मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील इंदौर-इच्छापूर महामार्गावर कचर्याच्या ढिगार्यात कारमधून आलेल्या ‘माणूस’ नावाच्या प्राण्यांनी काही तासांपूर्वी या जगात आलेल्या एका जीवंत चिमुरडीला उकिरड्यावर फेकलेे. मासाच्या गोळ्यावर तुटून पडावे तशाच पद्धतीने कुत्र्यांनी तिचे लचके तोडायला सुरुवात केली. जिवाच्या आकांताने ती चिमुरडी रडत होती. पादचार्यांच्या लक्षात आले तोपर्यंत कुत्र्यांनी तिचा चेहरा आणि डोळे खाल्लेेले होते.
रह-रह कानों में
पिघले शीशे-से गिरते हैं शब्द
अगले जनम मोहें बिटिया न कीजो |
एका कविने लिहिलेले हे शब्द खरच मन पिळवून सोडत होते.बातमी वाचतांना एकच प्रश्न मनात येत होता. मुलगी असण्याची अशी शिक्षा,मुलगी झाली म्हणून तिला फेकून देण्याची राक्षसी प्रवृत्ती आजही या जगात आहे. खरं म्हणजे ती मुलगी रडतांना ‘‘अब जो कियो हो दाता, ऐसा ना कीजो, अगले जनम मोहे बिटिया ना कीजो|’’ असेच म्हणत असावी. इंदौर-इच्छापूर महामार्गावर राधास्वामी सत्संग परिसरासमोर शुक्रवारी दुपारी एका कारमधून काही लोक आले आणि त्यांनी रात्रीची शिळी मटणाची भाजीची पिशवी फेकावी तशी त्या चिमुरडीला कचर्याच्या ढिगार्यात फेकत पळ काढला. आई-बाबा मला का फेकताय? माझा काय दोष? हे समजण्याईतपत देखील त्या चिमुरडीचे वय नाही. थोड्याच वेळात कुत्र्यांचा घोळका तिथे आला आणि त्यांनी तिचे लचके तोडायला सुरुवात केली. चेहरा, डोके, डोळे खात त्या कुत्र्यांनी तिचा मृतदेह रस्त्याच्या दुसर्या खोपर्यापर्यंत फरफटत न्यायला सुरुवात केली. याचवेळी एका वृद्धाने कुत्र्यांना हाकलून लावत त्या चिमुरडीच्या अर्ध्या मृतदेहाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु कुत्र्यांची संख्या जास्त असल्यामुळे शेवटी इतर लोकांनी त्या कुत्र्यांना हाकलून लावले. पोलीस प्रशासन घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी उरलेला मासाचा गोळा एका कापडात गुंढाळला आणि पालिकेच्या कर्मचार्यांना मृतदेह नेण्यासाठी बोलविले. मृत्यूनंतरही त्या चिमुरडीची अवहेलना थांबली नाही. पालिकेच्या कर्मचार्यांनी कचरा वाहणार्या गाडीतच तिचा मृतदेह टाकत दवाखान्यात नेला.
मानवी शरीराच्या अवहेलनेची अशी कहानी याआधी आयुष्यात कधी ऐकली नव्हती. मी देखील दोन मुलींचा बाप, त्यामुळे बातमी वाचत असताना अंगावर उभा राहिलेला काटा आणि डोळ्यातले पाणी मला प्रचंड अस्वस्थ करत होते. आपल्या पोटच्या मुलीला कुणी रस्त्यावर अशा पद्धतीने फेकू शकतो, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मुलगी म्हणून जन्माला येणे हा एवढा मोठा गुन्हा आहे का? अंगावरचा मळ काढून फेकावा तसे या चिमुरडीला फेकण्यात आले. वास्तविक बघता त्या चिमुरडीला सुरक्षित अशा ठिकाणी सोडून जाता आले असते. परंतु ही चिमुरडी वाचायलाच नको अशाच पद्धतीने तिला कचर्याच्या ढिगार्यात फेकण्यात आले. एका आकडेवारीनुसार ३० टक्के बालकांना जन्मानंतर टाकण्यात येते. अनाथ मुलांना दत्तक घेणार्यांची संख्याही मोठीच आहे. त्यामुळेच शिशुगृहात वर्ष-दोन वर्षाच्या वयापलीकडील बालक शक्यतो राहत नाही. त्यांना कुणीतरी दत्तक घेतातच. अशा नालायकांना फक्त एकच विनंती, तुम्हाला नको असेल तर ती मुलगी किमान एखाद्या शासकीय दवाखान्यात किंवा शिशुगृहाच्या बाहेर सोडा. तिला जन्म देतात तर मग जगही पाहू द्या.
आपल्या पोटच्या पोरीला सावत्र बापासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास एका मुलीला तिच्या आईनेच भाग पाडल्याची घटना पंजाबमध्ये घडली. यामुळे पिडीत मुलगी गर्भवती झाली. साधारणतः सात महिन्यातच ती मुलगी प्रसूत झाली. अवघ्या काही वेळातच त्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. पिडीत मुलीच्या बहिणीने मोठ्या हिमतीने पोलिसांना हकिकत सांगितली. या दोन्ही घटनांवरून एक लक्षात येते मुलगी जन्माला आली तर टाकून घातली जाते किंवा वाचलीच तर तिच्या इभ्रतीचे मरेपर्यंत लचके तोडले जातात.अशा नरक यातनाच तिला आयुष्यभर भोगायच्या असतील तर ‘‘अगले जनम मोहे बिटिया न कीजो’’ असे तिने म्हटले तर चुकलेच कुठे !
संबंधित बातमीची लिंक
http://divyamarathi.bhaskar.com/news-ht/NAT-MP-newborn-girl-died-after-family-thrown-her-in-garbage-5384627-PHO.html?seq=1
निशब्द