मानव तस्करी आणि देह व्यापार, हा भारतीय समाजाचा असा क्रूर आणि विद्रूप चेहरा आहे, ज्याची प्रचीती वेळोवेळी आपल्याला कुठेतरी दिसूनच येत असते. कोवळ्या लहान पोरींना देह व्यापारात ढकलण्यासाठी एक संपूर्ण रॅकेट काम करीत असते. काय वाटत असेल त्या निरागस मुलींना ज्यांना काही नोटांच्या तुकड्यासाठी निर्दयीपणे कुस्करले जात असेल. अशीच एक कहाणी पश्चिम बंगालच्या बेपत्ता पाच वर्षीय अमोलीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न ‘अमोली : प्राइजलेस’ या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ही शॉर्ट फिल्म मोल, माया, मंथन आणि मुक्ती या चार चॅप्टरच्या माध्यातून देह व्यापराच्या धंद्यातील भेदक वास्तव आपल्या समोर मांडते. या शॉर्ट फिल्ममधील मंजू, नीलम, तारा, सोनी,मालती यांची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकल्यानंतर तर मन आणि मेंदू सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून जास्मिन कौर रॉय आणि अविनाश रॉय यांनी आपली जबरदस्त छाप सोडली आहे.
पश्चिम बंगालच्या जलपाईगुरी या गावातून २००३मध्ये अचानक पाच वर्षाची अमोली बेपात्ता होते. या भागातून आतापर्यंत हजारो मुली बेपत्ता झालेल्या आहेत. आपल्याला फक्त दहशतवाद्यांचाच स्लीपर सेल माहित असेल. परंतु देह व्यापार करणाऱ्यांचा धंद्यात देखील स्लीपर सेल असतो. जसं दहशतवादी आपल्या आजूबाजूला राहतो, परंतु त्याची खरी ओळख आपल्याला त्याने केलेल्या एखाद बॉम्बस्फोटानंतर होते. तसेच देह व्यापार करणाऱ्यांच्या धंद्यात देखील गावातील एखाद मुलगी अचानक गायब होते, किंवा नौकरी,लग्नाच्या बहाण्याने तिला या नरकात ढकलले जाते, त्यावेळीच अशांचा खरा चेहरा जगासमोर येतो.
मोल :
मोल नावाच्या पहिल्या चॅप्टरपासून शाॅ र्ट फिल्म सुरु होते. या धंद्यात प्रत्येक गोष्ट ‘मोल’पासून सुरु होते आणि संपते देखील मोलवरच. देशातील विविध भागातील खेड्यांमधून हजार-दोन हजारात मुलगी विकली गेल्यानंतर दलाल आणि एजंटच्या रॅकेटचा खरा खेळ सुरु होतो. बिहारमधील मुंगेर गावातील मंजू आपल्याला या धंद्यातील मोलचे वास्तव समजावून सांगते. मंजूची फसवणूक करून तिला या धंद्यात टाकण्यात आलेले असते. या धंद्यात धकलल्यानंतर या कोवळ्या पोरींच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले जातात. परंतु अर्धे पैसे दलाल आणि मालकीण ठेऊन घेत असते. दिवसभर शरीराला तुकड्या-तुकड्यात विकणारी मंजूच्या हातात मात्र, फक्त पोट भरू शकेल आणि सकाळी पुन्हा तोंडावर जगाला रंगीबेरंगी दिसणारी काळीक मळू शकेल एवढेच पैसे उरतात. मंजू ज्या पद्धतीने हे सर्व सांगते, त्यावेळी काळीज चिरले जाते. ‘पोरगी आम्हाला मिळाली, मग अर्धे पैसे तर आम्हीच ठेवणार ना’ , हीच या धंद्याची रीत असल्याचे एक मालकीण ज्या सहजततेने सांगते. त्यावरून अशा हरामखोरांसाठी जगात फक्त आणि फक्त पैसाच महत्वपूर्ण असल्याचे सिद्ध होते.
लहान मुलींना या धंद्यात ढकलने फार सोपे असते. तसेच कोवळ्या पोरींची किंमत देखील जास्त मिळते. कारण लहान मुलींसोबत सेक्स केल्यामुळे एडस् बरा होतो तसेच म्हतार वयात प्रकृती सदृढ राहते,अशी एक मोठी अंधश्रद्धा देखील मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या शहरांमधून ज्यावेळी कोवळ्या पोरींची मागणी येते. त्यावेळी स्लीपरसेल लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन किंवा बळजबरी, दिशाभूल करून विकृतांची डिमांड पूर्ण करीत असतो. अर्थात अवघ्या दोन-तीन हजारात त्या मुलींची विक्री होते. परंतु हा धंदा अरबो-खरबोच्या घरात आहे.
माया :
या चॅप्टरमध्ये कथित सभ्य आणि बड्या सोसायटीचा विद्रूप चेहरा दाखविण्यात आला आहे. ज्यावेळी एका मुलीचे मोल ठरवून या बाजारात एखादं वस्तू प्रमाणे आणले जाते. त्यावेळी दलाल,एजंट तिला आपल्या मर्जीने पाहिजे तेथे विकतात. मोठ्या शहरांमध्ये अनेक श्रीमंत लोकं या धंद्यात पैसे गुंतवतात. कारण त्यांना माहित आहे, हा धंदा आपल्याला नुकसान नव्हे तर, फायदाच देईल. आज मुंबई, दिल्ली किंवा भारतातील प्रत्येक मेट्रो शहरात अनेक महाविद्यालयीन मुली देह व्यापारच्या धंद्यात काम करताय. मजबुरी किंवा अन्य काही कारणांमुळे अनेक मुली आज या मार्गाला लागल्या आहेत.
या चॅप्टरमध्ये नीलम नावाच्या एका मुलीची मेंदू सुन्न करणारी कहाणी दाखविण्यात आली आहे. नीलम फक्त १४ वर्षाची असतांना तिचा काका तिला एका मोठ्या व्यापाऱ्याला विकतो. नीलम सोबत त्यानंतर जे घडतं ते आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आणि तेवढे अंगावर काटा आणणारे आहे. नीलमला विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याला ‘अॅनिमल सेक्स’ अर्थात हिंसकरित्या जनावरांप्रमाणे सेक्स करण्याची विकृती असते. तो नीलमला असंख्य पद्धतीने शारीरिक पिडा देत सेक्सचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायचा. तो नीलमचे हात-पाय बांधून मारहाण करून बलात्कार करायचा, नीलम जेवढी मदतीसाठी याचना करून आरोळ्या मारायची त्याला तेवढाच आनंद मिळायचा, सेक्सचा विकृत आनंद मिळविण्यासाठी तो बऱ्याचदा नीलमच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके देखील द्यायचा. एवढेच नव्हे तर, तिच्या शरीराच्या प्रत्येक अंगाचे दाताने चाऊन लचके तोडायचा.
कॅमेऱ्या समोर नीलम या सर्व गोष्टी सांगत असतांना ती सहज हसून जाते. परंतु तिच्या आजच्या हसण्यातून भूतकाळातील तिच्या किंचाळ्या आणि हतबलता,वेदना देखील आपल्याला ऐकू येतात. नीलम धंद्यात पडल्यानंतर तिला हार्मोन्सचे इंजक्शन देण्यात यायचे. सुरुवातीला नीलमला काहीच कळत नव्हते,की हे इंजक्शन कसले आहेत म्हणून. परंतु काही महिन्यातच अवघ्या चौदा-पंधरा वर्षाची नीलम सत्तावीस-अठ्ठावीसच्या घरात दिसायला लागली होती. त्याला आपल्या शरीरातील बदल जाणवायला लागले होते.
आज नीलमचा दोषी जामिनावर बाहेर आहे. परंतु नीलम ज्यावेळी अनेक वर्षानंतर घरी गेली तर तिच्या फोटोवर चंदनची माळा टाकलेली होती. कारण नीलम घरच्यांसाठी मेलेली होती. नीलमच्या मामाने तिला घाण-घाण शिव्या देऊन घरातून हाकलून लावण्यात आले. आज नीलम हार्मोन्सचे अँटी डोससह विविध औषधी उपचार घेऊन जगत आहे.
मंथन :
समाजात आज देह व्यापार सारख्या गंभीर विषयावर मंथन करणे कशा पद्धतीने गरजेचे आहे. यावर ‘मंथन’ या चॅप्टरच्या माध्यांमातून भाष्य करण्यात आलेले आहे. मुलगी म्हणजे पैसे कमावण्याचे साधन हीच परिभाषा असलेली माणसं देखील या जगात असल्याचे भयानक चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. स्वतःचे आई-वडीलच आपल्या मुलींना कशा पद्धतीने या धंद्यात टाकतात,हे बघून तर मन आणि मेंदू बधीर व्हयला लागतो.
मध्य प्रदेशातील मंदसूर-निमूच या महामार्गावर पारंपारिकरित्या देह व्यापार करणारे परिवार देखील आपल्या देशात असल्याचे भयानक वास्तव आपल्या समोर येते. अवघ्या १३ वर्षाची असतांना येथील ताराला तिच्या आई-वडिलांनी देह व्यापारात टाकले. तत्पूर्वी दहा-बारा वर्षाची असतांना तिला इतर मुली ग्राहकांशी शरीर संबंध ठेवतांना सोबत घेऊन ज्यायाचे. अर्थात या धंद्यात आल्यानंतर तिला पटकन या धंद्यातील चालीरिती समजाव्यात हा त्या मागचा उद्देश असायचा. ताराच्या समाजात मुली जन्माचा आनंदौत्सव मनवला जातो. कारण परिवाराला पैसा कमवून देणारी लक्ष्मी जन्माला आलेली असते. याठिकाणी मुलगा जन्माला आला तर मात्र, मातमचे वातावरण असते.
मुक्ती :
या चॅप्टरमध्ये देह व्यापारमधील पिडीत मुलींच्या मुक्तीसाठी व नविन भवितव्यासाठी काय केले पाहिजे. कोणत्या संस्था काय करताय या संबंधी माहिती दिलेली आहे. ज्या मोठ्या शहरांमध्ये देह व्यापाराचा धंदा मोठ्या प्रमाणात चालतो. त्याठिकाणी पोलिसांसह अन्य सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांचे बारीक लक्ष असते. कित्येकदा पोलीस धाड टाकतात, त्यावेळी अरुंद अशा जागेत अनेक अल्पवयीन मुलींना लपण्याची व्यवस्था केलेली असते. जागा खूपच अरुंद असल्यावरही तिथं अनेक मुलींना कोंबडीच्या खुराड्याप्रमाणे कोंबलेले असते. त्याठिकाणी त्यांना श्वास देखील घेता येणार नाही, पोलिसांची कारवाई जास्त वेळ चालल्यास श्वास गुदमरून किंवा हृदयाच्या झटक्याने त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो, अशी बिकट परीस्थिती देखील असते.
देह व्यापार संबंधी दलाल,एजंट आता इंटरनेट किंवा सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. ऑनलाइन धंदा चालत असल्यामुळे एकाच ठिकाणी खोल्याकरून धंदा का करायचा, म्हणून आता आधुनिक साधनांचा वापर केला जातोय. देह व्यापारच्या नरकात लहान मुलींना येण्यापासून वाचवायचे असेल तर याठिकाणी जाणाऱ्या ग्राहकांना समजावण्याच्या पलीकडे कुणाच्याच हातात काही नाहीय.
पोलीस किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने देह व्यापारच्या धंद्यातून बाहेर पडलेल्या मुलींसाठी मुंबईतील भोईसर येथे एक ‘सेल्टर होम’ आहे. याठिकाणी अशा पिडीत मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली जाते. शिक्षणापासून तर इतर नैतिकमूल्य याठिकाणी त्यांना समजावून सांगितली जातात.
या ठिकाणी असणारी मालती आणि सोनीची कहाणी देखील आपल्याला नीलम,मंजूच्या कहाणी प्रमाणे अस्वस्थ करते. सोनीवर तिचे सावत्र जिजाजी वेळोवेळी बलात्कार करतात. ही गोष्ट ती आपल्या सावत्र आईला सांगते. परंतु तिची आई असं शक्यच नाही म्हणत, या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. आता तर रोज रात्री तिच्या कोवळ्या शरीराचा उपभोग घेणे, हे नित्याचेच झाले होते. शेवटी एकेदिवशी अवघी तेरा-चौदा वर्षाची सोनी गर्भवती राहते. काही महिन्यांनी ती एका मुलीला जन्म देते. परंतु सोनीची सावत्र आई तिच्या एका दिवसाच्या मुलीला अवघ्या बाराशे रुपयांसाठी विकून टाकते. सोनीच्या आईची क्रूरता येथेच संपत नाही. मालती पंधरा-सोळा वर्षाची असतांना तिला तिची सावत्र आई एका एजंटकडे विकून देते.
तुझ्या आईने तुझ्यासोबत असं का केले? असं जर सोनीला आजही कुणी विचारले तर सोनीजवळ त्याचे उत्तर नसते. ती कोपऱ्यात बसून आपल्या अश्रूंना विचारते, माझ्या आईने माझ्यासोबत असं का केलं? खूप रडल्यानंतरही ज्यावेळी सोनीला उत्तर मिळत नाही,त्यावेळी ती स्वतःच्या शरीराला जखमाकरून रक्ताला जाब विचारते. या जगात हरामखोर आणि नीच माणसांची कमी नाही.माय-लेकीच्या नात्याला देखील जाणून न घेणारी जनावरं या पृथ्वी तालावर जगताय.
या ठिकाणी सोनीसोबत राहणारी मालती देखील आपले नशीब बदलविण्यासाठी धडपड करतेय. समाजात तिला एका सर्व सामान्य स्त्री प्रमाणे आपले हक्क मिळवायचेत. ज्या इतर मुली या नरकात आल्या आहेत,त्यांच्यासाठी मालतीला काही तरी भरीव काम करायचे आहे. दलाल,एजंट नावाच्या राक्षसांना फक्त मृत्युदंडच द्यावा,असं देखील सोनीला वाटते. दुसरीकडे अमोलीचा अद्याप देखील कुठलाही तपास लागलेला नाही. आज आपल्या घरात आपल्या सोबत सुरक्षित आहेत, असं समजणे आपल्यासाठी भविष्यात धोक्याची घंटा ठरू शकते, एवढे निश्चित आहे.
अमोली शॉर्ट फिल्मची लिंक
https://bit.ly/2x4VJVN