ठिकाण धरणगाव रेल्वे स्थानक…वेळ रात्रीचे अकरा…तीन चिमुकल्यांसोबत विशीतली तरुणी रडतेय…दारूच्या नशेत साधारण विशीतलाच पोरगा तिला मारतोय…मोबाईल बता और हमरे साथ चल, म्हणून झटापटी करतोय. दोघांमधील वाद पाहिल्यावर कुणालाही नेहमीतल्या पठडीतला नवरा-बायकोमधील वाद वाटेल,असचं सगळं बोलचाल,हावभाव वैगैरे…वैगेरे. नाईट वॉक करायला जात असतांना धरणगाव रेल्वे स्थानकावर मजुरांचे असे छोटे-मोठे कौटुंबिक भांडणं नेहमीच बघायला मिळतात, त्यामुळे फारसे काही लक्ष दिले नाही. परंतु वाद वाढायला लागला. तो पोरगा त्या मुलीला रेल्वे स्टेशनच्या मागे,ते थांबलेल्या ठिकाणी चालण्यासाठी ओढून जबरी करीत होता. ती पोरगी ज्या…हरामी, हमुह नही आना, तेरी जोरू को बुला,हमहू उससे बात करूंगी. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे चवताळल्यागत तो, पुन्हा झटापटी करू लागला. शिवीगाळ आणि त्या पोरीच्या आक्रोशाने आता रेल्वे कॉलनीतील बरीच मंडळी जागी झाली होती.
रेल्वे कॉलनीतील एका तरुणाने त्याला थोडी दमदाटी करून तेथून हाकलून लावले. आम्हाला वाटले तो गेला, आता परत नाही यायचा. म्हणून आम्ही पण आमच्या गप्पा मारायला लागलो. तेवढ्यात त्या पोरीने मोबाईल काढला अन् ‘दीदी हुमूहसे वो कबसे झगडा कर रहा है, हमूहने उसके लिये मछिया लाई…शाम में, खाना खाणे के पेहले शराब पिके आया…और बिनबजह कुछ भी बाते करने लगा…अबूह हम धरणगाव नाम के स्टेशनपर है, रात मे देड बजह गाडी है…ठीक है दीदी हमूह…बस या किसी गाडी से अभी निकलते है’. तेवढ्यात नीट नेटके कपडे आणि थोडी शिकलेली दिसणाऱ्या एका बाईसोबत तो पोरगा पुन्हा डोलत-डालत यायला लागला. अजगराने आपल्या शिकारीकडे सप-सप पुढे सरकावं तसचं तो येत होता. अजगर गिळंकृत करण्याच्या भीतीने सस्याचा जसा थरकाप उडावा तसचं ती पोरगी धाप खाऊन रडू लागली. भैय्या इस हरामीसें हमें बचाव…कबहु सें हमे मार रहा है,
मी म्हटले कीस बात पर झगडा शुरू है. धाय खातच ती बोलली कुछ नही, ऐसेही शराब पी कर बेहक जाता है. मी म्हटले मोबाईल मांग रहा है, तो दे दे…वो पिया है, उससे अभी दिमाग लगा कें कुछ मतलब नही. भैय्या मोबाईल दे तो दे…पर वोह उसे पटकर फोड देगा…थोडी देर पेहले ऐसेही मोबाईल पटक दिये था वो…!
तेवढ्यात पुन्हा तो आला आणि तिच्यासोबत हातापाई करत…मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्यासोबत आलेली बाईपण दे दो मोबाईल, अभी वोह शराब की झिंग मे है…! काहे झगडा बढा रही हो…ती…धाय मोकलूनच…नही, हमहू नही देंगे मोबाईल…दीदीसें हमें अभी पुरी बात करणी है…तेवढ्यात पुन्हा त्याने मारहाण करायला सुरुवात केली. परत एकदा रेल्वे कॉलनीतल्या तरुणाने कसं तरी समजावून त्याला परत पाठवले…तेवढ्यात गर्दीतील एक जण म्हणाला दोन बायका दिसता, या भडव्याला…कुज-बूज तशीच सुरु होती, पण कुणी त्याला बोलण्याची हिम्मत दाखवत नव्हता. अर्थात फुल्ल टाईट आणि गुंड दिसणाऱ्या पोराशी शेवटी कोण डोकं लावेल. काहीवेळानंतर थोडी शांतता झाली. ती पोरगी आपल्या तीन लहान चिमुकल्या पोरांना आपल्या कुशीत घेऊन हुंदके देऊन रडत एका कोपऱ्यात जाऊन बसली अन् आपल्या पोराला दुध पाजू लागली. कॉलनी आणि नाईट वॉकला आलेली सर्व जण आपापल्या घरी गेले. मी आणि माझा मित्र तेथेच थांबून होतो,आम्हाला भीती अशी की,दारूच्या नशेत त्याने त्या पोरीचे किंवा त्या लहान मुलांचे काही बरे वाईट करू नये. शेवटी त्याठिकाणी रेल्वेवर बसून यमराज केव्हा कुणाला सोबत नेईल सांगता येणारे नव्हते.
मी म्हटलं आप कहा से हो…ती काहीच बोलली नाही, मी परत विचारले कहां जाना है. भैय्या हमे शिरपूर जाना है…मी म्हटले यहां से शिरपूर के लीए ट्रेन नही है, भैय्या हम अमलनेर सें चले जायेंगे रात की गाडी सें. पुढं तिच्या सोबत बोलावे की नाही, असा विचार करत होतो. कारण बिचारी फारच भेदरलेली होती. थंडीतल्या पावसात बिन आसरा असलेल्या भिजलेल्या शेळीने थरथर कापावं तशी तिची अवस्था होती, पण शेवटी विचारलचं…आप कहां सें हो…भैय्या हम सेंदवा के है…वो कोण है आपका….ती परत काहीच बोलली नाही…!
तेवढ्यात पुन्हा नव्या जोशाने शिकारीवर झडपण्याच्या आवेशात तो यायला लागला, त्याची चाल पाहून ती पुन्हा भेदरली…आणि जोराने ओरडत भैय्या हमे बचाव…’हरामी बेहन और जोरू में फरक नही समजता’, माझ्या कानात जणू कुणी उकळलेला शीस ओतावा असे शब्द कानातून मेंदूत गेले, सुन्न झालो…काय बोलावे, काय नाही, मन-मेंदू अगदी सगळं शरीर निस्तेज झालं…! समोर आल्या-आल्या त्याला तुडवायला लागलो..दोन-चार कानफाटात टाकल्या…दोनच मिनिटात त्याची सगळी दारू उतरली…भैय्या हमरी बेहन हैं…उसे लेने आये हैं…त्याच्या तोंडून ‘बेहन’ हा शब्द ऐकल्यानंतर तर आणखी संताप आला…परत तुडवला त्याला…मग काय त्याने असा पळ काढला की, पाचच मिनिटात अंधारात गायब झाला. मी तेथेच थांबून होतो…पण ती हुंदके देत रडतच होती. जणू या जगात जन्म घेऊन तिने मोठे पाप केले आहे. डोळे पुसत तिने आपल्या एका पोराला कडेवर उचलले, दुसऱ्याचे बोट पकडले आणि तिसरा तिच्या मागे चालू लागला. ती आजुबाजूला न् मागेपुढे कोणत्याच दिशेला न बघता….मान खाली घालून तिकीट खिडकीच्या दिशेने निघून गेली. तिच्या अश्रुच्या धारांनी या पापी जगाला आपल्या सोबत वाहून न्यावं, असचं मला वाटत होते आणि त्यावेळी एका कवीच्या या ओळी आठवल्या.
तन के साथ होता है इनके मन का भी बलात्कार,
इंसान की दरिंदगी से आज दहल रही है औरत
रिश्तों की मर्यादा के लिये सी लिया है जुबान इसनें
माँ-बहन-बीवी के रूप में आज सिसक रही है औरत !
करूणास्पद सत्यकथन
आश्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही व्यसनाधीन झालेल्या ला नात्याची किंमत नाही राहत समाजाने जागृत होहुन अश्या गोष्टीं ना आळा घातला पाहिजे तुमचे अभिनंदन साहेब तुम्ही जागरूकता दाखवली