समता आणि प्रेमाची शिकवण ज्यांनी सार्या देशाला दिली अशा संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्या या महाराष्ट्रात आजही आंतरजातीय विवाह करणार्या प्रेमी युगलांना जीव वाचविण्यासाठी कशी धडपड करावी लागते याचे एक जिवंत उदाहरण जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील असून या युगुलाने सुखाने संसार करू देण्याची आर्त हाक दिली आहे
तसं प्रेम कधीही जात,पात, धर्म पाहून केले जात नाही. मात्र ज्यावेळीही प्रेम विवाह झाला असेल त्यावेळी दोघांचे धार्मिक, जातीय वर्गीकरण केल्याशिवाय समाज थांबत नाही. असंच एक प्रकरण घडलंय जामनेर तालुक्यातील पाळधी गावामध्ये. एकाच गावामध्ये राहणार्या रेणुका आणि अमोल यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम. प्रत्येक प्रेमी युगलाप्रमाणे जीवनभर एकमेकाला साथ देण्याच्या आणाभाका घेतलेल्या. थोड्याच दिवसात यांच्या प्रेमाची चर्चा आई-वडीलांपर्यंत पोहचली. रेणुकांच्या वडीलांनी सामाजिक बदनामीच्या भितीने पुण्याला भावाकडे रेणुकाला पाठवून दिले. तिच्या पाठोपाठ अमोलही पुण्याला पोहचला, आता दोघांना कळून चुकले होते की त्यांचे कुटुंबीय त्यांना कायमचे दूर करुन टाकतील, म्हणून त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सरळ आळंदी देवाचे गाठत दि.८ ऑगस्टला ओंकार मंगल कार्यालयात विवाह करत जन्मोजन्मीची साथ निभावण्याचे ठरविले. परंतु अमोल हा मागासवर्गीय असल्यामुळे रेणुकाच्या वडीलांना व नातेवाईकांना हा विवाह मान्य झाला नाही. तत्पुर्वी पुण्याच्या चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये रेणुका हरविल्याची तक्रार दाखल केली होती. १८ ऑक्टोंबर रोजी रेणुका व अमोल हे दोघे जण पोलीसांसमोर आले व जबाब दिला मी माझ्या मर्जीने व स्वखुशीने अमोलसोबत लग्न केले आहे. कायदेशीर दोघांनी विवाह केला असल्यामुळे तेथील पोलीसांनी पुर्ण संरक्षणात दोघांना पुण्याच्या बाहेर पाठविले आणि तेथून सुरु झाली त्यांची जीव वाचविण्याची धडपड!
हे दाम्पत्य भडगावला नातेवाईकांकडे काही दिवस आश्रय घेवून राहत असतांना रेणुकाच्या नातेवाईक मंडळीने तिथे पोहचत अमोलच्या नातेवाईकांना त्रास देत दोघांना ताब्यात देण्याची मागणी केली. त्याच दरम्यान येथील पोलीस स्थानकात स्थानिक भांडणामध्ये अमोलचे नाव गोवण्यात येऊन त्याला फरार घोषीत करण्यात आले. तेथूनही हे प्रेमी युगल जीव मुठीत घेत दुसर्या गावाकडं गेले. काही दिवस येथे तरी सुखाने राहू हा त्यांचा अंदाजही फोल ठरला. वरणगावला देखील भडगावसारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली. शेवटी त्यांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रारी अर्ज करत त्यांचा जीव वाचविण्याची विनंती केली आहे. या तक्रारीच्या प्रती त्यांनी गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षक, जळगाव, जिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी, तहसीलदार जामनेर अशा अनेक अधिकार्यांकडे पाठविल्या आहेत. काल सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात आपली व्यथा मांडण्यासाठी येत असतांना तेथे रेणुकाचे नातेवाईक अगोदरच त्यांची वाट पाहत दबा धरुन बसले होते. त्यामुळे ते पोलीस अधिक्षक कार्यालयातही पोहचू शकले नाही. या दोघांना आपल्या जीवावर टांगती तलवार दिसत आहे. परंतु या कठीण प्रसंगातही ते दोघं एकमेकाची साथ धरुन आहेत. त्यात रेणुकाचे बोल तर मनाला हेलावून सोडतात, ‘आम्ही जात, पात पाहून एकमेकांवर प्रेम केलं नाही. आमचा विवाह कुटुंबियांना अमान्य असणेही स्वाभाविकच आहे. पण झालेल्या गोष्टी आता चिघळवण्यापेक्षा आम्हाला सुखाचा संसार करु द्या’. प्रवाहाच्या विरोधात जात वार्यासोबत भटकंती करणार्या या प्रेमी युगलाची फक्त एवढीच आर्त हाक आहे.
आज आपण जरी एकविसाव्या शतकात असलो धर्म, जात निरपेक्ष असल्याचे कितीही ओरडून सांगत असलो तरी ही घटना निश्चित भुषणावह नाही. धरणगाव, पाथरी सारख्या ऑनर किलींग सारख्या घटना ताज्या असतांना या प्रेमी युगलाचा असं जीव मुठीत घेवून भटकंती करणं निश्चितच धोकेदायक आहे एवढे मात्र निश्चित.
<प्रसिद्ध दिनांक ११ नोव्हेंबर १२ >