उजेडाच्या उंबरठ्यावर थोड्याच क्षणात निशा संपण्याचा आभास मनाला नवी उभारी देत होता. अखेर उजेड झाला आणि आजची पहाट तशी नेहमीसारखीच जाणवली. घरासमोरचा अल्हाड नेहमीप्रमाणे अंथरणातच बिड्या ओढत कुणी तरी दहा-वीस दिले तर उतारा मारून तलप भागवायच्या विवंचनेत येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे मोठ्या आशेने आणि केवीलवाण्या नजरेने पाहत होता. तसं इतर मंडई देखील टमरेल हातात घेत आपापल्या जोडीदारांसोबत दिल्याच्या अड्ड्यावरून येतांना-जातांना दिसत होती. तेवड्यात मगरेची नजर माझ्यावर पडली. काहो भासा कवं उनात…म्हटलं रातले…! बरं भेटस मग थोडा टाइम्मा…म्हटलं नही हो मामा…ऑफिसले चालनू…त्यावर मगरे पुन्हा म्हटला…बरं संध्याकायले भेटूत मग भासा… त्यामा काय एवढं…म्हटलं चालीन मामा!
कधीकाळी हातात सोन्याच्या अंगठ्या अन् साऱ्या वाड्याला दारू पाजणारा मगरे व्यसनापाई आज पुरता लाचार झालाय. एक माझ्या सोबतची अन् एक माझ्या मागची अशा दोन वाड्यातल्या पिढ्या दिल्याच्या अड्ड्यावर माझ्या डोळ्यादेखत बरबाद झाल्यायेत. जबाबदारीच्या घरोट्यात पिसून वाड्यातील भलती-भलती धिप्पाड लोकांची व्हत्याचे नाहीसे झाल्यागत पार्थिवाची हाडं शिवपर्यंत पोहचल्यायेत. पण एक सांगू….अशा लोकांच्या नशिबाच्या कुष्टायला पण जिंदगीभर दलिंदरीचीचं चाबी लागेल रहातेय.
थोड्याच वेळात पटापट तयारी आटोपली अन् बायको-पोरांचा निरोप घेऊन निघालो घरातून. कुमार टाॅकीजजवळ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत झाडू मारत असलेल्या बेबीकाकूला हात देत गाडी पुढे नेली. उड्डाण पुलावर थोडा थांबत धरणगावचं सौंदर्य डोळ्यात साठवून…कानात ऐअरफोन घालत…लागलो एकदाचा जळगावच्या वाटेला !
नेहमीप्रमाणे त्या दोघं पोरी कॉलेजजवळ रनिंग करतांना दिसून आल्यात. कुणास ठाऊक बिचाऱ्या कधी पोलीस व्हणार ते. आता तर त्यांच्यावर अनेक वेळा डागडूजी झालेल्या रस्त्याला देखील कीव यायला लागलीय. बिचाऱ्या किती धावतील, किती घाम गाळतील कुणास ठाऊक. वावरमधी घाम गाळणाऱ्या पोरींना शिक्षणाची जोड नाहीय, नाही तर त्यांच्या अंगावर कवाच वर्दी राहिली असती. पण एक सांगतो, आता पीएसआय होणे सोप्पं पण पोलीस कॉन्स्टेबल होणे भलतंच कठीण झालय्. ओशोंचे प्रवचन ऐकता-ऐकता पिंपरी कवा आली काही उमगलेच नाही.
पिंपरीतून बाहेर पडत नाही, तोच मंगलमामाच्या हॉटेलपुढे रस्त्याच्या मधोमध एक गानकोकिळा मृत्यूशी झुंझ देत होती. कशी घायाळ झाली कुणास ठाऊक? खाचकन ब्रेक दाबत गाडी बाजूला लावली. परंतु तेवढ्यात माझ्या मागून येणारी एसटी त्या कोकिळेला चिरडून जाईल, असेच दिसत होते. एसटीवाल्याला हात देत इशारा केला. पण मोठ्यांना जमिनीवरचा जीव दिसत नाही म्हणे…पण आज नशीब बलवत्तर म्हणून त्या माऊलीचा चेंदामेंदा होता-होता वाचला. एक-दोन गाडी वाल्यांनादेखील इशाऱ्याने कोकिळा पडलेली असल्याचे सांगितले. दोघं-तिघं गाड्या तिला चुकवत भारकन निघून गेल्यात. रस्ता मोकळा झाल्याबरोबर कोकिळेला उचलून रस्त्याला बाजूला गवतावर ठेवले. माझ्या कितीतरी पहाट-दुपार या मावलीनं संगीतमय केलाय आणि तिचा असा अंत मनाला फार अस्वस्थ करत होता.
बाटलीतलं पाणी पाजू म्हटलं…तो पर्यंत त्या माऊलीनं जीव सोडला. थोडा थांबून मृत्यूचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. का आली ? का गेली? याचं उत्तर तिला मिळाले होते का? जर मिळाले नसेल तर जीवन-मृत्युचे तिचे चक्र असेच सुरु राहील का? अशा प्रश्नांची घालमेल मनात सुरु झाली. तेवढ्यात तीन-चार श्वानांनचं घोळकं मोठ्या तावातावाने माझ्याकडे यायला लागले. मला कळून चुकलं होतं, जंगलाचा नियमाप्रमाणे हे वागतील. पण माझ्या देखत तरी असं काही नको म्हणून…त्यांना हाकलून लावले आणि तडक्यात गाडी रोडवरून पुन्हा पळवायला सुरुवात करून निसर्गाच्या चक्राकडे अनदेखी केली.
मुसळी फाटा सोडल्यानंतर ‘हाय-वे’वर माझ्या पुढे दोघे जण आपल्या दुचाकीवरून जात होते. त्यांना ओव्हरटेक करू म्हटलं…तेवढ्यात समोरून भरकन ट्रक अंगावर आली अन् काय सांगू च्यामारी…शातीत अशी धडधड वाढली की ईचारू नका. म्हटलं घाई नको करू भाऊ…हळूच जाऊ, कोणतं लगन लावायचंय आपल्याले? तेवढ्यात पुन्हा एकदा लाल डब्बा जवळून पार घासून गेला. म्हटलं आज काही खरं नाही लेका…बळचं लोकं अंगावर येताय अन् खेटताय. बांभोरी पुलावर तर एक बोलेरोवाला बाजूच्या ट्रकला ओव्हरटेक करून जोरातच अंगावर यायला लागला. दचकून पटकन दोन्ही ब्रेक दाबत गाडी पटकन हळू केली,त्याच स्पीडने माझ्या मागून येणाऱ्या स्प्लेंडरवाल्यानंही जोरात ब्रेक दाबला. आम्हाला मस्त कट मारल्याच्या खुशीत तो हवेच्या गतीने निघून गेला. क्षणात मनात आला की, जर ब्रेक मारला नसता तर बोलेरोवाला गडी मला उडवूनच गेला असता. एवढ्या अरुंदपूलवर ओव्हरटेक करणे म्हणजे मौतचा मुका घ्यायचाच प्रकार हाय.
पुढे गुजराल पेट्रोलपंप जवळ तोंडाला रुमाल बांधलेली पोरगीने मालवाहतूक टेम्पोंला रॉंग साईडने ओव्हरटेक करत पुढे चाललेल्या आणखी एका मालवाहू रिक्षाला तशाच पद्धतीने पार केले. त्यानंतर मोठ्या ४०७ टेम्पोला मागे टाकून गाडीला मस्त नागमोळी खेळत ती पोरगी पुढे गेली. मी तर बघतचं राहिलो. एखाद्याही गाडीचा स्पीड कमीजास्त किंवा समोरून दुसरे वाहन येत असते तर…जय हिंद…जय महाराष्ट्रचं झालं असतं त्या पोरीचं!
आकाशवाणी चौकात परत एक लाल डब्ब्यावाला गडी फेडरेशनकडे फुल्ल स्पीडनं वळायला लागला. तेवढ्यात एक सँट्रो कार तिला धडकता- धडकता वाचली आणि त्या सँट्रो कारला सागर पार्ककडून येणारी दुसऱ्या कारवाल्याने ब्रेक दाबल्यामुळे धडक होता-होता वाचली. लाल डब्बा पुढे सरकण्याचाही धीर नसलेल्या एका कॉलेजच्या पोराने आपली पल्सरला एकदम धूम स्टाईलने सर्वाना चुकवत काव्यरत्नावली चौकाच्या दिशेने घूम…घूम… करत निघून गेला. खरं सांगतो हे सगळं बघून काळजाचा ठोकाच चुकला होता.
तांबापुरातून कसाबसा ऑफिसला पोहचलो. खरं सांगतो आपण क्षणा-क्षणाला अंतिम प्रवासाची घाई करतोय. बरं एकटं नाही…कुणी तरी आपल्या सोबत येण्याचाही आग्रही धरतोय. आपला अंतिम प्रवास मृत्यूनंतर सुरु होतो. परंतु या प्रवासाची लागून असलेली घाई विचार करायला लावणारी आहे. अंतिम प्रवास कोणत्याच सजीवाला चुकलेला नाही. परंतु त्याची एवढी घाई का? तसं बघायला गेलं तर आज सर्वांची लढाई वेळेसोबतच आहे. तो कुणासाठी थांबत नाही, हे जेवढे सत्य असले तरी तो कुणालाही चुकलेला नाही, हे देखील वैश्विक सत्य असल्याचे आपण का विसरतो?
वखतबरोबरच्या जिदाबादीमध्ये आजतागायत कोणीच जिंकलेलं नाही. बयचं त्याच्याशी पंगा घेण्यात काय अर्थ? राहिलं आपलं पहिलं प्रेम…तर ती जिंदगीच हाय, तिचा मनसोक्त आनंद लुटायचा आणि दुसऱ्यालेही लुटू द्यायचा. मौतनंतर किढीचा मुका तर प्रत्येकाले घेणचं पडतो. मौतभी आपली दिलरुबाच हाय. मायच्या गर्भात एखादं पोरग्याले जसं भ्या वाटत नाही, तसचं मौतच्या कुशीतभी भ्याव नावाची गोष्ट उरत नाही.
अनंतातल्या प्रवासावेळी मौत आपल्या सोबत नवा देह मिळेपर्यंत राहते. पण नवीन देह किती वेळा घ्यायचा? त्याच-त्याच चक्रव्युहात अडकण्यातही काय अर्थ आहे? नकोसा नाही वाटत जीवनाकडून मृत्यूकडचा तोच-तोच प्रवास? कुठे तरी विसावा घेतला तर बिघडणार कुठंय. जन्म-मृत्यूचा हा चक्रव्यूह याच जन्मी भेदून मुक्त व्हायचा प्रयत्न करायला हरकत तरी काय आहे. शेवटी जिंदगी कितीदा जिंदाबाद व्हईन?