बऱ्याच दिवसानंतर कुणास ठाऊक धरणगावातील रस्ते लवकर झोपी गेल्यागत वाटत होते. रस्त्यांकडे एकटक पाहणारे स्ट्रीट लाईटपण थोडे दमल्यागतच होते. उड्डाण पुलावर रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर बोलणारी प्रेमवीर पोरं सुद्धा दिसून येत नव्हती. पानटपरीवरील एफएमवर चालणारी गाणी बंद तर देशी दुकानाच्या बाहेर एका कोपऱ्यात चिलमचा कश ओढणारी ती दोघं जण पण आज गप्पा मारतांना दिसून आली नाहीत. कोट बाजारानेपण वाटतं…बऱ्याच दिवसानंतर रात्रीची चादर लवकर ओढून घेतली होती. नेहमी गजबजलेला असलेला तेली तलाव आणि मरीआई मंदिराचा परिसर अनपेक्षितपणे शांत दिसून आला.
घराबाहेर फिरत असतांना रेल्वेचा आवाज ज्या सहजतेने माझ्या कानावर पडत होता. त्यावरून रात्रीच्या भयान शांततेचा अंदाज मला यायला लागला. रात्री उशिरापर्यंत चालणारी भजन-कीर्तन,गाड्याची वर्दळ एवढेच काय दारू पिऊन अख्खी रात्र जागणाऱ्या बेवड्यांची बडबड देखील आज कानावर पडत नव्हती. त्यामुळे माझं गाव आतून अनाहूत भीतीने थोडं थरथरतय का ? असा भास झाला. धरणगावातील रात्र सध्या फारच भयग्रस्त होतेय की, रात्रीची गडद शाई माझ्या डोळ्यात आणि नसा-नसात पूर्णपणे भिनलीय, या भीतीने मी थोडा विचारात पडलो. परंतु अंगावर पडणारा पाण्याचा एखादं दुसरा थेंब…मनात आठवणींचा सागर उफाळून आणायला लागला आणि रात्रीची स्मशान शांतता अचानक संगीताच्या एखादं धून प्रमाणे मला मंत्रमुग्ध करु लागली.
पाकिस्तानात राहणाऱ्या रजाआजीच्या घरावर नजर गेली आणि डोळ्यातील काळी शाई थोडी पांढरी झाली. डोळ्यासमोरील दृश्य नकळत ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ दिसायला लागली. वाड्यात पोलीस बंदोबस्तात येणाऱ्या रजाआजीचा मोठ्या उत्साहाने बहिण आली वं…म्हणून ओरडून स्वागत करणारी कद्राआजीचा आणि दारूच्या अड्ड्यावर पडून असलेल्या आपल्या पोराला आणायला जाणाऱ्या हिराआजीचा चेहरा पण आठवणीच्या दुनियेत मला ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ दिसत होता. विहिरी जवळ बसणारा मित्रांचा गोतावळा आणि गुटख्याची पिचकारी, सिगारेटच्या कशमधून निघणारा धूर देखील कृष्णधवलच डोळ्या समोर फिरत होता.
मोबाईलमध्ये सुरु असलेली ९० च्या दशकातील गाणी देखील मला ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’च दिसत होती. एवढेच नव्हे तर, कधीकाळी माझ्यासाठी मंदिर,मशीद असलेले तिचे घर शेवटच्या घटका मोजत असल्याचे बघून तिचा चेहरापण मला बऱ्याच दिवसानंतर ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’मध्येच आठवला. तिच्या शाळेचा ड्रेस, केसांच्या दोन वेण्या, मला वेड लावणारे डोळे आणि तिचे गुलाबी ओठही ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ आठवत होते. संपूर्ण आयुष्य ईथंच जगावं अशी वाटणारी तिच्या घराची गल्लीही थोडी धूसर पण ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ होती. हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आमच्या दोन घरांच्या आड येणारी तेव्हाची संपूर्ण दुनिया देखील मला ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’च दिसत होती.
गावातील प्रत्येक गल्लीत- बोळात परमात्म्याचा अंश असल्याची माझी धारणा असलेले धरणगाव मला ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ का दिसत होते? अचानक वाटले…माझ्या जीवनातील रंग, तर धूसर झाले नाहीत? पण मन आतून बोलायला लागलं…जीवनात काळा रंग अधिक असला तर जगायला थोडं सोपं जातं. शेवटी सर्व रंगांच्या मिश्रणातून तो तयार झालाय. नाही तरी…सगळा खेळ रंगांचाच तर आहे. म्हणून रंग…डोळ्यात नसले तरी चालतील, हृदय मात्र इंद्रधनुच हवे ! मनातील सप्तरंग आयुष्यभराचे सोबती असतात. त्या सप्तरंगांना मिटण्याची भीती नसते. आपल्या जीवनाला ते त्यांच्याच पद्धतीने रंगविण्यात मग्न असतात.