नासाने गुगल आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने आठ ग्रह आणि एक सूर्य असलेले कॅपलर-९० ही नवीन सुर्यमाला नुकतीच शोधून काढल्याची बातमी आज वाचली.त्यामुळे या विषयाची थोडी उत्सुकता वाढली.थोडा अभ्यास केला असता.आपल्या जळगावकर असलेल्या पृथ्वीसारख्या अन्य ग्रहांचा शोध घेण्यासाठी नासाने अर्थपुरवठा केलेल्या ‘हिरा सिम्यलेटेड मिशन’मध्ये जळगावच्या अनिमा साबळे-पाटील यांनी कमांडर म्हणून काम केले असल्याचे समोर आले. ग्रामीण भागातून शिकलेल्या मुली विशेष असं काही करू शकत नाही,ही मानसिकता खोटी ठरवणारी भन्नाट परंतु तेवढीच संघर्षमय कहाणी यानिमित्ताने अभ्यासायला मिळाली. कितीही शिक्षण केले तरी संसारच करायचा ना! हे नातेवाईकांचे बोलणे खोटे ठरविण्यासाठी अनिमा यांनी घेतलेली प्रचंड मेहनत ग्रामीण भागातील आजच्या मुलींसमोर येणे गरजेचे असल्यामुळे लिहिण्याचे ठरविले.कारण संघर्षातूनच यशाच्या आकाशाला गवसणी घालणे शक्य असते. ‘दिल है छोटासा, छोटीसी आशा मस्तीभरे मनकी भोलीसी आशा, चाँद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा’ रोजा चित्रपटातील पी.के.मिश्रा लिखित हे गीत मु.जे. महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनात म्हणणार्या महत्वकांशी मुलीच्या जीवनाशी अगदी मिळते जुळते असेल असे त्यावेळी कुणालाही वाटले नसावे. बालपणी शालेय जीवनात पुस्तक प्रदर्शनात रॉकेट आणि अंतराळवीर यांचे फक्त फोटो बघून आपण देखील आकाशाला गवसणी घालू शकतो, असे स्वप्न तिने बघितले. परंतु हे स्वप्न अस्तित्वात उतरवणे एवढे सोपे नव्हते. परंतु एकेदिवशी स्वप्न खरं होणार आणि आभासी आकाशाला अखेर गवसणी घालाणारच,हा अनिमा पाटील यांचा आत्मविश्वास ग्रामीण भागातील असंख्य मुलींना प्रेरणादाई आहे.
अ
अनिमा पाटील-साबळे या एक भारतीय वैज्ञानिक तथा मराठी भाषिक अंतराळवीर आहेत.सध्या नासाने अर्थ पुरवठा केलेल्या PoSSUM आणि PHEnOM या व्यावसायिक प्रकल्पासोबत त्या जुळलेल्या आहेत. अनिमा पाटील या सॉफ्टवेअर तथा एरोस्पेस (अंतराळ अभियंता) इंजिनियर आहेत. नासाकडून राबविण्यात आलेल्या कॅपलर अभियानात तसेच नासाच्याच गोपनीय प्रकल्प विभागात देखील त्यांनी काम केले आहे. अनिमा पाटील या वैमानिक असून तसेच प्रमाणित स्कुबा चालक देखील आहेत. तसेच नासाशी संलग्न असलेल्या HERA VII तसेच ‘सिम्युलेटेड एस्ट्रोनॉइड’ मिशनमध्ये त्या कमांडर राहिल्या आहेत. तर माईक्रोग्रेविटीमधील स्पेससुटच्या कार्यप्रदर्शनाची चाचणी करण्यासाठी ‘फाल्कन २०’ वर पॅराबालस फ्लाइट केले आहे. एफएए अभ्यासक्रम करीत असतांना त्यांनी वेगवान ‘६ जी’ची मदत घेतली. तर एस्ट्रोनॉटिक्स अभ्यास करीत असताना सलग १६ तास अभ्यास केला. त्यामुळे आज अनिमा अंतराळ क्षेत्रात काम करू इच्छीत इतर मुलींसाठी आदर्श ठरताय. अनिमा या एक उत्कृष्ट गायिका, नृत्यांगना, कवी आणि मॉडेल असून सध्या अंतराळ विज्ञान विषयात पीएच.डी. करीत आहेत. हे सर्व करीत असतांना अनिमा या २ सुंदर मुलांच्या आईची जबाबदारी देखील पार पाडीत आहेत.
अनिमा या जळगाव येथील मधुकर पाटील व नीता पाटील यांच्या कन्या असून त्यांचा जन्म महाराष्ट्रातील धुळे येथे झाला. परंतु अनिमा यांचे सर्व बालपण जळगावमध्ये गेले. अनिमा यांचे प्राथमिक शिक्षण जळगावमधील सेंट जोसेफ इंग्रजी विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण नंदीनीबाई बेंडाळे महिला महाविद्यालयात झाले. पुढे त्यांनी एम.जे.महाविद्यालयातून भौतिक शास्त्रात पदवी मिळविली तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पदवीत्तर एमसीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अनिमा यांचे वडील मधुकर आर.पाटील हे कोचिंग क्लासेस चालवीत होते. त्यामुळे अनिमा यांचे गणित,विज्ञान आणि इंग्रजीवर विशेष प्रभुत्व होते. अनिमा यांनी एमसीए केल्यानंतर काही वर्ष त्यांनी मुंबईत नौकरी केली.त्यानंतर अनिमा या आपल्या पतीसोबत अमेरिकेत संगणक अभियंता म्हणून स्थलांतरित झाल्या.सध्या अनिमा या नासाशी संलग्न असलेल्या मानवी अवकाशयान प्रकल्पात कार्यरत असून त्याठिकाणी त्या एका मोठ्या संधीच्या शोधात आहेत.
नासाच्या अंतराळवीर होण्याबद्दलच्या अनिमा यांच्या आकांक्षामध्ये वय हा एक मोठा घटक अडचणीचा असल्याची त्यांना चांगल्याप्रकारे जाणीव आहे. परंतु तरी देखील त्या आपल्या वयानुरूप आलेले अनुभव युवापिढीला कथन करीत असतात. सोशल मीडिया व http://www.facebook.com/animpatilsabale आणि www.animapatilsabale.com या वेबसाइट्सद्वारे अनिमा या अमेरिकेतील आणि भारतातील तरुणाईला मार्गदर्शक आणि प्रेरणा देत असतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या प्रश्नांची उत्तर देत शंकांचे नीरासन देखील करतात. अनिमा पाटील यांना २०१७ मध्ये नुकतेच प्रभावशाली महिला म्हणून गौरवविण्यात आले आहे. अनिमा यांच्या विषयी अनेक बातम्या माध्यमांमध्ये आलेल्या आहेत. तसेच त्यांनी लिहिलेले काही विशेष लेख देखील प्रसिद्ध झालेले आहे. दरम्यान, भारतीय शिक्षण पध्दतीमध्ये मुलांवर चांगली टक्केवारी मिळविण्याचा प्रचंड दबाव असतो. परंतु पालकांनी टक्केवारीच्या दबावापेक्षा मुलांना संशोधनाच्या दिशेने प्रोत्साहन दिले पाहिजे, असे अनिमा यांचे म्हणणे आहे.
अभ्यास करण्यासाठी अशी मिळाली प्रेरणा
अनिमा पाटील या आज ‘रॉकेट गर्ल’ म्हणून ओळखल्या जातात. जळगाव सारख्या लहान शहरातील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत शिकत असताना एके दिवशी तेथे पुस्तक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. त्या प्रदर्शनात एक पुस्तक चाळत असतांना अनिमा यांना रशियन स्पेस क्राफ्टची चित्रे दिसली. त्यामध्ये अपोलो यान उडतांना आणि त्याच्यासोबत अंतराळवीर यांचे फोटो होते. या फोटोंच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांना अंतराळवीरांविषयी माहिती झाली. याच वेळी त्यांनी मनाशी खुणगाठ बांधत आपल्याला देखील आयुष्यात काही तरी बनायचे असल्याचा निश्चय केला. म्हणून त्यांनी आयुष्यातील सर्वात कठीण स्वप्न बघितले आणि भविष्यात पूर्ण देखील केले. अनिमा यांनी पुस्तक चाळत असतांनाच एक यशस्वी अंतराळवीर होण्याचा निश्चय केला होता.परंतु हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कोणताच मार्ग डोळ्यासमोर नव्हता. कारण कुणाला सांगितले तर लोक विनाकारण आपली मस्करी करतील किंवा टिंगल उडवतील.यामुळे आपल्याला विनाकारण मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल असं अनिमा यांना वाटायचे.
प्रतिकूल परिस्थितीवर अशी केली मात
भारताचे एकमेव अंतराळवीर म्हणून अंतराळवीर राकेश शर्मा हे अनिमा पाटील यांचे प्रेरणास्थान होते. त्यामुळे एक पायलट बनून नंतर आपल्याला अंतराळवीर होण्याची संधी मिळेल, असे अनिमा यांना नेहमी वाटायचे.स्वप्न मोठी असली तरी त्यांनी इतर विद्यार्थिनीनी प्रमाणे गायन, नृत्य, वादविवाद आणि भाषणात भाग घेत शालेय जीवनाचा पुरेपूर आनंद लुटला आहे. परंतु त्याकाळात भारतात लढाऊ पायलट म्हणून महिलांना पाहिजे त्या प्रमाणात स्विकारत नव्हता. परंतु अनिमा यांना आशा होती की, पदवी प्राप्त करतील तोपर्यंत परिस्थिती बदललेली असेल. लढाऊ पायलट किंवा अंतराळवीर होण्यासाठी भौतिकशास्त्र पदवीधर असणे गरजेचे असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जळगावमधूनच भौतिकशास्त्र विषयातून बी.एस्सी. पूर्ण केले. अनिमा यांचा भौतिकशास्त्र हा आवडीचा विषय परंतु खगोलशास्त्र हा विषय त्यांना आपल्याकडे नेहमीच आकर्षित करायचा. एका लढाऊ विमान चालकाच्या आवेदन फॉर्म भरताना त्यांना अभियांत्रिकी किंवा भौतिकशास्त्र पदवीधर असणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे स्नातक प्रकल्पासाठी याच विषयावर त्यांनी अभ्यास करत विशेष प्रविण्याने पदवी प्राप्त केली. अनिमा यांनी एक दिवस लढाऊ पायलटचा अर्ज प्राप्त केला.परंतु त्यावर ‘फक्त पुरुष’ अर्ज करू शकतात असा उल्लेख होता.त्यामुळे त्यांना थोडा धक्का बसला त्या दिवशी आपल्या आजूबाजूचे माझे जग कोसळले, आता सर्वकाही संपले अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली.परंतु तरी देखील त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करण्याचा निर्णय घेतला.
शिक्षणासाठीचा लढा
अनिमा पाटील यांना एका उन्हाळ्यातील सुटीत अंतराळवीर होण्याची उत्कंठा प्रचंड जाणवत होती. एवढेच नव्हे तर आता पुढे काय करायचे आहे याचा निर्णय घेण्याची वेळ आल्याची जाणीव देखील त्यांना होत होती.त्यामुळे अनिमा यांनी वडिलांच्या सल्ल्यानुसार एमसीए (एमएस कॉम्प्यूटर अॅप्लिकेशन्स) नावाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरू केला. त्याठिकाणी केवळ ३० जागा होता.त्यामुळे सुरुवातील प्रवेश मिळेल का? याबाबत सुरुवातीला संभ्रम होता.परंतु अखेर प्रवेश मिळाला होता. अभ्यासक्रमचा प्रवेश घेतल्याबरोबर अनिमा यांना लग्नाची स्थळे यायला सुरुवात झाली तर तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकेल का? याबाबत त्यांच्या वडीलांच्या मनात थोडा संभ्रम होता.परंतु अनिमा यांच्या आईने त्यांच्या वडिलांना सांगितले की, अनिमा हुशार आणि महत्वाकांक्षी आहे, तिच्या अभ्यासासाठी, आपण सासरच्या मंडळीशी बोलणी करू शकतो. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका असे सांगितले. अनिमा यांना आईने दिलेल्या खंबीर साथीमुळे अखेर त्यांचे शिक्षण सुरु झाले.
पृथ्वीसारख्या अन्य ग्रहांचा शोध घेणार्या टीममध्ये सहभाग
अनिमा या नासाशी निगडीत कॅपलर मिशन मध्ये सिनीयर प्रिन्सीपल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होत्या. कॅपलर ही पृथ्वीसारख्या अन्य ग्रहांचा शोध घेणारी टीम आहे. अंतराळात ज्या ठिकाणी मोबाईल सिग्नल पोहचायला साधारण २० मिनिट लागतात अशा निर्जन आणि अज्ञात ग्राफोस लघुग्रहाकडे प्रवास करून तेथे संशोधन करण्यासाठी नासाच्या ‘हिरा सिम्यलेटेड मिशन’मध्ये त्या कमांडर होत्या. यावेळी त्यांनी चार लोकांसोबत साधारण १४ दिवस काम केले. या ठिकाणचा अनुभव खुपच वेगळा आणि अविस्मरणीय असा होता. हा आणि असे अनेक अनुभव भविष्यात एक अंतराळ यात्री म्हणून निवड होण्याची संधी देणार आहे. अंतराळातील यात्रेदरम्यान अंतराळविरांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीतील बदलाव अभ्यासणे या मिशनचा प्रमुख उद्देश होता. अशा अभ्यासासाठीच असे मिशन चालविले जातात. अवकाशात मायक्रो ग्रॅव्हटी (गुरुत्वाकर्षण) नसल्यामुळे डोळे आणि हाडं कमकुवत होत असतात. तसेच या प्रवासादरम्यान अंतराळविरांच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ होण्याची लक्षणे देखील जाणवत असतात. अशा परिस्थितीत अंतराळविरांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या या मिशन अंतर्गत तयार केले जातात.
कॅपलर मिशनमध्ये सहभाग
नासामार्फत अंतराळात विविध ग्रह शोधण्याचे काम कॅपलरद्वारा केले जाते. कॅपलर म्हणजे एखाद शाळेच्या बससारख्या आकाराची दुर्बीण होय. नासा कॅपलर मिशनच्या माध्यमातून विविध ग्रहांचा शोध घेत आहे. कॅपलर आकाशगंगेतील विविध ग्रहांच्या हालचालींचे फोटो घेत असतो. एका विशिष्ट सॉफ्टवेअरद्वारे कॅपलरला संचलित केले जाते. या फोटांच्या माध्यमातून नविन ग्रहांचा शोध लावण्यास मदत मिळते. अशा महत्त्वपूर्ण मिशनमध्ये अनिमा यांनी काम केले आहे.
‘नासा’कडून नव्या सूर्यमालेचा शोध
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने ब्रह्मांडात आपल्या सूर्यमालेसारखीच नवीन सूर्यमाला शोधली आहे. नासाच्या केपलर टेलिस्कोपच्या मदतीने ती शोधण्यात आली. यामुळे तिचे नाव केपलर-९० ठेवले आहे. आपल्या सूर्यमालेप्रमाणेच केपलर-९० मध्येही एक सूर्य व ८ ग्रह आहेत. केपलर-९० चे ७ ग्रह आधीच शोधण्यात आले होते. या ग्रहसमूहाला एक सूर्यमाला सिद्ध करण्यासाठी त्यांचा स्वतंत्र सूर्य असणे गरजेचे होते.
शुक्रवारी नासाने केपलर-९०चा सूर्य व सूर्यमालेचा ८ वा ग्रहही शोधला. त्याला केपलर-९० आय नाव दिले. ’नासा’ने केप्लर स्पेस टेलिस्कोप आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे हा शोध लावला आहे. नव्याने शोध लावलेल्या या ग्रहमालिकेत आठ ग्रह असल्याची माहिती नासाने दिली आहे. पृथ्वीचा समावेश असलेल्या आपल्या ज्ञात ग्रहमालिकेव्यतिरिक्त शोध लागलेली ही सर्वात मोठी ग्रहमालिका असल्याचे मानले जात आहे. केप्लर ९० या तार्याभोवती हे ग्रह फिरतात.