‘अंकल…मै घर से भाग के आयी हू, लेकिन मुझे मम्मी की बहोत याद आ रही है…’ येथील पोलीस स्थानकात नेहमीची वर्दळ सुरू असताना गुजराथमधील अवघी दहावीत शिकणारी तरूणी थेट पोलीस निरीक्षकांच्या कक्षात शिरते आणि आपली कहाणी सांगते. त्यानंतर त्या अधिकार्याकडून बापाच्या मिळालेल्या मायेने ती तरूणी ढसाढसा रडते आणि म्हणते, ‘मेरे पप्पा होते तो वो भी आप जैसा ही मुझे प्यार से समझाते!’
घरात आजारामुळे अंथरूणावर पडलेली आई, लहानपणीच वडिलांचे कृपाछत्र हरवलेले, दोन भाऊ अशी पारीवारिक स्थिती असतांना गुजरातमधील सुरत शहरात राहणार्या या मुलीचे घरासमोर राहणार्या मुलावर प्रेम जडते. तो मुलगा देखील तिच्यावर जीवापाड प्रेम असल्याचे आणाभाका खावून सांगतो. याची कुणकुण दोघं भावांना लागते. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणार्या आपल्या हुशार बहिणीने आपले शिक्षण पुर्ण करावे आणि मग नंतर काय तो निर्णय घ्यावा, म्हणून ते तिला मारतात. सतत सुरू असलेल्या या वादातून ती तरूणी कसलाही विचार न करता सुरत रेल्वे स्थानकावर रात्री ११ वाजेला समोर उभ्या असलेल्या रेल्वेत बसते. मात्र जसजशी रात्र सरू लागते, तसतशी त्या तरूणीला आपल्या आईची आठवण सतावू लागते. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ती तरूणी धरणगाव रेल्वे स्थानकावर उतरत सरळ पोलीस स्टेशन गाठते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम आपली हातातील इतर कामे बाजूला ठेवतात. त्या तरूणीला पिण्यास पाणी देत आधी तिला शांत होण्यास सांगत तिची कहाणी ऐकतात. त्यानंतर कदम हे एका बापाप्रमाणे त्या तरूणीला कुटुंबाचं आणि आई, भाऊ यांचे महत्त्व आणि त्यांची मारहाण करण्यामागची भूमिका समजावून सांगतात आणि हळूहळू ती तरूणी आपलं मन मोकळं करते. ‘अंकल, मुझे घरमे कोई प्यार नही करता, सब मुझे डाटते हैं|’ अशा शब्दांमध्ये ती आपली व्यथा सांगते. यावर गणेश कदम यांनी तिला खूप समजावले. ‘बेटा, अगर मॉं और भाई आपसे प्यार नही करते तो वो इतनी दूर आपको लेने के लिये नही आते| वो आपके भले के लिये ही समझाते है|’ असे सांगत ते तिची समजूत काढतात. तिचे आई, भाऊ येईपर्यंत दिवसभरात जेव्हा-जेव्हा त्या तरूणीच मनं भरून यायचं तेव्हा-तेव्हा ती तरूणी थेट साहेबांच्या कक्षात शिरायची. कदम यांनीदेखील त्या तरूणीला पुर्णवेळ एका बापाची माया दिली. शेवटी रात्री कुटुंबातील सदस्य आल्यानंतर त्या तरूणीला त्यांच्यासोबत रवाना करण्यात आले. मात्र, अवघ्या एका दिवसात त्या तरूणीला मिळालेल्या बापाच्या प्रेमाने ती जातांना गहिवरत ढसाढसा रडते. साहेबांचेही डोळे पाणवतात, ‘बेटा कभीभी जिंदगीमें मदत की जरूरत हो, तो मुझे फोन करना|’ आई आणि भाऊ साहेबांचे हात जोडून धन्यवाद मानतात आणि पुन्हा आपल्या गावी रवाना होतात. अर्थात खाकीतल्या माणुसकीमुळे ती तरूणी आपल्या घरी सुरक्षितपणे पोहचते. अन्यथा मोठ्या रेल्वे स्थानकावर उतरल्यावर तिचे काय झाले असते याची कल्पनाही करणे अवघड आहे.