कधी कधी वाटत आयुष्य जगायचंच राहून गेलय आणि कधी वाटत बसं, खूप झालं, आता नको हे ओझं. परंतु जीवन ओझं नाहीय. आयुष्याचा प्रत्येक क्षणात जिंदगी ठासून सामावलेली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या अस्तित्वाचे महत्व असते. या जगातील आपले प्रयोजन संपल्याशिवाय नियतीदेखील आपल्याला सामावून घेत नाही. तुमचे अंतकरण शुद्ध असल्यास टोकाचा अपमान,दुख: पचवून देखील तुम्ही संकटाना सामोरे जातात आणि इतरांना संकटातून वाचविण्याची ताकद ठेवतात. असचं काहीसा संदेश आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, या सिनेमातून मिळतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचे महत्व असते, हे पटवून देण्यात या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक पूर्णपणे यशस्वी झाला आहे.
आयुष्य खरंच खूप सुंदर आहे,हा सिनेमा तसा खान्देशातील कलाकृतीचा एक उत्तम नमुना म्हणावा लागेल. चित्रपट श्रुष्टीचे कोणतेही बॅकराऊंड नसतांना आणि पहिला चित्रपट असतानाही दिग्दर्शक डॉ.मुरलीधर भावसार हे बाजी मारतात. चित्रपटाचे कथानक एकदम दमदार आहे. हेच कथानक तुम्हाला चित्रपटाच्या अखेर पर्यंत खिळवून ठेवते.
एचआयव्ही पेशंट रमेश जगताप यांच्या अवतीभवती चित्रपटाचे कथानक फिरते. नकळत लागण झालेल्या या गंभीर आजारामुळे समाजात आणि घरात मिळणारी अपमानास्पद वागणूक, त्यातून येणारे नैराश्य. पोटाचा मुलगा व सुनेकडून काळीज चिरणारे टोमणे. जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीचा याच आजारामुळे झालेला मृत्यू. त्यामुळे कमालीचा खचलेला हा माणूस आत्महत्या करण्याच्या निर्णया पर्यंत पोहोचलेला असतो. दुसरीकडे गोविंद महाजन यांचे सुखी कुटुंबात सुरु असलेल्या छोट्या कुरबुरी आणि एकमेकात असलेले प्रेम आपल्याला प्रभावित करते.
एकीकडे जगताप यांना पोटाचा मुलगा घराबाहेर काढतो. तर दुसरीकडे गोविंद महाजन यांचे आपल्या अपंग वडिलांवर असलेले जीवापाड प्रेम, हे दोन्ही विरोधाभास पाहतांना आपण हे पात्र आपल्या अवतीभवती दररोज बघतो,असाच भास होतो. एकंदरीत कौटुंबातील संवेदनशील मुद्द्यांच्या अवतीभवती सिनेमाचा फर्स्ट हाफ फिरतो.
रमेश जगताप आता आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मनातील दुख:कुणाला तरी सांगू इच्छिताय. पण कुणाशी बोलणार? परिवारासह समाजाने त्यांना वाळीत टाकलेले आहे. विष प्यायच्याआधी जगताप एक अनओळखी नंबरवर फोन लावतात आणि आपले मन मोकळे करू पाहताय.परंतु तिकडून शरू नावाची गोंडस पोरगी मृत्युच्या दारात उभी आहे. फोनवर बोलण्यातून ती, तिचा जीव धोक्यात असल्याचा संदेश, रमेश जगताप यांना पद्धतशीर देते आणि चित्रपटाचा इंटरव्हल होतो आणि आपण सर्वजण एकदम चक्रावून जातो. अरे…पुढे काय?
पुढे रमेश जगताप विष पिल्यानंतर अखेरच्या घटका मोजत असतांना देखील कशा पद्धतीने शरूचे प्राण वाचवितात. शरुचे प्राण वाचविण्यासाठी जगताप कशी जीवाची पराकाष्ठा करतात. शरुला कोण मारणार असते. शरू आणि रमेश जगताप हे मृत्युच्या दारातून परत येतात का? या सर्वा प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी आपल्याला हा चित्रपट बघावाच लागेल.
या चित्रपटाचे बजेट अवघे १५ ते २० लाख असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या थोडा कमकुवत झाला आहे. लाईट इफेक्ट अधिक चांगले होऊ शकले असते. एडिटिंग देखील शार्प झाली नसल्याचे अनेक ठिकाणी जाणवते. काही सीन रिपीट झाल्यागत जाणवतात. चित्रपटाची गती सेकंड हाफमध्ये वाढेल असं आपल्याला वाटते. परंतु आहे, त्याच गतीत कथानक पुढे सरकत असते. अनेक सीन जरा जास्तीचे लांबले आहेत. ‘स्क्रीन प्ले’ अधिक मजबूत करता आला असता. सिनेमाटोग्राफी काही ठिकाणी प्रभावित करते तर काही ठिकाणी फारच कमकुवत जाणवते.
काही संवाद प्रभावित करतात, परंतु यापेक्षा अधिक दमदार संवाद राहिले असते, तर चित्रपट अजून प्रभावी झाला असता. दिग्दर्शक डॉ.मुरलीधर भावसार यांचा पहिला चित्रपट असून देखीलआपली छाप सोडतात. चित्रपटाच्या अखेरच्या दृश्यापर्यंत ते आपली पकड सैल होऊ देत नाहीत. परंतु त्यांनी स्क्रिप्टवर अजून थोडे काम केले असते,तर सेकंड हाफमधील ‘टर्न अॅण्ड ट्विस्ट’ आणखी रंजक करता आले असते. बॅकराउंड संगीत चांगले जमून आलेय. अनेक सीनमध्ये तुमचा हृदयाचा ठोका आणि उत्सुकता वाढवते.
कमी बजेटमध्ये देखील एक चांगला सिनेमा बनवता येऊ शकतो, अर्थात कमी बजेटचा सिनेमा असल्यामुळे थोडा फरक जाणवतोच. परंतु कथानक दमदार असल्यामुळे आपण चित्रपटाशी एकरूप होतो. सर्व कलाकार नवीन आहेत. परंतु रमेश जगताप यांचे पात्र साकारणारे अरुण गीते भाव खाऊन जातात. शरू अर्थात अश्विनी भावसारने देखील चांगला अभिनय केलाय. या दोघांनी चित्रपट त्यांच्या खांद्यावर ओढून नेलाय असं म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. रमेश जगतापच्या पत्नीच्या भूमिका वैशाली कुलकर्णी यांनी ताकदीनं निभावलीय. अमोल थोरात आणि अश्विनी पाटील यांनी देखील आपल्या भूमिकांना चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय.
एकंदरीत थोड्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहण्याचे शौकीन असाल,तर तुम्हाला हा सिनेमा नक्की आवडेल. चित्रपट एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तींनी तर जरूर बघितलाच पाहिजे. किंबहुना सामाजिक संस्थांनी या चित्रपटाचे ‘खास शो’ त्यांच्यासाठी आयोजित केले पाहिजेत. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे, जे जे सुखी जीवनासाठी रोजच्या आयुष्यात प्रयत्न करतात अशा सर्वाना समर्पित असा हा चित्रपट आहे. ज्यांना हा सिनेमा बघावयाचा असेल ते डॉ. मुरलीधर भावसार यांच्याशी ९३७०७८७५२१ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
विजय सर आपला खूप आभारी आहे. जळगावात काही जाणकार मंडळीना हा सिनेमा दाखवण्यासाठी आपली मदत होईल नक्की !