भारतीय आणि पाकिस्तानी सिनेमा विशेष करून समाजातील प्रतिबिंब दाखविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बोल आणि खुदा के लिए हे पाकिस्तानी सिनेमे पहिल्यानंतर तर अंगावर काटाच उभा राहतो. मी कायम म्हणतो पीके आणि ओह माय गाॅड असे सिनेमा फक्त भारतातच आणि बोल आणि खुदा के लिए असे सिनेमे पाकिस्तानातच बनू शकतात आणि तुफान चालू देखील शकतात. हे सिनेमे परस्परविरोधी देशात जर तयार झाले असते, तर जगात कोहराम माजला असता. असो सांगायचा असं आहे की, नुकताच पाकिस्तानी ‘अॅक्टर इन लाॅ’ हा सिनेमा पहिला. हसून-हसून पोट दुखून आले. या चित्रपटाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे झाले तर, ‘पाकिस्तानी सिनेमा विथ इंडियन टच’ असेच करावे लागेल.
कुणाला सांगितले नाही तर खरं वाटणार नाही की,हा पाकिस्तानी सिनेमा आहे म्हणून. तिथल्या नागरिकांच्या समस्या, राजकारण्यांविषयीची चीड, शोषितवृत्ती, धर्माच्या नावावर गंडवले जाणे, अंधश्रद्धा, प्रेम, अल्पसंख्याक समुदाय वैगैरे…वैगैरे….सर्व गोष्टी अगदी भारतीय सिनेमाप्रमाणेच आहे. फक्त या सर्व गोष्टी हास्य व्यंगाच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या आहेत. ‘फर्स्ट हाफ’ एवढा पाॅवरफुल्ल आहे की, तुम्हाला जागेवरून हलू देखील देत नाही. प्रत्येक सीनमध्ये कॉमेडी ठासून भरलेली आहे. अगदी इंटरव्हल कधी होतो तुम्हाला देखील कळत नाही.परंतु जेव्हा होतो तोपर्यंत तर तुमचे पोट हसून-हसून दुखायला लागलेले असते. आणखी एक गोष्ट सांगतो चित्रपटातील अनेक छोट्या-छोट्या गोष्टीबघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आपण जेवढे समजतो तेवढे पाकिस्तानी लोक कट्टरपंथी नाहीत. तेथील मुलं आणि मुलींना देखील जगाच्या सोबत चालायचंय, पण तेच राजकारण आणि तोच विरोध तेथेही आहे. एका तरुणीला आपल्या हक्कासाठी लढतांना कशा अडचणी येतात,त्याची मांडणी देखील चांगली केली आहे. पाकिस्तानी लोकांवर आपल्या बॉलीवूडचे गारुड किती मोठ्या प्रमाणात आहे, हे बघून तर तुम्ही नवलच कराल. लोड शेडींगवरील कोर्टातील गमती जमती तर भन्नाट आहेत.
सेकंड हाफ देखील तुम्हाला अस्वस्थ करतो. ‘अॅक्टर इन लाॅ’ हा पाकिस्तानात तुफान चाललेल्या चित्रपटापैकी एक आहे. सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पाकिस्तानात हा चित्रपट सहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तुम्हाला भारतीय सिनेमातील जेष्ठ कलावंत स्व. ओम पुरी हे देखील महत्वपूर्ण रोलमध्ये दिसतात. भारता प्रमाणे पाकिस्तानी न्यायालयीन व्यवस्थेतील कमकुवता आणि ताकद एकाचवेळी आपण याठिकाणी बघतो. पाकिस्तानी कलाकार आणि चित्रपटाचा हिरो फहाद मुस्तफाने ताकदीने शान मिर्झा हे पात्र साकारले आहे. तर मिनू स्क्रूवालाच्या पात्रात मेहविश हयात हिने देखील जीव ओतलाय. दोघांची केमिस्ट्री बघायला मजा येते. मला तर रणबीर कपूर आणि कैतरिना कैफचाच भास व्हायचा या दोघांना बघतांना. टेक्निकली देखील हा चित्रपट खूप स्ट्राँग आहे. गाणी,सिनेमाटोग्राफी, बँकग्राउंड म्युझिक चांगले आहेत. संवाद तर एकदम भन्नाट असून कलाकारांचे कॉमेडी पंच आणि टायमीग देखील जोरात आहे. बघा आणि सांगा कसा वाटला ‘अॅक्टर इन लाॅ’ !
चित्रपटाची युट्युब लिंक
https://www.youtube.com/watch?v=X-nxVd9iwpU