अस्तित्व राखून आहे. कॉंग्रेस मात्र,फक्त नावालाच टिकून आहे. २०१४ मध्ये तब्बल १५ वर्षांनंतर राष्ट्रवादीने आपला उमेदवार बदलवीत डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी दिली.मात्र,त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही.दरम्यान,यंदा भाजपा उमेदवार बदलविणार असल्याची चर्चा आहे. परंतु देशात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या पहिल्या दहा खासदारांमध्ये विद्यमान खासदार ए.टी.नाना पाटील यांचा समावेश आह. त्यामुळे त्यांची तिकीट कापणे वाटते तेवढे सोपे नाही.
महापालिका व नगरपालिकांमध्ये भाजपची पकड मजबूत
जळगाव लोकसभा मतदारसंघात सात नगरपालिका, तर एक महापालिका मिळून एकूण २५१ नगरसेवक आहेत. २०१४ च्या तुलनेत या मतदारसंघात भाजपने आपली मजबूत पकड बनविली आहे. जळगाव महापलिकेत महापौर,उपमहापौरसह चाळीसगाव,एरंडोल,पारोळा याठिकाणी भाजपचे लोकनियुक्त नगरसेवक आहेत. तर अमळनेर येथील अपक्ष नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील यांनी देखील काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या ताब्यात भडगाव,धरणगाव,पाचोरा या तीन नगरपालिका आहेत. तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या ताब्यात एकही पालिका नाही. उपनगराध्यक्षपदी भाजपचे ४, शिवसेनेचे ३ उमेदवार आहेत. २०१४ मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ६८ नगसेवक हे राष्ट्रवादीचे होते. परंतु २०१८-१९ मध्ये परिस्थिती बदलली असून आता सर्वाधिक ९१ नगरसेवक हे भाजपचे आहेत . तर त्या खालोखाल शिवसेनेचे ६३ तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर अवघे २६ नगरसेवक निवडून आले आहेत. या लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचा अवघा १ नगरसेवक आहे. चाळीसगाव येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्या नेतृत्वातील आघाडीकडे १३ नगरसेवक आहेत. याठिकाणी बहुमताचा आकडा १८ आहे. भाजपच्या १३ जागा असून शिवसेना व अपक्षांच्या मदतीने त्यांचा कारभार चालू आहे. भविष्यात अपक्ष किंवा शिवसेनेने पाठींबा काढल्यास या ठिकाणी भाजपला कारभार करणे अवघड होऊ शकते. तर दुसरीकडे भाजपच्या एक महिला पंचायत समिती सदस्य मयत झाल्यामुळे भाजप पंचायत समितीत देखील अल्पमतात आहे. पोट निवडणुकीत भाजपने हि जागा गमावल्यास या ठिकाणी राष्ट्रवादीचा सभापती विराजमान होऊ आहे.
विधानसभेतील स्थिती
या मतदार संघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात.त्यातील भाजपकडे दोन तसेच सहयोगी सदस्य असेलेला एक अपक्ष आमदार आहे. शिवसेनेकडे दोन आमदार आहेत. तर राष्ट्रवादीकडे एक आमदार आहे. भाजपचे राजूमामा भोळे (जळगाव शहर), उन्मेषदादा पाटील (चाळीसगाव), तर सहयोगी सदस्य शिरीषदादा चौधरी (अमळनेर) तर शिवसेनेचे आ. गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) किशोरअप्पा वाघ (पाचोरा-भडगाव) या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीकडे डॉ.सतीश पाटील (एरंडोल-पारोळा) हे एकमेव आमदार आहेत.
जिल्हा परिषदेतील स्थिती
जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण ३४ जि.प गट असून त्यात सर्वाधिक १२ सदस्य शिवसेनेकडे आहेत. भाजपाकडे ११ तर राष्ट्रवादीकडे देखील ११ सदस्य आहेत. विशेष म्हणजे या मतदार संघातील भाजपच्या सदस्याकडे जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद देखील आहे.
पंचायत समितीतील स्थिती
मतदारसंघात आठ पंचायत समित्या आहेत. यात भाजपचे चार, शिवसेनेचे तीन तर राष्ट्रवादीचा एक सभापती आहे. सर्वाधिक तीन उपसभापती शिवसेनेचे असून भाजप व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन,तर कॉंग्रेसकडे एक उपसभापतीपद आहे. एकूण ६८ पंचायत समिती गणांमध्ये सर्वाधिक २५ सदस्य भाजपचे आहेत.राष्ट्रवादीचे १७, शिवसेनेचे २१, काँग्रेसकडे १ तर ३ जागा अपक्षांकडे आहेत. यामुळे जिल्हापरिषद प्रमाणे पंचायत समितीतही भारतीय जनता पक्षानेच आघाडी घेतल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १३४ गणापैकी तब्बल ६५ उमेदवार भाजपचे निवडून आले आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 32 शिवसेनेचे 26 तर कॉंग्रेसचे 6 आणि अपक्ष 4 निवडून आलेत आहेत.
२००९ व २०१४ मधील स्थिती
२००९मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे ए.टी.पाटील यांना ३ लाख ४३ हजार ५४२ मते मिळवित विजय संपादन केला होता. तर राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड.वसंतराव मोरे यांना २ लाख ४७ हजार ५०५ मते मिळाली होती. याचाच अर्थ ए.टी.नाना यांनी मोरे काकांचा तब्बल ९६ हजार ३७ मतांनी पराभव केला होता. परंतु त्यावेळी समविचारी पक्षांच्या उमेदवारांनी मिळवलेली मते राष्ट्रवादीचे नुकसान करून गेली तर भाजपचा फायदा. २००९ मध्ये बसपाचे अॅड.मतीन अहमद यांना १२ हजार ९७६ मते तर अपक्ष उमेदवार सुधाकर वाघ यांना १९ हजार २०६, सामिमोद्दिन मिस्तरी यांनी १० हजार ७९६ मते मिळविली होती. भारिपचे नथ्हू जाधव १ हजार ९३ तर प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे १ हजार ४८९ मते मिळविली होती. त्यानंतर २०१४ मध्ये मोदी लाटेत भाजपचे ए.टी.पाटील यांनी ६ लाख ४७ हजार ७७३ मते मिळवीत भारतातील सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या पहिल्या दहा खासदारांमध्ये स्थान मिळविले होते. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.सतीश पाटील यांचा तब्बल ३ लाख ८३ हजार ५२५ मतांनी पराभव केला होता. डॉ.पाटील यांना २ लाख ६४ हजार २४८ मते मिळाली होती. २०१४ मध्ये बसपाचे वेडू बागुल यांनी १० हजार ८३८ मते मिळवली होती. आप पक्षाचे डॉ.संग्राम पाटील यांन ७ हजार ३९० तर अपक्ष उमेदवार ललित शर्मा यांना ८ हजार १४० मते मिळाली होती.तर दुसरे अपक्ष उमेदवार विजय निकम यांनी ९ हजार ६१४, बहादूर रागीब २ हजार ६७५, अशोक पाटील ५ हजार ८०१ मते मिळाली होती. रिपाईचे अशरार बेग यांनी ३ हजार २१२ मते मिळाली होती. २००९ आणि २०१४ मधील निवडणूक लक्षात घेता जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची हक्काची मते विभागली गेल्याचे स्पष्ट लक्षात येते. खास करून बहुजन समाज पार्टी (बसपा)चा एक फिक्स् वोट बँक असल्याचे समोर आले आहे.साधारण दहा ते बारा हजारच्या दरम्यान हा पक्ष प्रत्येक निवडणुकीत मते मिळवितच असतो. एवढेच नव्हे तर, दलित आणि मुस्लीम समाजातील अपक्ष किंवा छोट्या मोठ्या पक्षाच्या उमेदवारांनी देखील दहा ते वीस हजारच्या दरम्यान मते मिळविली आहेत.
कोणत्या मतदार संघात कोणाला किती मतदान
मोदी लाटमुळे २०१४ मध्ये जळगाव लोकसभा मतदार संघातील जवळपास सर्वच मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. त्यानुसार खासदार ए.टी.पाटील व डॉ.सतीश पाटील यांना अनुक्रमे जळगाव शहर (भाजप : १२२१७७)/(राष्ट्रवादी : १२२१७७), जळगाव ग्रामीण (भाजप :१२२७५२) / (राष्ट्रवादी :३७७०६), अमळनेर (भाजप :९४६००) / (राष्ट्रवादी :४३०५६), एरंडोल-पारोळा (भाजप:८५६९२) / (राष्ट्रवादी :५३२४६), चाळीसगाव (भाजप :११५३३५) / (राष्ट्रवादी : ४५२३८), पाचोरा-भडगाव (भाजप:१०५८८१)/ (राष्ट्रावादी:४६१६७) मते मिळाली होती. परंतु यंदा भाजपला हि निवडणूक पाहिजे तेवढी सोपी राहिली नाहीय. कारण यावेळी शिवसेना विरोधात लढल्यास पाचोरा-भडगाव,जळगाव ग्रामीण या विधानसाभ मतदार संघात शिवसेनचे आमदार आहेत. तर एरंडोल-पारोळामध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. एकंदरीत या निवडणुकीत शिवसेनेमुळे हिंदुत्ववादी मते फुटण्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.
भाजपचे बलस्थान आणि कमकूवत बाजू
भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार ए.टी.नाना पाटील यांनी सर्वसाधारण कुटुंबातून प्रगती केली आहे. आजच्या घडीला हे आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार मानले जातात. तसेच या मतदारसंघात भाजप व संघ परिवाराचे मजबूत जाळे असून मतदारसंघातील जळगाव, धरणगाव रेल्वेस्थानकावर विविध रेल्वेंना विशेष प्रयत्नातून थांबा मिळवून दिल्यामुळे प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहेत. मतदारसंघातील अनेक तालुक्यांत खासदार निधीतून सभामंडप, कब्रस्तान, मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात दिलेल्या रुग्णवाहिका, जिल्ह्यात सैन्यभरतीसाठी विशेष पाठपुरावा करीत जिल्ह्यात सैन्यभरती झाल्यामुळे तरुणांमध्ये देखील लोकप्रिय झाले आहेत. त्याचप्रकारे शेतीला रस्त्याने जोडण्यासाठी लोकसभेत आग्रही भूमिका, पक्षीय स्तरावर संघटन देखील मजबूत आहे.
जिल्हा भाजपात सध्या मोठे मतभेद निर्माण झाले आहेत. खडसे-महाजन यांच्या गटबाजीचा खा.पाटील यांना मोठा फटका बसू शकतो. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे तिकीट कुणाला मिळते यावर देखील अनेक गणितं अवलंबून असतील. भाजप या मतदार संघात उमेदवार बदलाविणार असल्याची आवई देखील पक्षांतर्गत स्पर्धकांनी पद्धतशीरपणे उठवली आहे. भाजपचे जाळे मतदार संघात मजबूत असले तरी खा.पाटील यांचा व्ययक्तिक जनसंपर्क पाहिजे तेवढा नाहीय. सत्तेत असल्यानंतरही मतदार संघात पाहिजे तेवढी विकास कामे झालेली नाहीत. तसेच नोटबंदी,जीएसटी,शेतकरी कर्जमाफी,मराठा,धनगर आरक्षण आदी गोष्टींमुळे मोदी सरकार बद्दल असलेल्या नाराजीचा देखील फटका बसू शकतो.
राष्ट्रवादीचे बलस्थान आणि कमकूवत बाजू
जळगाव लोकसभा मतदार संघात आजच्या घडीला राष्ट्रवादी काही बलस्थान आहेत. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ.सतीश पाटील हे गतवेळेचे लोकसभेचे उमेदवार होते,ही जमेची बाजू आहे. डॉ.पाटील हे माजी पालकमंत्री असल्यामुळे मतदारसंघाची चांगली माहिती, मराठा नेतृत्व म्हणून मान्यता, वडील माजी आमदार भास्कर पाटील यांचा राजकीय वारसा, डॉक्टर असल्यामुळे समाजात स्वच्छ प्रतिमा, कणखर वक्तृत्व व नेतृत्व, आर्थिकदृष्ट्या सक्षम, कार्यकर्त्यांची मोठी फळी, दांडगा जनसंपर्क, मतदारसंघात मोठे नातेगोते, तसेच पक्षीय बलाबलदेखील डॉ. पाटील यांचे मजबूत आहे.परंतु ते यावेळी उमेदवारी करतील किंवा नाही याबद्दल शंका आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी लोकसभा लढावी असा आग्रह पक्षातून होता.परंतु गतवेळेप्रमाणे यावेळी देखील नम्र नकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी ऐनवेळी आर्थिक आणि जातीय समीकरण मजबूत असलेला उमेदवार देखील देऊ शकते.
राष्ट्रवादीचे कधी काळी जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार आमदार राष्ट्रवादीचे होते.परंतु यावेळी अवघा एक आमदार आहे. तसेच डॉ.सतीश पाटील हे देखील यावेळी निवडणूक लढण्यास फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे पाहिजे तसा तगडा उमेदवार नाहीय.एवढेच नव्हे तर, गटबाजीमुळे देखील राष्ट्रवादी कमकूवत झालीय. जिल्हा परिषद,नगरपालिका,पंचायत समितीत देखील राष्ट्रवादीला फटका बसल्यामुळे पक्षाचे संघटन कमजोर झाले आहे. अमळनेर येथील माजी आमदार साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यामुळे देखील पक्षाला धक्का बसला आहे.
शिवसेनेचे बलस्थान आणि कमकूवत बाजू
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची सर्वाधिक ताकद जळगाव लोकसभा मतदार संघात आहे. या ठिकाणी शिवसेनेचे २ आमदार आहेत. एवढेच नव्हे तर, शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची मजबूत पकड आहे. खास करून जळगाव ग्रामीण,जळगाव शहर आणि एरंडोल या ठिकाणी ना.पाटील मोठी खेळी करून शिवसेनेच्या उमेदवाराला लीड देऊ शकतात. दुसरीकडे माजी मंत्री सुरेशदादा जैन देखील महत्वपूर्ण भूमिका बजावतील. त्याचप्रकारे पाचोरा-भडगाव मतदार संघाचे शिवसेनचे संभाव्य उमेदवार आर.ओ.पाटील यांनी प्रतिनिधित्व केले असून विद्यमान आमदार किशोरअप्पा पाटील हे त्यांचे पुतणे आहेत. निर्मल सीड्सच्या माध्यमातून आर.ओ.पाटील यांच्याकडे हक्काचेएकगठ्ठा मोठे मतदान आहे. एरंडोल-पारोळा मतदार संघात माजी आमदार चिमणराव पाटील यांनी आपली पकड अद्याप देखील सैल होऊ दिलेली नाही.
या मतदार शिवसेना आणि भाजपचे आपसातील वैर सर्व श्रुत आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या संयुक्त मेळाव्यात शिवसेनेचे नेत्यांनी जाहीररित्या ए.टी.पाटील यांच्यावर टीका केली होती. तसेच ना.गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील वादाचे पडसात नेहमीच या मतदार संघात जाणवत असतात. अमळनेर तसेच चाळीसगाव या दोन मोठ्या आणि महत्वपूर्ण तालुक्यात शिवसेनेचे संघटन कमकूवत आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघात शिवसेनेला अधिकचे श्रम घ्यावे लागतील. तसेच जातीय समीकरणात देखील शिवसेनेच्या उमेदवाराला फटका बसू शकतो. शिवसेनेकडून अन्य नेते देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्यामुळे उमेदवारीवरून ऐनवेळी नाराजी पसरू शकते.
DEAR VIJUBHAU….EKDUM ABBHYASPURNA JALGAON CHI SAVISTAR PARSHVABHUMI MANDLI AAHE…AAPLE ABHINANDAN….EK VINANTEE KI…AGRAKRAMANE YACH VISHYAVR PRATTEK TALUKAVAR MALIKA LAVAVI….
सविस्तर परिस्थिती सांगितली…
यंदा ए.टी.पाटील यांच्यासाठी ही निवडणुक कठीण जाणार आहे.
व्वा . क्या बात है जबरदस्त लिखान व माहीती
एक एक बाजू निटनेटकी मांडली
अप्रतीम
छान माहिती…